Monday, July 14, 2025
Homeलेखसाहित्य तारका : १७

साहित्य तारका : १७

लक्ष्मीबाई टिळक

मराठी वाङ्मयामध्ये स्त्रीवादी लेखिका म्हणून नावाजले गेलेले नाव लक्ष्मीबाई टिळक मराठी लेखिका आणि कवयित्री..
कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांच्या पत्नी..माहेरचे नाव मनकर्णिका (मनूताई) गोखले.

लक्ष्मीबाईं यांचे बालपण त्यांच्या आत्या रखमाबाई गोविंद खांबेटे ह्यांच्या घरी गेले..
सामाजिक रूढी-परंपरेच्या कालखंडात एका ब्राह्मण कुटुंबात १ जून १८६६ रोजी जन्मलेल्या लक्ष्मीबाई यांचा वयाच्या ११ वर्षी नारायण वामन टिळक यांच्याशी विवाह झाला.

कवी टिळकांनी ‘”माझी भार्या”’ ह्या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे लक्ष्मीबाई रूपाने सामान्य होत्या. पतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्या त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या. पाच वर्षांनंतर त्यांनी धर्मांतर केले.
ख्रिस्ती धर्मावर खरीखुरी श्रद्धा बसल्यानंतर डोळसपणे तो धर्म त्यांनी स्वीकारला. ८ जुलै १९०० रोजी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी वेशभूषा बदलली नाही. त्यांनी अखेरपर्यंत नऊवारी साडी नेसली.
‘ख्रिस्ती धर्माचा कुंकू न लावण्याचा काही संबंध येत नाही तेव्हा नेहमी प्रमाणे कुंकू लावण्यास काहीच हरकत नाही असे ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या टिळकांनी सांगितले होते. तरी एका मडमेला वचन दिले होते म्हणून लक्ष्मीबाईंनी कुंकू लावणे सोडून दिले होते. त्यांच्या अंगावर दागिना नसे कारण पैसा हातात आला की टिळकांकडून तो लगेच खर्च होई.

लक्ष्मीबाई हाती आलेला पैसा जपून वापरत.टिळकांच्या विक्षिप्त आणि उदार स्वभावापायी लक्ष्मीबाईं यांना अनेकदा मनस्ताप सोसावा लागला तरीही त्या कधी कुढत बसल्या नाहीत. तश्याही परिस्थितीत त्या आनंदी आणि उत्साही असत. स्वतः विनोद करीत व दुसर्‍याने केलेल्या विनोदावर “‘हसण्याचा रोग’’ असावा इतक्या अनावर हसत.

लक्ष्मीबाईंच्या माहेरी शिक्षणाचे वातावरण नव्हते. लग्नानंतर टिळकांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. कै आणि खै, क्ष आणि ज्ञ, ड आणि ढ अशा अक्षरांचा क्रम बोटे मोडल्याशिवाय त्यांना आठवत नसे. जोडाक्षरे लिहिणेही त्यांना जमत नसे.

१९१३च्या सुमारास लक्ष्मीबाई यांनी कीर्तनकलेचे व ईश्वरविद्येचे शिक्षण घेतले. याच काळात लक्ष्मीबाईंनी सामाजिक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. टिळक धर्मांतर करणार ही बातमी कानावर येताच लक्ष्मीबाई कासावीस झाल्या आणि ‘म्हणे जातो सोडून नाथ माझा, अता कवणाला बाहू देवराजा….’ ही चार ओळींची कविता
लिहिली. हे लक्ष्मीबाई   यांचे पहिले काव्यलेखन.

लक्ष्मीबाईंच्या कविता टिळक दुरुस्त करत व प्रसिद्धीला पाठवत. लोकांना कवी टिळक परिचित होते. टिळकच पत्नीला कविता लिहून देतात असा काहींचा समज होता. ‘मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘करंज्यातला मोदक’ ही कविता वाचून पंढरपूरच्या एका बाईने लक्ष्मीबाईंकडे तसा खुलासा मागितला होता. बाईंना रात्री कविता सुचत मग जमिनीवर आगपेटीच्या काडीने किंवा खडूने किंवा कोळशानेही त्या लिहून काढीत. एकदा तर पावणे तीनशे ओळींची कविता त्यांनी अशी लिहिली होती. बालकवींनी नंतर ती कागदावर लिहून काढली.

लक्ष्मीबाईं यांचे शिक्षण केवळ लिहिण्यावाचण्या पुरतेच झालेले होते. तथापि जीवनातील दुःखांना आणि ताणतणावांना तोंड देत असताना त्यांच्यातील सुप्त कवित्वशक्ती प्रथम उत्स्फूर्तपणे प्रकट झाली. त्यांची पहिली कविता टिळक धर्मांतर करणार असे समजल्यानंतरच्या वेदनेतून लिहिली गेली.
रेव्हरंड टिळकांनी ओवीवृत्तात लिहावयास घेतलेले “ख्रिस्तायन” हे प्रदीर्घ काव्य पूर्ण करण्याचे काम लक्ष्मीबाईंनी रेव्हरंड टिळकांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी हाती घेऊन तडीस नेले. एकूण ७६ अध्यायांच्या ह्या काव्यातील पहिले ‘ख्रिस्तायन’चे साडेदहा अध्याय टिळक यांनी लिहिले होते .पुढे लक्ष्मीबाई यांनी तो ग्रंथ चौसष्ठ अध्याय लिहून पूर्ण केला.६४ अध्याय लक्ष्मीबाईंचे आहेत. त्यामुळे ह्या काव्याचे बहुतांश कर्तृत्व लक्ष्मीबाईंकडेच जाते.एवढी दीर्घ आख्यानक रचना करणाऱ्‍या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत.त्यांची स्फुट काव्यरचना भावगीतात्मक असून “भरली घागर “(१९५१) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. संसारातील सुखदुःखांचा, उत्कट ईश्वरनिष्ठेचा सहजाविष्कार यात आढळून येतो.बालगीते, देशभक्तिपर गीते अशाही काही रचना त्यांनी केलेल्या असून त्याही ह्या काव्यसंग्रहात अंतर्भूत आहे.

तथापि ज्या ग्रंथामुळे लक्ष्मीबाईंचे नाव मराठी साहित्यसृष्टीत अजरामर झाले तो त्यांचा ग्रंथ म्हणजे “स्मृतिचित्रे”. हा चार भागांत असून त्याचा पहिला भाग १९३४ साली, दुसरा १९३५ साली आणि तिसरा व चौथा १९३६ साली प्रसिद्ध झाला. 

“स्मृतिचित्रे’च्या चार भागांपैकी तीन भाग टिळकचरित्राने व्यापले आहेत. ‘स्मृतिचित्रे’चा तिसरा खंड १५ डिसेंबर १९३५ रोजी आचार्य अत्रे यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला.
“स्मृतिचित्रे’च्या तिसर्‍या भागाच्या प्रकाशनाच्या वेळी आचार्य अत्रे म्हणाले, “रणांगणातून घायाळ परंतु विजयी होऊन परत आलेल्या वीराकडे पाहून त्याच्या अंगावरील जखमा मोजताना स्वकीयांना जो आदर वाटतो तोच आदर ‘स्मृतिचित्रे’ वाचून श्रीमती लक्ष्मीबाईंबद्दल वाटतो.”

हे आत्मचरित्रात्मक पुस्तक साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरला नी हे आत्मचरित्रात्मक पुस्तक साहित्य प्रवाहातील मानदंड मानले जाते.
संपूर्ण कालखंड जिवंतपणे वाचकांसमोर उभा करण्याचे सामर्थ्य स्मृतिचित्रांच्या पानापानांत आहे. शालेय शिक्षणाचा संस्कार न झालेल्या लक्ष्मीबाई यांनी एका अत्यंत सुसंस्कृत मनाने आपल्या विवाहपूर्व व विवाहोत्तर आठवणी लिहावयास घेतल्या खऱ्‍या परंतु प्रत्यक्षात त्या आठवणींचे स्वरूप असे झाले की त्यांची व्याप्ती ह्या सीमित जीवनापुरती मर्यादित न राहता त्यांतून अगदी स्वाभाविकपणे प्रकट होत गेले आहे ते विविधरंगी, विविधढंगी मानवतेचे चित्र.

“स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाने लेखिकांचे साहित्यातील दालन समृद्ध केले. या पुस्तकामुळे ऐतिहासिक दस्तावेज मराठी भाषेमध्ये टिकून राहिला आहे.

लक्ष्मीबाई टिळक जश्या बोलत तश्याच लिहीत. त्यांच्या तोंडी आणि लेखी भाषेत फरक नसे हीच त्यांच्या लिखाणाची यशस्विता..!

नाशिक येथे १६ सप्टेंबर १९३३ रोजी माधव जूलियन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनाच्या स्वागताध्यक्ष लक्ष्मीबाई होत्या. तर ह्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या त्या पहिल्या स्त्री-अध्यक्ष होत्या. १९३५ मध्ये आचार्य अत्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली नासिक शहरात त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला.
मराठी साहित्यवाङ्मयाला समृद्ध करणा-या या साहित्यलक्ष्मीचं २४ फेब्रुवारी १९३६ रोजी यांचे निधन झाले..

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments