Monday, July 14, 2025
Homeसाहित्यसाहित्य तारका : ११

साहित्य तारका : ११

संत विठाबाई

लौकिकाला ओलांडणे ही सोपी गोष्ट नव्हे.. मानवनिर्मितीकडून ते ईश्वरनिर्मितीकडे वळले. सृष्टी व अंतरात्मा यांचा एकाकार त्यांनी पाहिला आणि नभासारखे रूप या राघवाचे असे उद्गार काढले. दिक् व काल यांच्या पैल असणारा अनुभव त्यांनी घेतला व मुक्तपणे तो गायिला. मात्र तिथे पोचेपर्यंतचा त्यांचा संघर्षही विलक्षण होता.. संत स्त्रियांच्या बाबत हे सहज घडले नाही. संत स्त्रियांना त्यासाठी जबरदस्त संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे तिचा संघर्ष आणि तिचे जखमी होणे यांचे दर्शन त्यांच्या वचनांतून स्पष्टपणे घडते… प्रपंचाचा त्याग करून ज्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, शोधासाठी प्रवृत्त झाल्या…

मराठी साहित्य विश्वातील संत कवयित्री संत विठाबाई यांची आज ओळख करून घेऊया…

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्त्रीने नवऱ्याच्या जाचा विरुद्ध एकटीने संघर्ष करावा, त्यावर परखड शब्दांत काव्यरचना करावी व घर सोडून बाहेर पडावे हे सर्व धैर्य एका सामान्य मुलीकडे येते कुठून ? इतर महिलांप्रमाणे ती जाच सहन करीत कुढत जीवन कंठीत राहिली नाही.. अन्यायाविरुद्ध एका स्त्रीने केलेली त्या काळातील बंडखोरी म्हणूनच महत्त्वाची वाटते. भक्तिमार्गाने ती संतपदाला पोहोचली.

संत जनाबाई, बहिणाबाई यांच्याच परंपरेतील संत कवयित्री विठाबाई..
संत विठाबाई यांचा जन्म इ. स. १७९२ मधला. वडिलांचे नाव रामप्पा व आईचे नाव संतूबाई. या संत कवयित्रीने पंढरपुरास राहून सुमारे चार हजार पदांची निर्मिती केली असा उल्लेख आढळतो पण प्रत्यक्षात फारच थोडे व काहीच त्यांचे अभंग सापडतात. स्वामी चिदंबर दीक्षित यांचे शिष्य राजाराम यांना आपले गुरू मानले. त्यांनी गुरू राजाराम या सत्पुरुषाचे चरित्र रेखाटले. आत्मचरित्रपर अभंगही लिहिले.. आत्मचरित्रकार, चरित्रकार, पदकार, कवयित्री अशा विविध अंगांनी त्यांच्या वाड:मयाचा विचार करता येतो. विठाबाईंनी आपल्या जीवनातील प्रापंचिक अनुभव कथन केले आहेत.
“‘भ्रतार हो मजसी
वोढतो येकांती,
भोगावे मजसी
म्हणोनिया
वोढोनि बहुत मारितो
मजसी मध्यरात्री
जाणा समयासी”
पतीकडून होणारा छळ त्यांनी धीटपणे कवितेतून सांगितला. ज्या धीटाईने त्या स्पष्टपणे आपल्या पतीचे अत्याचार कथन करतात ते पाहता आजच्या स्त्री स्वातंत्र्याच्या काळातील स्त्रीमुक्तीच्या विचारांचा संबंध त्यांच्या अठराव्या शतकातील विचारांशी जोडता येईल. त्याकाळी स्त्रियांवरील सामाजिक बंधने कडक होती. अशावेळी एक स्त्री इतके स्पष्ट बोलण्याचे धाडस करते हे खरोखरच कणखर मनाचे प्रतिक आहे.

पतीच्या छळाला कंटाळून त्या घराबाहेर पडल्या. इतर सामान्य स्त्रियांप्रमाणे त्या अत्याचार मुकाटपणे सहन करीत राहिल्या नाहीत. त्यांची ही बंडखोरी म्हणूनच महत्त्वाची वाटते. विठ्ठलाची मूर्ती सोबत घेऊन त्या रानोमाळ भटकल्या.
“‘करुणा येऊ दे,
आई तुझे
मी लेकरू,
परदेसी मज
करेन का टाकलेसी’,”
अशी करुण आर्त साद त्या विठ्ठलाला घालतात. विठ्ठलाने स्वप्नात दृष्टांत दिला. त्यामुळे “‘व्यथा निमाली”’ असे त्या म्हणतात. संत नामदेवांचे अवतार चिदंबर स्वामी यांनी त्यांना दृष्टांत दिला. तोच सकाळी दारात दिंडी आली. त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण झाले. चिदंबर स्वामी हेच परमेश्वर असल्याचे जाणवले आणि त्या दिंडीबरोबर चिदंबर स्वामींच्या कुंदगोळीस गेल्या. तिथे त्यांचे आईवडील व पती शोधत आले. त्यांचे पती तेथे त्यांच्यावर चिडून त्यांना मारायला आले. त्यावेळी त्यांनी त्याला ठणकावून सांगितले, ‘तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही. देह नव्हे मी, माझे देह जाण, समजती जे देह अहंभाव..’
देह, मन, आत्मा, माणूस याविषयीचे त्यांचे चिंतन होते यावरून त्यांची आध्यात्मिक योग्यता दिसून येते.

मी म्हणजे माझा देह नाही. तुझा अधिकार माझ्या देहावर चालेल. माझ्यावर नाही असे त्या आपल्या पतीला परखडपणे सुनावतात. त्यांच्या चिंतनातून, अभ्यासातून हे नैतिक धैर्य त्यांना प्राप्त झाले होते. पतीला सुनावून त्या स्वामी चरणी लीन झाल्या. त्या मृत झाल्याचे समजून पती व आईवडील निघून गेले. स्वामींनी त्यांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि त्या शुद्धीवर आल्या… आपले उर्वरित जीवन त्यांनी स्वामी सेवेत घालविले…

संत विठाबाई यांनी चिदंबर स्वामींचे, राजाराम गुरुंचे व अनेक भक्तांची चरित्रे लिहिली.
सज्जनांना विरोध करणारे त्या काळातही होतेच.. त्यांच्या विरोधामुळे चरित्र नायकांचे चरित्र अधिकच उजळून निघाले. नाट्यपूर्ण घटना, कथात्मक प्रसंगांची गुंफण इत्यादी विशेष चरित्र वाड़्मयातून जाणवतात.

संत विठाबाईंनी नाममहिमा, संतमहिमा व अभक्तांचे वर्णन आदी विषयांवर काव्य लिहिले…
नाममहिमा सांगताना त्या म्हणतात की, ‘विठाबाई नामी असता प्रेमरंग, काय भजनी रंग नाचोनिया. भाव नसता राग स्वर जाण, संस्कार नसता प्रेत समजा पूर्ण.’ भक्तीशिवाय नुसते भजन व्यर्थ आहे. नामात जर प्रेम व भक्ती नसेल तर भजनात नाचण्याला काहीच अर्थ नाही. असे नाममहात्म्य व भक्ती महात्म्य सांगितले आहे…

समाजातील विसंगती, ढोंगीपणा यावर कोरडे ओढताना संत कवयित्रीचे शब्द अधिकच आवेशपूर्ण बनतात.. ‘कोडियाचे बहुत आहे गोरेपण, अहंकार ज्ञान तैसे समजा. विठाबाई म्हणे, तोंडावरी थुंका, जातो यमपुरा भोगावया’…”
तसाच दुसरा अभक्ताचे वर्णन करणारा अभंग, ‘”विठाबाई म्हणे, ज्यांसी नाही भक्ती, त्याने भगवे हाती धरू नये. काय गातो अर्थ त्यांनाच कळेना, राग गातो नाना आळवोनी’.” असे अभक्तांचे वर्णन केले आहे.

विठाबाईंच्या काव्याचा एकूण विचार करता त्यांच्या काव्यात रसाळपणा आहे. त्यांची वाणी प्रसन्न व प्रेमळ आहे पण तीच वाणी ढोंगी लोकांचे वर्णन करताना अधिक कठोर व फटकारणीची भाषा बनते. त्यांच्या काव्यातून त्यांची वैचारिक व आध्यात्मिक उंची जाणवते. त्यांची पदे ही केवळ स्वप्नरंजन नाहीत तर त्यांना वास्तवाची जोड आहे. त्यांचे काव्य हे आत्मानुभूतीच्या मुशीतून उजळून निघालेले आहे.. म्हणूनच तेजस्वी बनलेले काव्य आहे.त्यांनी जीवनात खूप दुःख भोगले त्यामुळे त्या जीवनाविषयी चिंतनशील बनल्या. त्यांच्या चिंतनाचे, अनुभवांचे सार त्यांच्या काव्यातून उमटले त्यामुळेच ते अधिक वाचनीय व ह्रदयस्पर्शी झाले आहे…

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. संत विठाबाई या खरच संतपरंपरेतील लखलखता तारा असंच म्हटलं पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments