जागतिक सायकल दिन
युनायटेड नेशन्सच्या जनरल असेम्ब्लीने एप्रिल २०१८ मध्ये ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करावा असे घोषित केले.
जागतिक आकडेवारीनुसार १९६० च्या दशकात सायकल आणि चारचाकी (कार) यांच्या निर्मितीत फार अंतर नव्हते. गेल्या चाळीस वर्षांत मात्र हे चित्र बदलले आहे. सध्या सायकल आणि चारचाकींच्या उत्पादनाचे प्रमाण ३:१ असे आहे.
अमेरिका हा श्रीमंताचा देश असल्यामुळे तिथे सायकल उत्पादनात घट होत असली तरीही युरोपने मात्र सायकलशी आपली मैत्री कायम ठेवली आहे.
आशिया खंडात सायकलला जोरदार मागणी आहे, असे अद्ययावत आकडे सांगतात. एकट्या चीनमध्ये दरवर्षी चार कोटी सायकल तयार केल्या जातात.
जगातील काही देशांमध्ये सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये नेदरलँड देशाचा उल्लेख अवश्य करावा. नेदरलँडमध्ये तेथील लोक वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर करतात. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता या सर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे.
परदेशात कुठल्याही पायाभूत सुविधा उभारताना सायकल स्वारांची सोय लक्षात घेतली जाते. पायाभूत सुविधा उभारताना सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पार्किंगची आखणी केली जाते.
नेदरलॅण्डमध्ये २०१४ मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणार्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीट मध्ये वापरण्यात आले असून, दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात आणि रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो.
स्पेन मधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले असून, हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे सायकल स्वारांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले आहेत.

भारतातही सायकलचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. सायकल हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. भारतातल्या सायकल उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. आपल्याकडे दरवर्षी दीड कोटी सायकलचे उत्पादन केले जाते. साध्या सायकलला फारशी मागणी नसली तरीही सुसज्ज आणि अत्याधुनिक सायकलची लोकप्रियता सतत वाढत आहे. भारतातील हिरो, अॅटलस, टीआय सायकल्स अशा नामांकित कंपन्यांनी परदेशी सायकल कंपन्यांशी वितरणाचे करार केले आहेत, हे विशेष.
गेल्या काही वर्षांत महाविद्यालयीन आणि आयटी-आयआयटीतील युवक-युवती आणि चाळिशी गाठलेले मध्यवयीन नागरिक सायकल पर्यटनाच्या प्रेमात पडले आहेत. देशाच्या लेह-लडाख, आसाम-आगरतळा किंवा कुलू-मनाली अशा मनोरम किंवा दुर्गम भागांची सायकल रपेट करण्याचा शौक असल्यामुळे सायकल कडे लोकांचा ओढा वाढला आहे. डोंगराळ किंवा खडकाळ भागांत प्रवास करण्यासाठी म्हणून विशेष सायकल तयार केली जाते. अशी सायकल निसर्ग आणि देश-प्रदेश डिस्कव्हर (शोध) करण्याची इच्छा पूर्ण करते.
सायकलप्रेमींची पथके दरवर्षी मोठय़ा उत्साहाने दुर्गम-अतिदुर्गम किंवा पहाडी प्रदेशांच्या दौऱ्यास मोठय़ा उत्साहाने निघतात. या मंडळींचा सायकल पर्यटनाचा आनंद दिवसागणिक वाढतोच आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. मात्र, सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणार्या राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभावच आहे.

– लेखन : संजीव वेलणकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
👍 आम्ही लहानपणी चार जण मित्र 25 / 25 पैसे वर्गणी काढून 1रु 1तास सायकल भाड्याने घ्यायचो. प्रत्येकाला 15/15 मिनिटे चालवायला द्यायचो. कितीतरी वेळा पडून गुडघे फुटले पण सायकल चालवायला मजा यायची. कॉलेजला आम्ही सायकल वर जायचो. 12वी ला असताना एके दिवशी वळणावर समोरून एक ट्रक फास्ट आला. मला वाटले आता आपण ट्रक खाली जाणार घाईने रस्ता सोडून बाजूला असणाऱ्या चार पाच फूट खोल खड्यात पडलो. मनगटात हात मोडला. ओतूर गावात एक न्हावी मोडलेले हाड बसवून द्यायचा. त्याने विनामूल्य माझा मोडलेला हात ठिक केला. 12वी ची परीक्षा झाल्यानंतर ओतुर ते शिर्डी व पुन्हा परत असा सायकल प्रवास केला.
कल्याणला असताना स्टेशन पासून घर तीन किलोमीटर दूर असल्याने ड्युटीवर येताना व रात्री घरी जाताना सायकल चा वापर केला. कल्याण रेल्वे स्टेशन ला सायकल पार्किंग असल्याने सायकल ठेवण्याचा प्रश्न नव्हता. 1994 ते 2001 पर्यंत कल्याणला सायकल प्रवास केला. शेवटी ती सायकल एक गरजू कामगाराला भेट म्हणून देऊन टाकली. सायकल दिना निमित्ताने सायकल चालविण्याचे दिवस पुन्हा आठवले.
🙏 धन्यवाद
व्वा अतिशय सुरेख मनोरंजक व माहितीप्रद लेख.. एकेकाळी पुणे शहरात देखील जिकडे तिकडे सायकलीच सायकली धावतांना दिसायच्या ते आठवते.