कोरोनासारख्या महामारीमध्येही साताऱ्याच्या कंदी पेढ्यांना देश विदेशातून मागणी कायम आहे. चाखू या, कंदी पेढ्यांचा गोडवा…☺️
जगात सातारा जिल्ह्याचा नाव लौकिक अनेक गोष्टींमुळे आहे. जसा साताऱ्याचा इतिहास. त्याचप्रमाणे दीडशे वर्षांपासून सुरू असलेल्या साताऱ्यातील कंदी पेढ्यांचाही या इतिहासामध्ये अग्रक्रम लागतो.
कोरोनाकाळामध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे इतर व्यवसायाप्रमाणे हा व्यवसायही काही दिवस बंद होता. लॉकडाऊनमुळे लोकांजवळील पैशांच्या कमतरतेमुळे पेढ्यांच्या मागणीत बऱ्याच प्रमाणात घट झाली होती. पण अलीकडे रक्षाबंधन, ईद या सारख्या सणांमुळे सातासमुद्रापारहूनही पुन्हा मागणी येऊ लागली आहे.
या कंदी पेढ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे १५० वर्षापासून चालत आलेली पेढे बनवण्याची पद्धत. याविषयी बोलताना श्री प्रशांत मोहन मोदी म्हणतात, इतर लोक बऱ्याच प्रकारे आपल्या सोयीनुसार काही गोष्टी सांगतात. पण कंदी पेढे ही इंग्रजांच्या ही आधीपासून प्रसिद्ध असलेली मिठाई आहे. साधारण १५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे ९ वे वंशज छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी कर्नाटक मधील चिक्कोडी येथे हा कंदी पेढा खाल्ला आणि त्यांना तो इतका आवडला की त्यांनी लाटच्या लाटकरांचे सर्व कुटुंब सातारा येथे आणून स्थापित केले. हे लोक मूळचे लाटे गावचे असल्यामुळे त्यांचे आडनाव लाटकर असे पडले.
तसेच मोदी या नावाचाही इतिहास काहीसा असाच आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी लाटकरांना “मिठाईतील मोती” म्हणजेच ‘मोदी’ अशी पदवी बहाल केली. यामुळे लाटकर, मोदी हे आडनाव म्हणून सुद्धा लावू लागले.
कंदी पेढे हे नाव या पेढ्याच्या दोन-तीन वेळा भाजल्या गेलेल्या कंदीमुळे पडले. दुधापासून खवा आणि त्या खव्याला भाजून- भाजून बनवलेल्या कंदीने हा पेढा बनवला जातो. या भाजणीमुळे हा पेढा खूप खुसखुशीत, खमंग आणि चवदार बनतो. हीच कंदी बनवण्याची व भाजण्याची पद्धत मोदी’ज नारायण पेढेवाले यांच्या चौथी पिढी वंशपरंपरेने करत आहे. हा पेढा खाताना कधीच दातात किंवा टाळूला अजिबात चिटकत नाही, असेही प्रशांत मोदी म्हणतात.
इतर दुकानांमध्ये तीन ते चार प्रकारचे पेढे व बर्फी असतात. पण नारायण मोदी यांच्या दुकानांमध्ये १५ ते २० प्रकार पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे गणेशोत्सवासाठी खास कंदी भाजणीचे मोदक, केसर मोदक, शुगर-फ्री मोदक, चॉकलेट मोदक अशा प्रकारचे मोदक देखील बनवले जातात.
पण बाजारात इतर लोकही ‘सातारी कंदी पेढे’ या नावाने पेढे बनवतात व विकतात यामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. तसेच इतर पेढ्यांना चांगली गुणवत्ता नसल्यामुळे लोक पेढ्यांची खरी ओळख विसरत चालले आहेत, याची मला खंत वाटते असे प्रशांत मोदी म्हणतात.
जसे हे पेढे चवीला अतिउत्तम आहेत, तसेच त्यांचे कामही उत्तम आहे. शुद्धता, आरोग्यदायी, मर्यादित साखर आणि सुंदर असे नारायण मोदींच्या पेढ्यांचे वैशिष्ट्य आहे.
तसेच पूर्ण देशातील सातारी कंदी पेढे ही एकमेव अशी मिठाई आहे जी १५० वर्षांपासून तशीच लोकप्रिय आहे आणि याची विक्री देशोदेशी करण्यासाठी ॲप आणि वेबसाईट देखील उपलब्ध आहेत, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो असे प्रशांत मोदी म्हणतात.
कंदी हि पेढा बनविण्याची एक कला आहे, ती पिढ्यानपिढ्या जतन राहील यासाठी मोदी-लाटकर कायम प्रयत्नशील राहतील अशी ग्वाही प्रशांत मोदी यांनी दिली.

– लेखन : फातिमा इस्माईल इनामदार.
तिसरे वर्ष, विकास संवाद केंद्र, विश्वाकर्मा विद्यापीठ
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
सातारी कंदी पेढ्यांचा इतिहास आणि कंदी पेढ्यांची चव हे सातारला राहणारे व त्या परिसरात भटकंतीसाठी जाणा-यांसाठी आकर्षण असते. मला सुद्धा कंदी पेढे खाण्याची अधूनमधून मजा चाखत असतो.
राजाराम जाधव,
I m also from Satara. I always means whenever I use to come at my native place at that time I definitely purchase satari kandi Pradha for my house members. Because all of us kandi pudhe likes very much. But now I come to known the history of the Satara kandi pedha. So madam salute to your contribution that you hv given us ancient history of the Satara kandhi pedha. Like a sweetness of kandipedha you article is also very very interesting and very good to read for some new knowledge. Good luck. My friend Devendraji Bhujbal Saheb is good editor in this field. So I also congratulate him on this article. Good luck for your future writing. BSGaikwad.
Thank you