संत सखुबाई
सखुबाई या विठ्ठलाच्या निस्सीम भक्त.. त्यांची महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध भक्तांमध्ये गणना होते… मराठी साहित्य विश्वातील संत कवयित्री संत सखुबाई यांची आज ओळख करून घेऊ या…
!! बा रे पांडुरंगा, केव्हा भेट देसी
झाले मी परदेसी तुजविण !!
महाराष्ट्र राज्यातील देवाच्या प्रसिद्ध भक्तांमध्ये ज्यांची गणना होते त्या संत सखुबाई..
संत सखुबाई विठ्ठलाच्या परमभक्त होत्या… त्यांच्या बालपणात त्यांनी देवाच्या प्रेमाचा कळस गाठला.. घरातील सर्व कामे करत असताना त्या सतत देवाचे नाव आपल्या मुखी घेत असतं.. मनात प्रभूच्या त्रिभुवन स्वरूपाचे ध्यान करत राहणे आणि त्या केशव, विठ्ठल, कृष्ण अशी नावे नेहमी आठवत असत…

कराडहून पंढरपूरला जाणार्या वारीत सहभागी व्हावे आणि पांडुरंगाचे दर्शन घ्यावे असे संत सखुबाई यांना वाटत होते परंतु
त्यांच्या सासूने त्यांना वारीला जाऊ दिले नाही आणि घरातील खांबाला बांधूनच ठेवले. संत सखुबाई यांच्यामध्ये पंढरीनाथाच्या दर्शनाची इतकी तीव्र ओढ होती की साक्षात् पांडुरंगाला त्यांना मुक्त करण्यासाठी धावत यावे लागले… पांडुरंगाने खर्या सखुला बंधनातून मुक्त करून थेट पंढरपुरात पोहोचवले आणि त्यांचे म्हणजेच सखुबाई यांचे रूप घेऊन स्वतःला खांबाला बांधून घेतले..

पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या संत सखुबाई यांनी पांडुरंगाचा धावा चालू केला व त्या पांडुरंगाला आळवू लागल्या. त्या म्हणतात…
!! बा रे पांडुरंगा केव्हा भेट देसी
झाले मी परदेसी तुजविण
तुजविण सखा मज कोणी नाही
वाटते चरणी घालावी मिठी
ओवाळावी काया चरणावरोनी
तेव्हा चक्रपाणी भेटशील !!
संत सखुबाई यांची निस्सीम भक्ती आणि भोळया भावामुळे पांडुरंग त्यांच्यावर प्रसन्न झाले.. पांडुरंगाचे रूप बघून संत सखुबाई धन्य धन्य झाल्या.. त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच त्यांनी आपले प्राण ठेवले.
दिंडीस आलेल्या त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पंढरीत ज्या गावकऱ्यांनी संत सखुबाई यांचे अंत्यसंस्कार केले होते ते संत सखुबाई यांच्या घरी आले तर संत सखुबाई त्यांना घरकाम करतांना दिसल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी संत सखुबाई यांच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला.. तो ऐकून त्यांनी संत सखुबाई यांना खरा प्रकार काय आहे ते विचारले.. संत सखुबाईंनी सारी घटना कथन केली. ती ऐकून गावकरी स्तब्ध झाले… संत सखुबाईं यांच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चात्ताप झाला. ..
अश्या या महान संत सखुबाई यांची समाधी कराड नगरीत कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमावर आहे. आजही पंढरपूरला निघालेले वारकरी आवर्जून संत सखुबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतात.
!! तुजविण सखा, मज कोणी नाही
वाटते चरणी घालावी मिठी
ओवाळावी काया चरणावरोनी !!
संत सखुबाई यांचा ईश्वराच्या ठायी असलेला अपार भक्तीभाव आणि त्याला भेटण्याची अनिवार तळमळ यांमुळे स्वत: देवच त्यांच्या भेटीसाठी आले..

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800