संत भागूबाई
मराठी साहित्य विश्वातील संत कवयित्री संत भागूबाई यांची आज ओळख करून घेऊ या.
संत भागूबाई या भक्ती संप्रदायातील संत कवयित्री होत्या.. त्या महार जातीच्या होत्या..
श्रीसकलसंतगाथा मध्ये त्यांना ” भागू महारीन” असे म्हटले आहे.
मध्ययुगीन मराठी साहित्याच्या इतिहासात ‘भागूबाई’ नामक दोन कवयित्री आहेत..
पहिली संत भागूबाई ही संत चोखामेळांच्या परिवारातील आहे. अभ्यासकांच्या मते त्या चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात होऊन गेल्या. त्यांचे फक्त पाचच अभंग उपलब्ध आहेत.. त्यातील त्यांच्या आत्मोल्लेखावरून त्या त्या काळातील अस्पृष्य समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मलेल्या असाव्यात हे लक्षात येते. पाच अभंगांतूनही त्यांची योग्यता जाणवते. “आलो तुझ्या दर्शनाला, भेट द्यावी हो आम्हासी सर्व संत मंडळी हो राऊळी,
मी रे एकटी तळमळली देव आले हो बाहेरी
मज नेले खांद्यावरी
सर्व संत देवळात आनंद लुटत आहेत आणि राऊळा बाहेर आपण एकटीच तळमळत आहोत असे वर्णन आहे. पण ती एकटीच बाहेर असताना स्वप्नरंजन करतेय.. विठ्ठल स्वतः बाहेर आला व त्याने खांद्यावर बसवून आपल्याला आत नेले असे त्या सांगत आहेत. ‘आलो तुझ्या दर्शनासी, भेट द्यावी हो आम्हासी’, अशी विठ्ठल दर्शनाची तळमळ व्यक्त केली आहे.
संत ज्ञानेश्वरांविषयीचा कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे. ‘‘कृपेच्या सागरा, मायबापा ज्ञानेश्वरा, देहभाव हे सोडून, बा माझे धरा ध्यान.’’ ‘‘जेणे पाषाण तारिले, मुखे वेद पशू बोले, भिंती चालविली, ऐसी कृपाळू माऊली.’’ संत ज्ञानदेव म्हणजे विश्रांतीचे स्थान असल्याचे त्या म्हणतात. ‘पाषाण तारिले’ या शब्दांचा वाक्यार्थ न घेता लक्ष्यार्थ घ्यायला हवा. ‘पाषाण तारिले’ हे वर्णन सेतू बंधनाच्या प्रसंगातील रामायणातील नव्हे. ‘पाषाण तारिले’ म्हणजे मूढ, मंद, पाषाणासारखे निर्बुद्ध लोक ज्ञानदेवांच्या ज्ञानामुळे तरले असा सूचक अर्थ घ्यायला हवा. तसेच विठ्ठला विषयीचा आत्मभाव व्यक्त केला आहे.
‘मागेपुढे नाही कोणी, सख्या विठ्ठलावाचोनि.’’ विठ्ठल हेच तिचे सर्वस्व होते. ‘‘भागू म्हणे आता झाले निर्भयी.’’ आता कोणाचेच भय शिल्लक राहिले नाही असे सांगणाऱ्या संत भागूबाई चौदाव्या- पंधराव्या शतकातच खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीचा स्वर आठवतात.. भयमुक्त होऊन स्वातंत्र्याचे गीत त्या गातात..
दुस-या संत कवयित्री भागूबाई ह्या संत तुकाराम यांची कन्या म्हणून ओळखल्या जातात… या संत भागूबाई यांच्या नावावर फक्त दोनच अभंग उपलब्ध आहेत.
ते खालील प्रमाणे ….
विठ्ठलाला आळवताना त्या म्हणतात..
१) मी रे अपराधी मोठी मज घालावें बा पोटीं
मी तान्हुलें अज्ञान
म्हणू का देऊ नये स्तन
अवघ्या संतां तूं भेटसी मी रे एकली परदेशी
भागू म्हणे विठोबासी मज धरावें पोटासी
वात्सल्यभावातून केलेली ही भक्ती त्यांच्या स्त्रीमनाचे दर्शन घडविते
तर…
२) साधूचा संग धरीरे श्रीहरी स्मरणीं रंगली वाणी ॥
भक्ती धरी दृढ, काम त्यजी रे
साधूचा संग धरीरे ॥
मायाजाळे हें मृगजळ पाहे
गुंतसी परी गती नाही बरीरे ॥
दुस्तर डोहीं बुडसी पाही तारूं हें विठ्ठलनाम धरी रे ॥
कीर्तनरंगी होसी अभंगी भागु बघ तुज नमन करी रे ॥
या अभंगात संतसंग माहात्म्य पारंपारिक पद्धतीने त्या वर्णन करतात..
त्यातील दुसरा अभंग साधुसंतांच्या संगतीचा गौरव करणारा आहे. ‘‘साधूसंग धरी रे, श्रीहरी स्मरणी रंगली वाणी, भक्ती धरी दृढ काम तजी रे, साधूसंग धरी रे. माया जाळ हे मृगजळ पाहे, गुंतसी परी गती नाही बरी रे.’’
असे अत्यंत गेय पद त्यांनी रचले आहे. यावरून सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या या भागूबाई नामक संत कवयित्री यांना संगीताचे ठेक्याचे ज्ञान असावे असे दिसते.. दिसून आलेले आहे..
जीवनातील मायाजाल हे एक मृगजळ आहे. मायारुपी डोहातून तरून जाण्यासाठी ‘विठ्ठलनाम” हे तारू आहे म्हणून कीर्तनरंगात ‘अभंग’ हो. अभंगातील एकरूपता, भंगरहितता, ऐक्य, एकतानता हे सर्वच त्या एका शब्दात सुचवितात. संत भागूबाई यांच्या काव्यातील गेयता पाहता त्यांच्या आणखीही रचना असाव्यात पण त्या आज उपलब्ध नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी या संत स्त्रियांनी केलेली ही काव्यरचना खरच अभंग आहे…

— लेखन : संगीता कुलकर्णी ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800