Wednesday, September 17, 2025
Homeलेखसावनेर : आदर्श दिव्यांग शाळा

सावनेर : आदर्श दिव्यांग शाळा

सावनेर हे नागपूर पासून 35 किमी. अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेजवळ वसलेले तालुक्याचे गाव. या गावाला जाण्याचा सहज योग आला, तो गावातील एका मूकबधिर शाळेला भेट देण्याच्या निमित्ताने….

अनेकदा अशा प्रकारच्या निवासी शाळा आपल्याला तिथल्या वातावरणामुळे अस्वस्थ करून जातात. मात्र ही शाळा अपवाद होती… शाळेला भेट दिल्यावर तिथले प्रसन्न वातावरण, स्वच्छ परिसर पाहून माझे मनही आपोआपच या शाळेत रमले.

नागपुरातील श्री मंगल बहुउद्देशीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रामनगर, नागपूर यांच्यावतीने सावनेर मध्ये दिव्यांग प्रवर्गातील मूकबधिर निवासी शाळेची स्थापना करण्यात आली. शहरी भागातील मूकबधिर विद्यार्थ्यांना ज्या सुविधा शहरात मिळतात, त्या सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने श्री.नारायण समर्थ यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने ही शाळा सुरू केली.

सुरुवातीला ३ विद्यार्थी घेऊन सुरू झालेली ही शाळा २९ वर्षांपासून सातत्याने सुरू असून, आपली प्रगती करीत नावारूपाला आली आहे.

या शाळेला समर्थ काकांनी आपल्या मुलासारखे सांभाळले. या शाळेत आज ६५ विद्यार्थी आहेत. मुलं आणि मुली दोन्ही आहेत. शाळेच्या माध्यमातून परिसरातील ग्रामीण भागातील कर्णबधीर विद्यार्थ्यांचे शक्य होईल तितक्या लवकर निदान करून त्याला कर्णयंत्रामार्फत प्रशिक्षण देण्यात येते, जेणे करून लवकरात लवकर त्याची बोलण्याची, लिहिण्याची ओळख सुरू होते.

शाळेत १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. यात वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचा समावेश आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासोबत हस्तकला, चित्रकला, संगणक इत्यादी गोष्टीही शिकवल्या जातात.
कला, क्रीडा जसे शिकवल्या जातात तसे, शाळाबाह्य उपक्रमातही विद्यार्थी सहभागी होतात. विविध क्षेत्रात भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडते.

मूकबधिर शाळेत प्रवेश करताच या शाळेची भव्य इमारत आपल्या दृष्टीस पडते. सभोवतालचे स्वच्छ आणि सुंदर वातावरण मनाला भुरळ घालते. इमारतीच्या समोर खेळाचे साहित्य ठेवलेले आहे. आपल्या कुटुंबापासून लहान वयात हे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतात पण या विद्यार्थ्यांना याची उणीव या शाळारुपी कुटुंबात भासू दिली जात नाही.

या निवासी शाळेत मुलांसाठी सुसज्ज प्रशस्त अशी वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. मुला-मुलींसाठी वसतिगृहात सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. वसतिगृहात ही स्वच्छ वातावरण पाहायला मिळाले इथला शिक्षक वर्ग कटाक्षाने प्रत्येक मुलाकडे लक्ष देतो. आपले लेकरू जसे सांभाळतो तसे इथे प्रत्येक मुलाला सांभाळले जाते. त्यांना जेवणातही विविध प्रकारचा सकस आहार दिला जातो. तसेच वैद्यकीय सुविधाही दिल्या जातात.
शाळेत श्रवण तपासणीसाठी विविध प्रकरची उपकरणे पाहायला मिळाली. विद्यार्थांच्या वाचेचा आणि भाषेचा विकास व्हावा यासाठी उपचार तज्ञांद्वारे स्पर्श ज्ञान, आरसा, द्रुकश्राव्य माध्यम, ऑडिटरी ट्रेनर, विविध चार्ट चित्रे या अशा अनेक साहित्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना बोलायला शिकवले जाते.
शाळेत फिरताना वेगवेगळे कक्ष पाहायला मिळतात. श्रवण तपासणी कक्ष, वाचा उपचार कक्ष, डिजिटल कक्ष, समूह श्रवण यंत्र कक्ष, कौशल्य विकास कक्षांच्या माध्यमातून प्रत्येकात वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात.

८ वी नंतर पुढील शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणीही या शाळेमार्फत सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. भविष्यात विद्यार्थी स्वतःच्या पायावर कसा उभा राहील याकडेही ही शाळा लक्ष देते.
शाळेत या व्यतिरिक्त मुलांकडून त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या वस्तू बनवून घेतल्या जातात, त्याचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाते. शिवण काम, मोती वर्क, अगरबत्ती तयार करणे, बांबू वर्क, ग्रीटिंग कार्ड, विविध प्रकारची फुले बनवणे, लोकरीच्या वस्तू बनवणे, शोभेच्या वस्तू तयार करणे आदी विषयही शिकवले जातात. त्या वस्तूंना मार्केट मिळवून दिले जाते.

एकंदरीत ही शाळा पाहिल्यावर खूप छान वाटले. आतापर्यंत या शाळेला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शाळेसाठी इथला शिक्षक वर्ग , स्वतः समर्थ काका यांनी किती मेहनत घेतली आहे, हे शाळा पाहूनच समजते.
समर्थ काकांचे कौतुक यासाठी की, हे शिवधनुष्य त्यांनी आपल्या खांद्यांवर पेलले आहे.
समाजात वावरताना समाजासाठी काहीतरी करणारी अशी समर्थ काकांसारखी माणसे पाहिली की एक प्रेरणा घेऊनच आपण इथून माघारी फिरतो. त्यांचे हे अविरत कार्य पाहून त्यांच्या कार्याला सलाम केलाच पाहिजे. तुमची या सावनेर परिसरात फेरी झाली तर या शाळेला नक्की भेट द्या.

अधिक माहिती करिता आपण समर्थ काकांशी 9371486285 या टेलिफोन नंबरवर संपर्क करु शकता.

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं