मराठी साहित्याच्या दृष्टिने विचार करता महानुभाव साहित्य आणि वारकरी संतांचे साहित्य या अंगानेच प्रथम विचार करावा लागतो.
महानुभाव पंथातील संत कवयित्री महदंबा यांनी कृष्ण रुक्मिणी स्वयंवराचे धवळे अत्यंत सहजपणे गायले.. धवळे हे मराठी साहित्यातील आद्य स्त्री काव्य मानले जाते.
संत कवयित्री मुक्ताबाई ताटीचे अभंग, काही स्फुट अभंग रचना त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची साक्ष देतात.
संत जनाबाई स्वतःकडे नामदेवाचे दास्यत्व घेत “दळिता कांडिता” अनंताला गात राहिल्या..
संत कान्होपात्रा आपल्या भावबळावर संतपदाला पोहोचल्या.. भावगीते श्रेष्ठ ठरावीत अशी त्यांची अभंग रचना.
तर रामदास शिष्या वेणाबाईने “सीतास्वयंवर” लिहून आख्यानकविता लिहीणारी पहिली स्त्री म्हणून अग्रपुजेचा मान मिळवला.
दळताना, कांडताना, घरातील कामे करताना, पाणवठ्यावर असताना एकूणच घरातील आणि घराबाहेरची कामे करताना स्त्री गात होती, व्यक्त होत होती आणि संवाद साधत होती.
मराठीतील या संत कवयित्रींचे योगदान सर्वश्रुत आहेच.
अलिकडच्या कालखंडातील म्हणजे सतराव्या शतकापर्यंतच्या कालखंडातील संत स्वरूप स्त्रिया वंदनीय आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवाती पासून मराठीत स्त्री-आत्मकथनाची सुरूवात झाली असल्याचे दिसून येते..
मराठी साहित्यात अनेक लेखिकांनी स्त्रियांच्या मनभावना प्रगट करणारे लेखन केले.. विपुल प्रमाणात साहित्य लिहिलेले आहे…
कथा-कादंबरी हा समाजाशी आतून निगडित असलेला साहित्य प्रकार आहे….
कलात्मक, वैचारिक, संशोधनात्मक, समीक्षात्मक, ललित आणि ललितेतर, दलित, ग्रामीण, स्त्रीकेंद्री, आदिवासी अशा उपेक्षित जीवनाच्या चित्रणातून मराठी साहित्य आशय संपन्न झाले आहे…लेखनामध्ये स्त्री साहित्यिकांचे प्रचंड मोठे योगदान आहे. मराठी कथा कादंबरीचे दालन स्त्री-लेखिकांनी समृद्ध केले आहे..
मराठी साहित्याच्या वाटेवरून जाणाऱ्या आधुनिक स्त्री साहित्यिका/लेखिकांचा आढावा पुढील साहित्यातील तारांगणातील तारका यामधून घेऊ या..

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800