रायगड जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यव्रती डॉ अनंत देशमुख यांचा जन्म 1 जुलै 1948 रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बागदांडे येथे झाला. त्यांना लहानपणापासून वाड:मयीन वातावरण लाभले. त्यांच्या आजोबांना वाचनाची आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांना ग्रंथांचा खजिना हाती मिळाला. तेव्हापासून त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण बागदांडे येथे झाले. त्यानंतर सारळ, कराड, जैतापूर येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अलिबाग येथे झाले. देशमुख
1976 साली पुणे विद्यापीठातून बीएससी झाले.
1978 साली बी.एड.,
1981 साली एम.एड.झाले.
1990 साली कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यावर त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली.
देशमुख यांनी सुरुवातीला डॉकयार्ड येथील जहाज दुरुस्तीच्या कारखान्यात काम केले. परंतु त्यांना साहित्याची आवड असल्याने ते त्यात रमले नाहीत. कालांतराने ते शैक्षणिक क्षेत्राकडे वळले. त्यांनी विद्यादान करणे व साहित्यातील संशोधन करून त्यावर लेखन करण्याचे व्रत घेतले व निवृतीनंतरही ते अद्याप सुरू आहे. त्यांनी एम.फिल करणाऱ्या वीस, पी.एच.डी. करणाऱ्या दहा विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले आहे.
देशमुख यांनी संशोधनात्मक लेखन विपुल प्रमाणात केले आहे. 1988 साली “नाट्यविचार” तर 1993 साली “आधुनिक नाट्यविचार” ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांच्या मूळ प्रतींचा अभ्यास करून “विशाखाभोवती” हे पुस्तक लिहिले. देशमुख यांनी दुर्लक्षित विषय हाताळले आहेत.
प्रसिध्द व्यक्तीच्या चरित्रात प्रकाशात न आलेल्या महत्वाच्या भागावर संशोधन करून त्यावर प्रकाशझोत टाकला आहे.आनंदीबाई जोशी यांच्यावर अनेकांनी लिहीले आहे परंतु देशमुख यांनी त्यांचे पती गोपाळराव जोशी यांचे चरित्र लिहीले आहे.
त्याचप्रमाणे बाळ गंगाधर टिळक यांच्यावर अनेकांनी लिहीले आहे परंतु देशमुख यांनी टिळकांचे पुत्र श्रीधरपंत यांच्यावर चरित्र लिहून अनेकांना माहीत नसलेली माहिती उपलब्ध करून दिली आहे.
देशमुख यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या बद्दल सखोल अभ्यास करून त्यांचे चरित्र आठ खंडात प्रकाशित केले आहे. चरित्र, प्रवास वर्णन, कथा, ललित लेख, संशोधनात्मक लेखन विपुल प्रमाणात केले आहे.
स्वतःबद्दल कमी बोलणाऱ्या देशमुख यांनी “अनन्वय” नावाने आत्मचरित्र लिहीले आहे. त्यांची एकूण 36 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नाटककार अजित दळवी यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनावर आधारित “समाजस्वास्थ्य” हे नाटक लिहिताना अनंत देशमुख यांचे मार्गदर्शन घेतले आहे.
देशमुख यांना शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रांत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. ते 1 जुलै 2022 रोजी त्यांच्या वयाला 74 वर्ष पूर्ण होऊन 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. “अवघे पाऊणशे वयमान” असलेल्या साहित्यव्रती डॉ अनंत देशमुख यांची 22 मे 2022 रोजी पुणे येथे होणाऱ्या, दुसऱ्या सीकेपी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाचा दर्जा उंचावला जाणार आहे यात शंकाच नाही.
नेहमी हसतमुख असलेल्या सतत वाचन आणी लेखन यात मग्न असणाऱ्या साहित्यव्रती डॉ अनंत देशमुख यांनी येत्या पंचवीस वर्षात वयाची तसेच पुस्तकाची शंभरी पुरी करावी. त्यासाठी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

– लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
Dr. Deshamukh’s character sketch is an inspiration to all new writers and also to all the wise readers of literature. I wish Dr. Anant Deshmukh healthy and peaceful life . Long live Dr. Deshamukh.