स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त काल हुंडाविरोधी चळवळ मुंबईच्या वतीने आयोजित कार्यक्रमात साने गुरुजी यांच्या नावे युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुंबईतील विलेपार्ले येथील प्रबोधनकर ठाकरे क्रीडा संकुलच्या कला मंदिरात आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून, कुटुंब न्यायालयाच्या माजी न्यायाधीश बागेश्री परिख, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी हुंडाविरोधी चळवळीच्या अध्यक्ष प्रा शैलजा सांगळे होत्या.
हुंडाविरोधी चळवळ मुंबईच्या वतीने यंदाचे साने गुरुजी युवा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्याच्या सिंरोचा तालुक्यातील झिंगानूर येथील माडिया या आदिवासी समाजातील पहिली एमबीबीएस डॉक्टर झाल्याबद्दल कोमल शामला कासा मडावी हिला, तर पुरातत्व शास्त्राचे युवा संशोधक संदीप दहिसरकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हुंडाविरोधी चळवळीच्या वतीने साने गुरुजी युवा पुरस्कार, साने गुरुजी युवा वैज्ञानिक असे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
यावेळी बोलताना, कोमल मडावी हिने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण खूप भारावून गेलो आहोत, काय बोलावे अन काय नाही, अशी माझी स्थिती झाली आहे, असे सांगून या पुरस्काराबद्दल संस्थेने माझी निवड करून माझा सन्मान केला, याबद्दल हुंडाविरोधी चळवळ आणि संयोजक आशाताई कुलकर्णी यांचे आभार मानले. तर अशाच भावना संदीप दहिसरकर याने व्यक्त केल्या.
याप्रसंगी बोलताना निवृत्त न्यायाधीश बागेश्री परिख म्हणाल्या, साने गुरुजी युवा पुरस्कार माझ्या हातून दिला जाणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. कोमलसारखी आदिवासी मुलगी गावात वैद्यकीय सेवा प्रदान करते, याबद्दल भारावून गेले, असे सांगून त्यांनी प्रोत्साहन म्हणून कोमल हिला पुढील शैक्षणिक कार्यासाठी दहा हजार रुपये भेट दिले.
तर देवेंद्र भुजबळ यांनी युवकांसमोर आज विविध प्रकारच्या समस्या आहेत, असे सांगून त्यावर त्यांनी मात करीत पुढे गेले पाहिजे, असा मोलाचा सल्ला दिला. युवकांनी आपली आवड ओळखून करिअर निवडले पाहिजे. आवडीनुसार आपण करिअर निवडले तर त्यातून सतत आनंद मिळत राहील , असे सांगितले. स्वतःसाठी जगत असताना आपल्यामागे जे अनेक गरीब, दीनदुबळे आहेत, त्यांच्यासाठी आपण काम केले पाहिजे असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
मामा कुलकर्णी यांनी हुंडाविरोधी चळवळ चालू करून पन्नास वर्षे झाली तरी हुंडा पद्धती संपलेली नाही, याबद्दल दुःख वाटते, असे प्रा शैलजा सांगळे यावेळी म्हणाल्या. यासाठी तरुण आणि त्यांच्या पालकांची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती केली तरच ही दुष्ट पद्धत संपू शकते, असे सांगून युवकांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हुंडाबंदी चळवळीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव आशाताई कुलकर्णी यांनी करून हुंडाविरोधी चळवळ कशी काम करतेय याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या आशाताईंना याप्रसंगी ‘करियरच्या नव्या दिशा’ देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले हे पुस्तक भेट देण्यात आले.
वैशाली जोशी यांनी, ‘बलसागर भारत होवो’ हे स्फूर्ती गीत गायले. शेवटी प्रा. भरती उन्नी यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास विविध मान्यवर मंडळी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी ☎️ 9869484800