मानवी जीवनात अनेक सुख – दुःखाचे क्षण येत असतात. त्यामुळे अशा क्षणी आपण कशा पध्दतीने जगतो हे ज्याच्या – त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते.
काही माणसे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधत असतात. तर, काही मंडळींकडे सर्व गोष्टीची अनुकूलता असल्यावरही काही तरी कमी असल्याची भावना त्यांच्या मनात असते. त्यामुळे अशी माणसं स्वतःही आनंदी राहत नाही आणि दुस-यालाही आनंद देऊ शकत नाहीत.
मात्र, काही माणसं दुस-यांच्या जीवनातील दुःखाची मात्रा कमी करून, आनंदाची पखरण करून आपल्या सभोवताली आनंद लहरी निर्माण करतात.
माझी नात चि. सान्वी आता तीन वर्षांची झाली आहे. आमच्या परिवारातील पहिलीच मुलगी, त्यामुळे ती सर्वांची लाडकी, तिच्या बाललिलांनी घरात सतत खळखळतं वातावरण निर्माण केले आहे. तिचा पहिला वाढदिवस मित्र परिवारासमवेत घरगुती पद्धतीने साजरा केला.
परंतु यावर्षी तिचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार मुलांनी व्यक्त केला. त्यांनी त्यांचा विचार मला सांगितल्यावर आपण एखाद्या “लहान मुलांच्या अनाथाश्रम – अनाथालयात वाढदिवस साजरा करण्याची मी इच्छा व्यक्त केली आणि मुलांनाही ही कल्पना आवडली.
मग मुलांनी या अनाथाश्रम – अनाथालयाचा शोध घेतला असता, नवी मुंबईतील नेरूळ येथील दि इटर्नल होप चॅरीटी मिशन संचलित, “बेथनी चिल्ड्रेन्स होम” या अनाथ मुलांच्या अनाथाश्रमाचा शोध घेतला. मग आम्ही या ट्रस्टचे संस्थापक – संचालक श्री स्टीफन जोशुवा यांना त्यांच्या नेरूळ येथील कार्यालयात जाऊन भेटलो आणि त्यांना दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी चि. सान्वीच्या “वाढदिवसाच्या निमित्ताने” त्यांच्याच अनाथाश्रमात एक छोटासा आनंद सोहळा साजरा करण्याची परवानगी मागितली.
श्री जोशुवा यांनी आमची विनंती विनाअट मान्य केली, आणि आमचा आनंद द्विगुणित झाला.
त्यानुसार या अनाथालयातील आनंद सोहळा साजरा करण्याची तयारी माझ्या मुलांनी, सुनांनी सुरू केली आणि हा आनंद सोहळा समाजातील दुर्लक्षीत – अनाथ
मुलामुलींच्या समवेत अतिशय आनंदाने साजरा केला.
त्याप्रसंगी या अनाथाश्रमातील निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य – आनंद आणि माझ्या नातु – नातीने व परिवाराने या अनाथाश्रमातील संचालक, कर्मचारी यांच्या समवेत व्यतीत केलेला एक आनंदाचा दिवस आमच्यासाठी अतिशय लाखमोलाचा, आनंद देणारा ठरला. या आनंदी क्षणांची किंमत फक्त पैशाने विकत घेता येईल काय ?

– लेखन : राजाराम जाधव
निवृत्त सहसचिव, महाराष्ट्र शासन.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800