Thursday, March 13, 2025
Homeलेख"सावरकर समजून घेताना" : १

“सावरकर समजून घेताना” : १

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने अभ्यासक श्री हेमंत सांबरे लिखित “सावरकर समजून घेताना” ही मालिका आपण हा आठवडा भर दररोज प्रकाशित करीत आहोत.

श्री हेमंत सदाशिव सांबरे, पुणे हे बी ई (मेकॅनिकल) असून त्यांना वाचन, लेखन, संशोधनाची आवड आहे. त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी ‘लोकमत’ च्या कथा स्पर्धेत १९९७ साली पहिला क्रमांक मिळाला असून अनेक वृत्तपत्रे व मासिकात त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत व होत असतात. विशेषतः “स्वातंत्र्यवीर सावरकर” हा त्यांच्या लेखनाचा व संशोधनाचा प्रमुख विषय आहे. न्यूजस्टोरीटुडे मध्ये श्री हेमंत सांबरे यांचं स्वागत आहे…

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे आजचा विनाकारण ज्वलंत बनविला गेलेला विषय आहे. माझे हे लेख वाचून झाल्यावर बरेच गैरसमज दूर होतील अशी अपेक्षा आहे. जे सावरकरांविषयी पुर्ण माहिती नसल्याने संभ्रमित आहेत, ते कट्टर सावरकर प्रेमी होतील व जे आधीच सावरकर भक्त आहेत ते स्वतःला नक्कीच भाग्यवान समजतील.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे म्हणजे अनेक, रहस्यमय व रोमांचकारी प्रसंग, अनपेक्षित घटना यांनी भरलेला एकच आयुष्याचा जीवनपट आहे… एकाच व्यक्तीच्या आयुष्यात किती गोष्टी घडू शकतात ? अशी व्यक्ती की ज्याच्या एकाच आयुष्यात किती प्रकारच्या भूमिका वाट्याला येतात ! आणि ती प्रत्येक भूमिका तो समरसून जगतो व त्या प्रत्येक भूमिकेला नुसता न्याय देत नाही तर त्याला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवतो असे भव्य-दिव्य चरित्र निर्माण केलेला नेता क्वचितच इतिहासात सापडेल !

पण माझा आजचा विषय, जे तुम्हाला व आपल्या सर्वांना माहीत आहे ते चर्चा करणे नसून, वीर सावरकरांचे एक वेगळे दर्शन तुम्हाला दाखविणे आहे हा असून मला खात्री आहे की या लेखमालेच्या शेवटी मी ते करण्यात यशस्वी होईल 🙏.

सावरकर लहानपणापासून अतिशय प्रखर बुद्धिमान होते ..त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती…त्यांची निर्णयक्षमता तेव्हापासून अफाट अशी होती. लेखक व कवी म्हणून एखादा विषय कुणालाही समजून सांगणे यात त्यांचा हातखंडा होता. वक्ते म्हणून ते अगदी काही क्षणात समोरच्याला स्वतःकडे खेचून घ्यायचे. त्यामुळेच त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा होता ..एक प्रकारे कुणालाही आपल्या विचारांकडे खेचून घेण्याची चुंबकीय शक्ती लहानग्या विनायकामध्ये होती ..ते स्वतः शिवाजी महाराज, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर यांच्या चरित्रांमुळे प्रेरित झाले होते…

अशी ही व्यक्ती, त्या काळात जी बॅरिस्टर पदवी मिळविणे खूप प्रतिष्ठित समजले जायचे ती त्यांना मिळाली. त्या काळात असे लोक खोऱ्याने पैसे कमवायचे. सुरक्षित व श्रीमंतीचे आयुष्य जगणे त्यांना अगदी सहज शक्य होते आणि त्यांनी तसे जर केले असते तर,  त्यांना त्या काळात एकदम साहजिक गोष्ट होती. पण त्यांनी क्रांतिकार्याचा अतिशय खडतर असा मार्ग स्वीकारला. का तर भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे व या भूमीला परत गतवैभव मिळवून द्यावे म्हणून…

आज ही गोष्ट वाचताना किंवा लिहताना खूप सहज वाटतेय पण त्या काळात हे तेव्हडे सोप्पे नव्हते … मुळात सावरकर ज्या काळात जन्मले तो काळ म्हणजे ब्रिटिश सरकारचा सुवर्णकाळ होता आणि ते असे सत्ताधीश होते की ज्याच्या सत्तेचा सूर्य कधीच मावळू शकत नाही, असे ठामपणे मानणारे सगळेच होते …

हा क्रांतिकार्याचा मार्ग स्वीकारला म्हणजे काय कधीतरी झोपेतून उठून आपले त्यांच्या मनात विचार आला व त्यांनी ते सुरू केले असेही नव्हते …त्याच्या परिणामांचा विचार त्यांनी पुरता केलेला होता .. वीर सावरकर त्यांच्या वहिनी म्हणजे येसु वहिनी ..यांना काव्यमय पत्र , “माझे मृत्यूपत्र” यात लिहतात…
‘की घेतील व्रत न आम्हीं हे अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे
बुद्धयाची धरिले करी वाण हे सतीचे’

जे काही सावरकर करत होते त्याचे भयंकर परिणाम त्यांना आधीच माहीत होते, पण तरीही या अग्निकुंडात त्यांनी उडी घेतलीच होती ..

तर असा परम निश्चय असलेला मनुष्य भित्रा बिलकुल नव्हता ..त्यांना न्यायालयाने ५० वर्षे काळे पाणी ची शिक्षा दिल्यावर त्यांनी ठणकावून विचारले,
“इतकी वर्षं तुमचे राज्य तरी टिकणार आहे का ?”

शिवाजी महाराज वीर सावरकरांचे आदर्श होते .. शिवचरित्र मध्ये “आग्र्याची सुटका” आठवते का ? जेव्हा आग्र्याच्या दरबारात अपमान झाला तेव्हा शिवरायांनी बाणेदारपणे उत्तर दिले व अपमान सहन केला नाही, पण त्यानंतर जेव्हा औरंगजेबाने त्यांना कैदेत ठेवले तेव्हा शिवरायांनी ओळखले की आता तो स्वाभिमान असा सारखा-सारखा दाखवून उपयोग नाही तर आपल्याला वेगळे चतुराईचे हत्यार बाहेर काढावे लागेल ..तेव्हा तात्पुरतं आजाराचे सोंग घेऊन आपले लोकही परत स्वराज्यात पाठविण्याचे नाटक केले … यातून आपण औरंगजेबाला घाबरलो असे नाटक केले ..ही एक प्रकारची तात्पुरती माघार होती …कारण स्वराज्याचे खूप मोठे कार्य अजूनही बाकी होते, जे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते ..आपल्या मातेला दिलेली वचनपूर्ती अजून बाकीच होती ..

शिवरायांचा शत्रू औरंगजेब व परतंत्र भारताचा शत्रू म्हणजे ब्रिटिश यांची ताकद खूप मोठी होती .. अशावेळी या ताकदीला ताकदीने उत्तर देणे किंवा देत राहणे म्हणजे स्वतःला कायमचे कैदेत अडकवून ठेवणे वा आपले जीवनकार्य, म्हणजेच स्वराज्य किंवा स्वातंत्र्य मिळविणे चे स्वप्न विसरून जाणे हे एकच होते…

दूर अंदमानात म्हणजे मूळ भारत भूमी पासून दूर तुरुंगात राहून हे कार्य असे कितीसे वीर सावरकरांना साधणार होते का ? तर नाही, खचितच नाही !! दूर दिल्लीत म्हणजे मूळ स्वराज्यभूमिपासून दूर राहूनही जसे शिवरायांना साधणार नव्हतेच …तर तात्पुरती माघार हा अंतिम जे युद्ध होणार आहे त्याच्या पूर्वतायरीचाच भाग होता. तर मी इथे हा उहापोह थांबवतो, जास्त काही न बोलता सुजाण वाचकांवर हे सगळे जे सांगितले त्यातून अर्थ कसा काढायचा ते सोपवतो.

असे हे वीर सावरकर मग जेव्हा मूळ भारतभूमीवर परत आले, ज्या माणसाचे मूळ पिंड क्रांतिकारी मनाचे आहे तो मनुष्य खरेच गप्प बसला असेल का ? वीर सावरकरांनी अनेक प्रकारे क्रांतीकारकांना गुप्तपणे मदत केली. शिवाजी राजे कैदेतून युक्तीने सुटून परत आले तेव्हा त्यांनी बादशहाला पत्र पाठविले व त्यात त्यांनी तुमच्या आदेशानुसार राहतो असे खोटेच कळवले व पुढच्या काही वर्षांत स्वराज्य मजबूत करून घेतले ..

रत्नागिरीला तुरुंगात असताना सावरकरांनी अनेक मोठी कामे केली .. अस्पृश्यता निवारण, वेगवेगळ्या जातीच्या लोकांची सहभोजने, पतितपावन मंदिराची स्थापना (अवघ्या भारतातील _एकमेव मंदिर_ जे सर्व जातींच्या लोकांना दर्शनासाठी खुले केले), कोकणातील पाचशे पेक्षा जास्त विहिरी सर्व जातींसाठी खुल्या केल्या (तो काळ खूप कठीण होता, स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव) ..इथे बघा बरं का, सावरकर हे स्वतः स्पृश्य (जातीने ब्राह्मण) होते, त्यांच्या या जातिनिर्मूलनाच्या कामामुळे तेथील मूळ ब्राह्मण समाजाने देखील त्यांना वाळीत टाकले होते ..तरीही श्री व सौ सावरकर यांनी हे कार्य सुरूच ठेवले ..यातून हिंदू समाज संघटित होत गेला ..

पुढचे एक मोठे काम वीर सावरकरांनी केले ते म्हणजे मराठी भाषा शुद्धीकरण !! मी खाली काही सावरकर यांनी मराठी भाषेला दिलेत ते शब्द देतोय, हे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल हे केवढे थोर काम त्यांनी करून ठेवले आहे.

प्रचलित शब्द (सावरकरांनी किंवा त्यांचे बंधू बाबाराव यांनी दिलेला शब्द)
शहिद (हुतात्मा)
मेयर (महापौर)
डिरेक्टर (दिग्दर्शक /दिग्दर्शन)
तारीख, Date (दिनांक)
Assembly (विधिमंडळ)
Loudspeaker (ध्वनिक्षेपक)
कायदा (निर्बंध)
आणि असे अजून शब्द ..जागेच्या अभावामुळे इथे सगळेच सांगू शकत नाही असो कारण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, असो….

जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा वीर सावरकर यांनी उघडपणे तरुणांना सैन्यात भरती व्हा असे सांगायला सुरुवात केले, त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. पण सावरकर ठाम होते. त्यांना दूरदृष्टी होती, की हेच सैन्य व प्रशिक्षित झालेले सैनिक भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा देशाचे संरक्षण करू शकेल आणि ते सत्य ही झाले (१९४७ ला भारत-पाकिस्तान युद्ध झाले) .. असेच त्यांनी दूरदृष्टीने चीन भारतावर हल्ला करू शकतो हे खूप आधी सांगितले होते (आणि हिंदी-चिनी भाई भाई म्हणणाऱ्या चीनने १९६२ साली आक्रमण केले !)

त्यांनी जे जे काही आयुष्यात केले, ते खूप ठामपणे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर काय काय होते ते बघा..
महाकवी सावरकर (कमला, गोमंतक)
नाटककार सावरकर (संन्यस्त खड्ग व इतर)
कादंबरीकार सावरकर (काळे पाणी, मला काय त्याचे)
निबंधकार सावरकर
इतिहासकार सावरकर (सहा सोनेरी पाने, १८५७ चे स्वातंत्र्यसमर)
क्रांतिकारक सावरकर
हिंदुसंघटक सावरकर
पत्रकार सावरकर
हे सर्व वाचताना आपणच अचंबित होऊन जातो की हा एकच मनुष्य किती अद्भुत आणि विविध प्रकारचे आयुष्य जगलाय !

वीर सावरकर कायम म्हणायचे, ‘देश हा देव असे माझा’,
‘देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो, व या देशाचे आपण देणे लागतो’
सावरकरांची देशभक्ती उच्च कोटीची होती. आयुष्यात जे काही भयंकर अनुभव आले, त्यामुळे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व विचार कधीच बदलले नाही, उलट ते अजून दृढ होत गेले. मी स्वतः त्यांच्या याच गुणाने अगदी लहानपणापासून प्रेरित होतो व आजही आहे. म्हणजे मी आजही कुठलेही संकट आले तरी सावरकरांच्या जीवनाकडे बघतो व विचार करतो या माणसाला सगळेच नकारात्मक अनुभव येऊनही हा मनुष्य कायम सकारात्मक राहिला, मग आपले संकट तर त्यापुढे काहीच नाही !.

आजचे राजकारण खूप गलिच्छ झाले आहे. सावरकर काय किंवा इतर कुणीही महापुरुष असो जोपर्यंत आपण त्यांनी देशाला जितके दिले त्याच्या काही प्रमाणात सुद्धा देशाला परत देत नाही तोपर्यंत या महान लोकांविषयी वाईट किंवा चुकीचे बोलण्याचा कुठलाही अधिकार प्राप्त होत नाही ..कुणावर किती विश्वास ठेवला पाहिजे हे बघताना हा निकष लावा की या बोलणाऱ्या व्यक्तीने देशाला किती व काय दिले आहे ? आणि मग पुढे जावे.

_सावरकर समजून घ्यायचे असतील तर आधी सावरकर वाचले पाहिजे_ ..वीर सावरकरांनी पूर्ण आयुष्यात दहा हजार पानांचे लेखन केले, जे एकूण आठ खंडात विभागले आहे ..दुसऱ्या कुणाला वाचण्याची गरजच नाही इतके सावरकरांनी स्वतः लिहून ठेवले आहे.

ज्यांना सावरकर वाचायला किंवा समजून घ्यायचे असतील त्यांनी त्यांचे “माझी जन्मठेप” हे आत्मचरित्र वाचण्यास घ्यावे. हे एकच पुस्तक वाचल्यावर नुसतेच तुम्ही सावरकरांच्याच प्रेमात पडणार नाही तर इतर ही असंख्य क्रांतिकारक तरुणांच्या त्यागाची महानता तुमच्या लक्षात येईल …देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अशा स्वतःचे आयुष्य भारतमातेवर उधळून देणाऱ्यांमुळेच मिळाले आहे हे लक्षात येईल.
क्रमशः

हेमंत सांबरे

– लेखन : हेमंत सांबरे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित