ताराबाई शिंदे
एकाेणीसावे शतक खऱ्या अर्थाने संक्रमणाचे शतक मानले जाते. सत्तांतराचे, नव्या जीवन जाणिवांचे, वैचारिक कलहाचे, सुधारणांचे शतक म्हणून या शतकाकडे पाहता येईल, महत्त्वाचे म्हणजे आत्मपरिक्षणाचे शतक असंही म्हणता येईल. रूढी, परंपरांचं आंधळेपणाने स्वीकार न करता त्यांना वैचारिकतेचे आव्हान देणारे शतक प्रबाेधनाचे शतक आहे.
ताराबाई शिंदे हे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील एक धगधगते पर्व. इतिहासातील असे एक नाव आहे, ज्याने संपूर्ण इतिहास घडविला. समाजामध्ये क्रांती घडवून आणली..
भारतीय समाजसुधारक, स्त्रीवादी आणि लेखिका तसेच स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीचा तर्कशुद्धपणे वेध घेणारी, स्त्री पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम स्पष्टपणे मांडणारी एकोणीसाव्या शतकातील विचारवंत स्त्री ताराबाई शिंदे यांचा जन्म १८५० साली व-हाड (विदर्भ) प्रांतातील बुलढाणा येथे एका सधन कुटुंबात झाला.
ताराबाई शिंदे ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या.१८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या. ही त्यांची सर्वात प्रसिद्ध साहित्यकृती आहे. तसेच ते
भारतातील पहिले स्त्रीवादी पुस्तक मानले जाते.
स्त्रीवादी भूमिकेचा जागतिक स्तरावर एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच पाया घालणारा हा छोटेखानी ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एक अक्षरलेणेच.

त्यांनी लिहिलेला “स्त्रीपुरुष-तुलना” हे पुस्तक म्हणजे स्त्रीमुक्ती विचारसरणीची एक क्रांतिकारक सुरुवातच होती. यात त्यांनी स्त्रियांच्या व्यथा-वेदनांना प्रथमच वाचा फोडली पण प्रक्षोभक म्हणून त्यावर टीका झाली.यात ताराबाईंची बहुश्रुतता, तैलबुद्धी, समतोल विचार व शास्त्रशुद्ध दृष्टिकोण प्रकट होतो.
स्त्री शिक्षणाचा फारसा प्रसार न झालेल्या त्या काळात ताराबाई यांच्यासारख्या मराठा समाजातील एका स्त्रीने समाजाच्या ज्वलंत प्रश्नासंबंधी इतक्या परखडपणे आपले विचार या ग्रंथातून मांडावेत ही अपवादभूतच कृती होती.
ताराबाई शिंदे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार समाजासमोर आले ते त्यांनी लिहिलेल्या ‘स्त्री पुरुष तुलना’ या पुस्तकामुळे.
शिक्षणाने त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. त्या मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी शिकल्या. शिक्षणामुळे त्यांना वाचनाची आवड होती. स्त्री असूनही घोडा चालवायला त्या शिकल्या. ताराबाई शेतीच्या कामातही लक्ष घालीत. तसेच कोर्टाचीही कामे करत. ताराबाईंनी न्याय व्यवस्था आणि कृषी या दोन्ही क्षेत्रात ही काम केले.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांच्याकडे एक धाडसी स्त्री म्हणून पाहिले गेले, जिच्याकडे पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्येही दुर्गुण असू शकतात हे मान्य करण्याची आणि त्यांच्यासाठी समाजाला जबाबदार धरण्याची हिम्मत होती. तसेच किमान हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या समाज रचनेच्या औचित्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची हिंमत होती.
ताराबाईं यांच्याकडे उच्च दर्जाची बुद्धिमत्ता, वक्तृत्व आणि स्त्रियांच्या दुर्दशेबद्दल आस्था होती. महात्मा फुलें यांचे विचार त्या स्वत:साठी प्रत्यक्षात उतरवत.

ताराबाई एक निपुण वाचक होत्या. वर्तमानपत्रे, मासिके, विचारधारे वरील निबंध पुस्तके, संतांच्या कविता पंडिती कविता, महात्मा फुले, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे लेखन त्यांनी वाचले.
स्त्री समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले. तसेच त्यांनी स्त्री शोषणाविरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.
१९७५ साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरे झाले. त्यावेळी ‘स्त्री पुरुष तुलना’ हे पहिल्या प्रकाशनानंतर काही काळ चर्चेत राहिलेले पण कालांतराने विस्मरणात गेलेले पुस्तक पुन्हा समोर आले. त्यानंतर स्त्री अभ्यासकांनीही या पुस्तकाची समीक्षा केली. आपले परखड विचार निर्भिडपणे मांडणाऱ्या ताराबाईं यांच्या लेखनाला उजाळा मिळाला. त्यांनी पेरलेल्या क्रांतिकारी बीजांना पुन्हा खतपाणी मिळाले. आज या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहेत.
आधुनिक भारताचे जनक (मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया) या इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा संपादित पुस्तकात ताराबाई शिंदें यांच्या लेखनाचा समावेश आहे.
१९९५ मध्ये बिजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली त्यावेळी प्रवेशद्वाराला ताराबाई शिंदे यांचं नाव दिलं गेलं.
सामाजिक नियमांना आव्हान देण्यात आणि औपनिवेशिक भारतात महिलांच्या हक्कांसाठी वकिली करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या ताराबाई शिंदे यांचे इ.स. १९१० मध्ये निधन झाले.

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
ताराबाई शिंदे या भारतातील एक जाज्वल्य सत्यशोधक कार्यकर्त्या.प्रखर स्त्री वादी लिखाणाचे त्यांचे पुस्तक (स्त्री-पुरुष तुलना)हे मराठीतील सामाजिक आशयाचा दस्तावेज.