सावरकरप्रणीत हिंदुराष्ट्र कसे आहे ?
वाचकहो ! ‘सावरकर समजून घेताना’, या लेखमालेच्या आपण गेल्या तीन भागांना जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार 🙏 .
लेखमालेतील चौथा भाग आपल्यासमोर घेऊन येताना खूप आनंद होत आहे. वाचकांस विनंती आहे की लेख पूर्ण वाचून मगच कुठल्याही निष्कर्षाप्रत यावे …
वाचकहो , ‘ हिंदुराष्ट्र ‘ हा विषय आजच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय होऊन बसला आहे . याबाबत अनेक मत मतांतरे आहेत , अनेकांनी हा विषय अनेक पद्धतीने मांडला आहे .पण हाच विषय वीर सावरकरांनी कसा मांडला होता , हे बघणे खूपच गरजेचे आहे .
बऱ्याचदा एखादी गोष्ट पूर्ण समजून न घेताच त्या आधीच त्यावर विनाकारण इतके वाद घातले जातात , की त्यामुळे मूळ विषय बाजूला राहतो व त्या विषयाचे गांभीर्य हरवून जाते .
म्हणूनच हा विषय मी आपणापुढे सुसूत्र पद्धतीने ,पण अतिशय सोप्या भाषेत मांडणार आहे . मला खात्री आहे की लेख पूर्ण वाचताच तुमच्या मनाच्या सर्व शंका दूर होतील व तुम्ही सावरकर प्रणीत हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते व्हाल !
हा विषय पुढे नेताना आपण नेमके ‘ राष्ट्र ‘ म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे . प्रसिद्ध विचारवंत ‘ _रेनन_ ‘ म्हणतो की,
” पूर्वीच्या काळात अनेक त्याग व पराक्रम करून ज्यांनी आपली भावनिक एकी घडवून आणली व ही एकी टिकविण्यासाठी तसेच कष्ट , त्याग व पराक्रम करण्याची ज्या समूहाची पुढे भविष्यात ही तयारी आहे अशा सामाजिक लोकांचा संघ म्हणजे राष्ट्र होय ‘ .
_गारनर_ म्हणतो की ,
” समान परंपरा, समान इतिहास , समान रूढी , समान संस्कृती यांनी युक्त असलेला समाज म्हणजे राष्ट्र ” .
सावरकरांची भूमिका अशी होती की , हिंदुस्थानात ‘हिंदू’ हे राष्ट्र आहेत , इतर लोक अल्पसंख्य आहेत .हिंदूंना समान प्राचीन व अर्वाचीन इतिहास आहे .त्यांचे शत्रू व मित्र समान आहेत
. इष्ट असेल ते सामावून घ्यायचे व अनिष्ट असेल ते फेकून द्यायचे व एकसंधता अजून बळकट करायची , या प्रशंसनीय प्रक्रियेने समान जीवनाची युगानुयुगे व्यतीत करून , हिंदू एकसंध बनून गेले आहेत .
‘ हिंदू’ म्हणजे नेमके कोण ?
अनेक वर्षांचे संशोधन व पुराव्यांनुसार हे सिध्द झाले आहे की ‘ सिंधू ‘ या शब्दापासून ‘ हिंदू ‘ हा शब्द तयार झाला आहे .म्हणजेच सिंधू या पुरातन नदीच्या काठावर या संस्कृतीचा उगम झाला व पुढे हिच संस्कृती ‘ _हिंदू संस्कृती_ ‘ म्हणून पुढे पूर्ण भारतीय उपखंड व जगभरात पसरली . अनेक मोठमोठी हिंदू साम्राज्ये येथेच उदयास आली व वैभवास पोहोचली . त्यामुळे हिंदुस्थान ही हिंदूंची मूळ भूमी आहे व हेच त्यांचे मूळ वसतीस्थान आहे .
हिंदुत्वाची व्याख्या
हिंदुत्व या शब्दाची व विचारधारेची सुटसुटीत व सर्वसमावेशक व्याख्या फक्त सावरकरांनीच केली .
ती अशी –
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका |
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ||
म्हणजेच पवित्र सिंधू नदीपासून ते सिंधुसागरापर्यंत ( दक्षिण समुद्र ) असलेल्या या भरतभूला जो आपली पितृभूमी व पुण्यभूमी मानतो तो प्रत्येकजण हिंदू होय. यावरून हे ओघानेच ठरते की सर्व वैदिकधर्मी , जैनधर्मी , शीख , बौद्ध , गिरीजन ( म्हणजेच आदिवासी ) हे सारे हिंदू आहेत .
सावरकरांचे हिंदुत्व कोणत्याही _धर्माचा सिद्धांत_ मांडत नाही , संपुर्ण हिंदू जातीच्या सर्व विचारशाखा व जिवनशाखा यात समाविष्ट आहेत .
तशीच ही विचारसरणी अतिशय थोर व महान आहे .ही सर्व प्रकारच्या इतर पंथ , धर्म इ ना समाविष्ट करून घेऊ शकते व इतिहासाने हे वेळोवेळी सिद्ध केलेच आहे . पण त्याचवेळी सावरकर सांगतात की , ‘ जे दुसऱ्याचे आहे ते लुबाडण्याची हिंदूंची इच्छा नाही .त्यांना स्वतःचे असे जास्तीचे ( बहुसंख्य आहेत म्हणून ) अधिकारही नकोत .पण दुसऱ्या कडून लुबाडणे जाण्याची मात्र हिंदूंची आता तयारी नाही . कारण हिंदूंनी कधीही स्वतःहून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी , संपत्ती हरण करण्यासाठी वा दुसऱ्यांची संस्कृती , देवस्थाने , पुजास्थाने नष्ट करण्यासाठी आक्रमणे केली नाहीत . म्हणूनच ही त्यांची मूळ भूमी हिंदुस्थान म्हणजे त्यांचे मूळ व हक्काचे स्थान आहे . म्हणूनच हे हक्काचे स्थान हिंदूंनी या दांभिक सहिष्णुता वा धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणी पायी का सोडावे ? असा खडा व रोखठोक प्रश्न ते विचारतात . आणी हे सावरकरांचे _कालातीत_ विचार वाचून आत्ताच्या काळात हिंदूंचे डोळे खाडकन उघडत आहेत व इतर अनेकांनी या विषयावर सावरकर विचार अभ्यासणे गरजेचे आहे .
खरोखरच या हिंदू भूमीविषयी हे सत्य आहे की , जे जे जगात सापडते ते ते सर्व या भूमीमध्ये सापडेल. परंतु येथे जर एखादी वस्तू येथे मिळाली नाही तर मग ती मग इतरत्र जगात कुठेही सापडणार नाही . हेच कारण आहे की इथे अनेक नवीन धर्म , पंथ आले व ते मोकळेपणाने वाढले व त्या ही धर्माना जेव्हढी मोकळीक मिळाली, जेव्हढे स्वातंत्र्य मिळाले तितकी मोकळीक , तितके स्वातंत्र्य क्वचितच जगात त्यांना कुठे मिळाले असेल .
हे सगळे वाचून वाचकांना लक्षात आले असेलच की सावरकर किती दूरदृष्टीने या विषयाकडे बघत होते व आपले विचार मांडत होते .
सावरकरांचा भारत
सावरकरांना कसा भारत वा हिंदुस्थान हवा आहे , ते त्यांनी अगदी मुद्देसूद पणे मांडले आहे ते असे –
१ . जे नागरिक भारताशीच पूर्ण एकनिष्ठ राहतील अशा सर्व नागरिकांना जाती ,पंथ , वंश किंवा धर्म याचा विचार न करता _समान अधिकार व समान कर्तव्ये_ राहतील . ( फक्त अधिकारच नाही तर कर्तव्येही समान )
२ .आपली भाषा , धर्म , संस्कृती इ चे रक्षण करण्यासाठी , सर्व अल्पसंख्याक जमातींना परिणामकारक संरक्षण दिले जाईल .पण त्यापैकी कोणाही जमातीला स्वतःचे राज्य निर्माण करू दिले जाणार नाही किंवा बहुसंख्य लोकांच्या हक्कावर अतिक्रमण करू दिले जाणार नाही . ( खूपच महत्वाचा मुद्दा )
३ . प्रत्येकास भाषण, मत , धर्म याचे स्वातंत्र्य . कठीण परिस्थितीत जे बंधने घातली जातील ती सर्वांना सारखी असतील ज्यात देशहित प्रथम व धर्म किंवा जात नंतर राहील . ( इथे आजच्या कोरोना काळाचा संदर्भ आपण घेऊ शकतो , कारण आज ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने सर्वांनी सारखीच बंधने पाळणे गरजेचे आहे )
४ . एक माणूस एक मत
५ . संयुक्त मतदारसंघ
६ . नोकऱ्या केवळ गुणवत्तेच्या आधारे दिल्या जातील.
७ . प्राथमिक शिक्षण विनामूल्य व सक्तीचे .
८ . शेषाधिकार सर्व केंद्र सरकारच्या ताब्यात .
९ .भारतात नागरी ही राष्ट्रीय लिपी , हिंदी राष्ट्रभाषा , संस्कृत ही देवभाषा राहील .
१० .अल्पसंख्याक स्वतःच्या मातृभाषेत शाळा काढू शकतात, पण यासाठी जी मदत सरकारकडून मिळेल ती त्यांनी भरलेल्या कराच्या प्रमाणात असेल ( हा विचार किती तर्कशुद्ध आहे हे लगेच लक्षात येते )
हिंदू व बाकीचे धर्म
आज भारत असा देश आहे की जिथे अनेक प्रकारचे धर्म व पंथ एकत्र राहत आहेत .पण तरीही हिंदुराष्ट्र विषयी बोलताना यांत बाकीच्या धर्मांचे स्थान कसे आहे हे पाहणे खूप गरजेचे आहे . कारण ‘ हिंदुराष्ट्र ‘ हा शब्द वापरला की लगेच असे समजले जाते की बाकीच्या धर्मातील लोकांना लगेच भारतातून काढून दिले जाईल वा त्यांना गुलाम केले जाईल असे . पण हे तसे नसून हे सावरकर प्रणीत हिंदुराष्ट्र कुठल्या तत्वावर आधारलेले आहे ते आपण बघू…
सावरकर हे महान तत्त्ववेत्ते व जागतिक विचारवंत होते. ते एके ठिकाणी म्हणतात या विश्वाचा धर्म हा मानवता धर्म हाच असला पाहिजे , पण जोपर्यंत बाकीचे धर्म हा विचार सर्वथा पाळत नाही , तोपर्यंत तरी हिंदुनी या मानवतावादी मृगजळ च्या मागे पळू नये . कारण धर्मनिरपेक्षता हा शब्दच मुळात _दांभिक_ आहे व भारतात तो फक्त _हिंदूंच्याच_ ( बहुसंख्य असूनही ) गळी मारला जातो .
‘ _आम्ही हिंदू नाही_ ‘ असे म्हणण्यात आजकाल काही हिंदूच बढाई मारू लागले आहेत . त्याचवेळी मुस्लिम , ख्रिश्चन मात्र स्वतःला तसे कधीच म्हणताना दिसत नाही .
१९४१ साली डॉ आंबेडकरांनी म्हटले होते की , ‘ भारत ही आपली मातृभूमी आहे नि हिंदूंशी आपले रक्ताचे नाते आहे , असे खऱ्या मुसलमानांना त्याचा इस्लाम धर्म कधीही मानू देणार नाही “. पुढे यातूनच भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली व पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र उदयास आले . फाळणीनंतर जेवढे मुस्लिम पाकिस्तानात गेले , त्यापेक्षा ही जास्त मुस्लिम येथे भारतात उरले . आपल्या भारत देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर करण्यात आली . आपल्या शेजारीच एक कट्टर असे मुस्लिम राष्ट्र तयार झाले , त्याचवेळी आपणास सांगण्यात आले की भारत हा धर्मनिरपेक्ष देश असेल .मुळात
‘ धर्मनिरपेक्ष ‘ हा शब्द व त्यानुसार वागणे हिंदू सोडून कुणालाही शिकविले जात नाही .
तसेच इथे ही नोंद घेणे आवश्यक आहे की , सावरकर हे मुसलमानांच्या विरोधात बिलकुल नव्हते. किंबहुना त्यांच्या क्रांतिकारी जीवनात युसूफ मेहर अली सारखे मुस्लिम मित्र होते .१८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकात तर त्यांनी अनेक मुस्लिम सैनिक व क्रांतिकारक यांचा गौरवाने उल्लेख केला आहे . पण त्याचवेळी सावरकरांनी मुस्लिमांच्या धर्मवेड्या वृत्तीचा व विस्तारवादी वृत्तीचा वेळोवेळी विरोध केला .
सावरकर पारशी लोकांचे भरभरून कौतुक करतात व त्यांच्या भारत निष्ठेबद्दल त्यांचे कौतुक करतात .
तसेच ख्रिश्चन अल्पसंख्याक समाज हा शांत वृत्तीचा असून , देशाबाहेरील लोकांशी संबंध ठेऊन तो हिंदुस्थान विरुद्ध राजकीय डाव खेळत नाही असे त्यांचे मत होते .
सावरकर जेव्हा भारतातील सर्व जाती-धर्म याबद्दल विचार मांडत तेव्हा त्यांना सर्वांना समान वागणूक दिली जावी असेच सांगतात . ज्या राज्यात धर्म, पंथ , जात किंवा वंश याचा विचार न करता सर्व नागरिकांना समान वागणूक आहे , आणि , ‘ एक माणूस, एक मत ‘ हा न्याय ज्या राज्यात सर्वांना लागू आहे , असे भारतीय राज्य निर्माण करणारे हिंदू-मुस्लिम वा हिंदू-इतरधर्मीय ऐक्य त्यांना मान्य होते , पण त्याच वेळी विरोधी व आडमुठ्या अल्पसंख्याक जमातीपुढे गुडघे टेकून ऐक्याची याचना करणे त्यांना अमान्य होते .
खरेतर , ‘ देश ‘, की, ‘ धर्म ‘ असे निवडण्यास सांगितले तर आपल्यातील प्रत्येकाने प्रथम काय निवडायला हवे ? तर सावरकरांचे हिंदुत्व कुठलीही जात वा धर्म न पाहता सर्वांना _समान अधिकार व समान कर्तव्ये_ सांगते .. सावरकरांचे हिंदुत्व _गुणवत्तेच्या आधारावर_ नोकऱ्या देण्यास सांगते …
…त्यामुळेच सावरकरांचे हिंदुत्व हे वर्चस्व गाजविण्यास सांगत नाही तर समानतेच्या तत्वावर सर्वांना सारख्याच संधी उपलब्ध करून देते . ही तत्वे ‘महान तत्वे’ आहेत कारण ती आपल्या राष्ट्राला महान बनविण्यासाठी अत्यावश्यक आहेत .
ज्यू लोकांच्या इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीचा अनेक वर्षे चाललेला लढा व युरोपातील इतर अनेक देशांचे उदाहरण अभ्यास केल्यावर सावरकर सांगतात की, ‘कोणत्याही राष्ट्राला पूर्ण स्थिरता नि एकी येण्यासाठी इतर गोष्टींबरोबर मुख्यतः तेथील राहणाऱ्या लोकांची त्या राष्ट्रावर भक्ती असली पाहिजे , त्यांच्या वाडवडिलांची जी पितृभू आहे तीच त्यांची पुण्यभू असली पाहिजे . त्यांच्या इतिहासाच्या घटनांचे जे क्षेत्र तेच त्यांच्या पुराणातील घटनांचे क्षेत्र असले पाहिजे . इस्रायल हे आज एक छोटे राष्ट्र असले तरी जगातले एक बलाढ्य राष्ट्र जे बनले आहे , ते याच वरील कारणांची गोळाबेरीज ( पितृभू व पुण्यभू ) झाल्याने बनले आहे .
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व
हा एक खूप मोठा महान विचार आहे , जो आपण खूप खोल अर्थाने व उज्वल भविष्याच्या दृष्टीने विचारात घ्यायला पाहिजे . सावरकर स्पष्टपणे सांगतात की, “या हिंदू देशाचा उज्वल भविष्यकाळ हा हिंदूंच्या सामर्थ्यावर व एकीवरच अवलंबून आहे “. आपल्यातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे की प्रत्येक हिंदी मनुष्याच्या मनात आपल्या मूळ संस्कृती , वैभव , पराक्रम, विजयी इतिहास इ चे प्रेम निर्माण होईल आणि हा सारा इतिहास , ते वैभव इ परत निर्माण करण्याची गरज आहे याची तीव्र जाणीव होईल तेव्हाच मग साहजिकच हिंदू , मुसलमान , पारशी , ज्यू इ सर्वांना असे वाटेल की प्रथम हिंदी आहोत ( म्हणजेच हिंदुस्थानी ) मग इतर सर्व . ही सर्वामध्ये एकत्वाची भावना तयार व्हायला त्यासाठी व त्याआधी _हिंदुनी आपली एकी_ केली पाहिजे . हे हिंदुंचे एकीकरण करताना हिंदुस्थानातील कुठल्याही इतर अहिंदूंचा ( हिंदू सोडून इतर धर्मांचा ) कुठलाही अपमान करू नका , पण त्याचवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या झुंडी करून व गुंडशाहीचा वापर करून जे घटक वा समूह राष्ट्राच्या एकीस बाधा आणतील अशा झुंडीच्या ,समूहांच्या विरोधात एकीने लढा देण्यासाठी सज्ज होऊन तयार राहा .
हिंदुनी आशाळभूतपणे एकी व्हावी म्हणून इतर जणांच्या मागे लागून आपल्या शक्तीला व्यर्थ वाया घालवू नये . पण हिंदुनी (हिंदु , शीख , जैन , बौद्ध इ ) सर्वांनी आपली एकी भक्कम करावी . सावरकर तर दूरदृष्टीने सांगतात या सर्वांनी आपल्यातील जाती , उपजाती इ चा त्वरित त्याग करून आपापसात विवाह करावेत , व संबंध दृढ करावेत व केवळ हिंदू म्हणून एक व्हावे ..तुम्ही असे वेगवेगळ्या जाती , उपजाती यात विखुरलेले राहिलात तर तुम्हाला एकेकटे गाठून तुम्हाला नष्ट करणे इतरांना सहज शक्य होईल , म्हणूनच केवळ हिंदू या एकाच नावाखाली व एकाच झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे .याच कारणाने व विचाराने सावरकरांनी ही रत्नागिरीत असताना सहभोजन , मंदिर प्रवेश इ. साठी चळवळी केल्या .
सावरकरांचे ‘ हिंदुराष्ट्र ‘ हे धर्मवादी भूमिका घेत नसून ते ‘ विज्ञाननिष्ठ ‘ भूमिका घेते व यात समाविष्ट सर्व नागरिकांना समान न्याय , समान अधिकार , समान कर्तव्ये सांगते . म्हणूनच या तत्वावर आधारित राष्ट्र कुणीही कोणत्या तरी विशिष्ट धर्माचा आहे म्हणून विशेष अधिकार देत नाही तर ‘ राष्ट्र सर्वप्रथम ‘ या तत्वावर चालण्यास सांगते .
हे हिंदूंचे एकीकरण म्हणजे काही इतर कुणासाठी धोका असेल असे नसून , ती उलट एका विशाल व बलशाली राष्ट्राच्या ऐक्याची हाक असेल , ज्यात ते सर्व राष्ट्प्रेमी भाग घेतील ज्यांना इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा ‘ राष्ट्र सर्वप्रथम ‘ वाटेल . त्या वेळी हा हिंदी मनुष्य , हिंदुत्वाच्या या थोर विचाराने प्रेरित होऊन संत श्री तुकाराम महाराजांच्या उपदेशाने गर्जतो , ” _आमुचा स्वदेश भुवन त्रया मध्ये_ _वास “_ , म्हणजेच माझ्या देशाच्या मर्यादा म्हणजे त्रैलोक्याच्या मर्यादा आणि तीच माझ्या देशाची सीमा!
सावरकरांचे विचार हे ” देश प्रथम , मग बाकी सगळे ” याच तत्वावर आधारित असल्याने व हे विचार वैयक्तिक स्वार्थाचा विचार करायला न सांगता
” राष्ट्र प्रथम ” हा विचार करायला सांगतात . म्हणूनच सावरकर स्वतः नेहमीच सांगत की , ” हा भारत देश हा माझा देव आहे ” , म्हणजेच माझ्या हिंदू धर्माच्या आधी किंवा माझ्या देवाच्या आधी माझा देश आहे . आणि हेच कारण आहे की आजपर्यंतच्या बहुतेक राजकारणी लोकांनी मतांच्या लालसेपोटी , मुद्दाम सावरकर विचारांना डावलले वा त्यातला धोका ( म्हणजे त्यांचा स्वार्थ साधणार नाही हे ओळखून !) ओळखून मुद्दाम दुर्लक्षित केले .
सावरकरप्राणित हिंदुराष्ट्रात ” धर्म आधी , देश नंतर ” मानणाऱ्या विचारसरणीला स्थान नाही हे लक्षात घेतले पाहिजे .
वीर सावरकर हे द्रष्टे महापुरुष होते व ते काळाच्याही पुढे जाऊन विचार करत , हे वेळोवेळी सिध्द झाले आहे . त्यामुळेच आपल्या राष्ट्राला बलशाली व एक समर्थ राष्ट्र बनवायचे असेल ” सावरकर विचार ” समजून घेऊन ते स्वीकारणे व त्याची अंमलबजावणी करणे ही तातडीची आवश्यकता आहे .
जय सावरकर🚩🚩.
लेखासाठी वापरलेले – पुस्तक संदर्भ
१ . स्वातंत्र्यवीर सावरकर – धनंजय कीर .
२. हिंदुत्व – ले- वि दा सावरकर
३. हिंदुराष्ट्रजीवनदर्शन – ले- वि दा सावरकर .
४ . हिंदुत्वाचे पंचप्राण – ले – वि दा सावरकर

– लेखन : हेमंत सांबरे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
मी Indian Navy मध्ये असल्यामुळे खूप वेळा अंदमान निकोबार ला गेलो आहे.
Cellullar jail ला खूप वेळा भेट दिली आहे.
सध्या तेथे Light and Sound show असतो संध्याकाळी.
खूप छान असतो.
🌹🌹
सर आपला खूप गाढा अभ्यास आहे.
धन्यवाद कि आपण सत्य माहिती जगासमोर आणली आहे. 🌹🌹👍👌