मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर
मराठी साहित्यात अनेक लेखिकांनी स्त्रियांच्या मनभावना प्रगट करणारे लेखन केले.. जीवनाच्या चित्रणातून मराठी साहित्य आशय संपन्न झाले आहे. मराठी कथा कादंबरीचे दालन स्त्री-लेखिकांनी समृद्ध केले आहे…
मराठी साहित्य विश्वातील साहित्य तारका मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर यांनी आज ओळख करून घेऊया..
काशीबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक अशा लेखिका मराठी साहित्यात लिहित्या झाल्या तरी स्त्रीवादाची खरी मुहुर्तमेढ रोवली ती मालतीबाई बेडेकर यांनी..स्त्रियांचा खराखुरा आवाज आपल्या वाङ्मयाद्वारे धीटपणे प्रथमच मांडणार्या मालतीबाई बेडेकर.. यांचा जन्म १ ऑक्टोबर १९०५ रोजी त्यांच्या आजोळी आवास तालुका अलिबाग येथे झाला… त्यांचे जन्मनाव बाळूताई असे होते. त्या हिंगणे स्त्री-शिक्षण संस्थेतून पदवीधर झाल्या. त्यांनी लेखन करताना विभावरी शिरूरकर हे टोपणनाव घेतले.. (त्या शिरूरच्या होत्या म्हणून शिरूरकर आणि विभावरी म्हणजे रात्र…लेखिकेने अंधारात राहणे पसंत केले म्हणून) त्या त्याच नावाने मानमान्यता पावल्या…
विवाहानंतर त्या मालती बेडेकर झाल्या. त्यांनी मालती बेडेकर या नावानेही काही लेखन केले…
१९३३ मध्ये विभावरी शिरुरकर या टोपणनावाने त्यांनी ‘कळ्यांचे नि:श्वास’ हा कथासंग्रह लिहून मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली… मुळात स्त्री-वादाचा पाया हा स्त्रीला वेगळे अस्तित्व आहे,वेगळे व्यक्तिमत्व आहे ही मान्यता मिळवण्यात आहे…!

स्त्री जीवनातील अनुभवांना साहित्याच्या रूपात उतरवतांना फक्त कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव परिस्थितीची चिकित्सा न करता स्त्री मनाच्या व्यथांची जाणीव करून देणारे मराठी साहित्य मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर यांनी लिहिले…
विसाव्या शतकाच्या तिस-या दशकात ह्या लेखिकेने स्त्रीमनाचा ठाव घेणा-या साहित्यातून समाजासमोर एक झंझावाती वादळ निर्माण केले…
मराठी वाङमयाच्या इतिहासात इ.स. १९३३ ते १९४५ या काळात विभावरी शिरूरकर यांच्या लेखनाने एक वादळ निर्माण केले. १९३३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘”कळ्यांचे निश्वास’” या संग्रहाने स्त्रियांच्या कथा साहित्यात परिवर्तनाला सुरूवात झाली. तसेच “हिंदोळ्यावर”’ आणि ‘ “विरलेले स्वप्न’” या दोन्ही कादंब-यांनी हा प्रवाह अधिक व्यापक झाला…
या सर्व लेखनाची निर्माती करणारी विभावरी शिरूरकर ही व्यक्ति कोण ? या विषयी कुतुहल निर्माण झाले…
विभावरी शिरूरकर या नावाने प्रसिद्ध होणारे लेखन मालतीबाई बेडेकर लिहित होत्या याचे रहस्य १९३३ ते १९४६ पर्यत सुमारे तेरा वर्षे उलगडले नव्हते. स्त्रियांवरील एका व्याख्याना प्रसंगी त्यांनीच ते प्रकट केले…
विरलेले स्वप्न’ (१९३५), ‘बळी’ (१९५०), ‘जाई’ (१९५२), ‘दोघांचे विश्व आणि इतर कथा’ (१९५७), ‘शबरी’ ही सर्व पुस्तके विभावरी शिरूरकर या नावाने लिहिलेली आहेत तर ‘रानफुले’, ‘हिंदू-व्यवहार धर्मशास्त्र’, ‘स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा’ ही पुस्तके बाळूताई खरे या नावाने आणि ‘चार भाषांतरे’, ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ आणि ‘काळाची चाहूल’, ‘संकटमुक्त स्त्रियांचे पुनर्वसन’(१९६४), ‘उमा’ (१९६६); काही नाटके, ‘साखरपुडा’ (१९६२) चित्रपट ,मनस्विनीचे चिंतन, प्रौढ साक्षरांसाठी लेखन अशी विविध वाङ्मयीन कामगिरी त्यांच्या मालतीबाई या नावावर आहे, ‘बळी’, ‘शबरी’, ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ व ‘काळाची चाहूल’ यांना राज्यपुरस्कार मिळालेले आहेत. ‘कळ्यांचे निःश्वास’चा पुरस्कार टोपण नावामुळे घेता आला नाही.. त्यांची लेखणी कथा, कादंबरी, संशोधन अशा सर्व लेखन प्रकारांत यशस्वीपणे फिरली होती…

त्यांच्या बहुतेक कादंबऱ्यांची गुजरातीत भाषांतरे झाली आहेत.. विभावरी शिरूरकर यांनी विविध स्त्रीकेंद्री पैलू अत्यंत समर्पक आणि आधुनिकतेला साजेसे मांडले आहेत…
एकूण स्त्रियांच्या संदर्भात काळाच्या पुढचं लिखाण केल्यामुळे त्यांना बंडखोर लेखिका असं म्हटलं जातं…
अखिल भारतीय स्त्री परिषदेच्या अध्यक्षा म्हणून नागपूर, कर्हाड, जळगाव, अलिबाग, मडगाव येथे त्यांची निवड झाली. १९५२ साली पीस मिशनतर्फे त्यांना रशियाला आमंत्रित केले गेले होते. प्रौढशिक्षण व बालशिक्षण ह्या समित्यांवर नियुक्ती तसेच इंग्लंड, रशिया, फ्रान्स येथील स्त्री-जीवनाचा अभ्यास या कारणाने त्या देशांना भेटी झाल्या..
१९३७ ते १९४० ही तीन वर्षे सोलापूर येथील बॅकवर्ड क्लास ऑफिस मध्ये, रिमांड व रेस्क्यू होममध्ये स्त्री-विभागात पर्यवेक्षिका म्हणून त्या काम करीत होत्या…
१९८१ साली मुंबई येथे भरलेल्या ‘समांतर’ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले…
प्रदीर्घ वाङ्मयीन कामगिरीसाठी १९९२ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार व जुलै १९९८ मध्ये साहित्य संस्कृती मंडळाच्या गौरववृतीने त्यांना सन्मानित करण्यात आले…
मालतीबाईं यांचे लेखन आजही कालबाह्य झालेलं नाही हेच त्यांचं श्रेष्ठत्व…
लेखिका, विचारवंत, सामाजिक ऋण मानून काम करणारी बंडखोर स्त्री म्हणजे मालतीबाई बेडेकर यांचे निधन ७ मे २००१ रोजी झाले..

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800