कवी म्हणून जन्माला येणे भाग्य असते, हे थोरा मोठ्यांनी सांगितलेले वाक्यंवाक्य खरे होताना दिसले.. अनुभवले !
कवींना कुठलाही विषय समंजसपणे लिहायला उठसूट शब्दांची भर घालावी लागत नाही. मनात रुजलेलं, काहीसं साठवलेलं, आठवलेलं, मोजक्या शब्दात येऊन मोकळं होतं. यमकांचा तालमेल साधून मनातले असंख्य गुपीत कागदावर येतात. वाचकांचे स्वरही गुणगुणायला शिकतात. मेंदू त्याचा स्विकार करत जातो तेव्हा ती कविता रसिकांच्या मनात रमते. अर्थपूर्ण, लयबद्ध रचना असलेली कविता शिखराची उंची गाठते. अशावेळी प्रेक्षकांची दाद न मागताच मिळते. एखादी लहान कविता सुद्धा कित्येकांना आधार देऊन जाते. कडव्या कडव्यातील शब्द सुखाचा कवडसा घेतात आणि याच इवल्याश्या ओळी तेजफुलांसारख्या आयुष्यभर घमघमतात. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कवी संमेलन !
कवीमन हे तर कवींना प्रत्यक्ष भेटूनच कळतं. ते हळवं असलं तरी इतरांना धीर देण्याकरता खंबीर होऊन जगतं. कवितेचे क ख ग शिकवत नाही अहो कुणी. स्वतःचं जगणं आयुष्याचे बोल एका संथ नदीत निथळतात तेव्हा कुठे तरी आदळत जातात शब्दांनां शब्द आणि शब्दांच्या वाटेत लिहिल्या जातात ओळींवर ओळी. कविता प्रेम, व्यथा, आक्रोश, वात्सल्य आणि वेदनेच्या अस्तित्वातून प्रकटते. तेव्हाच ती सृजनाकडे धाव घेणारी मनाच्या अतिशय जवळची मैत्रीणच वाटते. बुद्धीच्या नीतिमत्तेशी झुंझणारे हे सखोल मनाचे तरल भाव किती महत्वाचे असतात हे कवीसंमेलन ऐकल्यावर प्रकर्षाने जाणवते.

सातारा येथील साहित्य संमेलनात प्रत्येक गावा, शहरातून आलेल्या कवींच्या रचना अतिशय ह्रदयस्पर्शी होत्या कारण त्या काना, मात्रा वेलांटीच्या नुस्त्या कविता नव्हत्याच. काही होत्या कणखर तर काही मृदू.. केल्या होत्या काहींनी गोष्टी, काही गप्पा. कारण कविता करताना उघडला होता साऱ्यांनीच संवदनशील मनाचा कप्पा.. कोणाची कविता विशेष भावली हाही प्रश्नच येथे पडला नाही. प्रत्येक कवींच्या काव्यरचनेत वैशिष्ट्य दिसले. कवीसंमेलनात आपली कविता सादर होणे, कवितेला व्यासपीठ मिळणे याहून अधिक कवींसाठी काहीच नसते. मराठी भाषेचे प्रेम कवितेला असेच भारोभर मिळत राहो. मराठीचा पदर धरून असंख्य कवी जन्माला येवोत हेच अंतर्मनापासून वाटते.

साताऱ्यात कवी संमेलन गाजले ते केवळ आणि केवळ कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांमुळेच ! थोरले शाहू महाराज साहित्य नगरीत मला व माझ्या बरोबर भारतभरातून अनेक मराठी कवींना निमंत्रित केले होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिभावंत ज्येष्ठ मान्यवरांना आदराचे स्थान दिले. महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी व कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्या हस्ते प्रत्येक कवीला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित केले.
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी यांची मोलाची कामगिरी कार्यक्रमात जाणवली. प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्यांनाही संमेलन पाहता यावे यासाठी युट्यूबवर ऑन लाईनच्या माध्यमाने ते प्रसारीत करण्यात आले. कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी प्रत्येकाने केलेले परीश्रम अतिशय मोलाचे आहेत. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मावळा फाउंडेशन, मराठी साहित्य परिषद साताऱ्याचे कृतज्ञतापूर्वक आभार.

— लेखन : दिपाली वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800
