Wednesday, September 17, 2025
Homeलेखसाहित्य तारका : २

साहित्य तारका : २

मुक्ताबाई
मराठी साहित्यात स्त्रियांचे स्थान मोठे आहे. महदंबा यांना महानुभाव पंथाने तर मुक्ताई, जनाबाई यांना वारकरी संप्रदायाने लिहिते केले.
अश्या लेखिकांचा थोडक्यात आढावा घेऊया ” साहित्य तारका” यामधून. पहिल्या भागात आपण महदंबा यांच्या जीवनाचा आणि साहित्याचा परिचय करून घेतला. तर आजच्या दुसऱ्या भागात मुक्ताबाई यांचे योगदान पाहू या….
– संपादक

प्राचीन मराठी वाङ्ममयात संत कवयित्रींनी मोलाची भर घातली आहे..
लौकिकाचे बंध झुगारून, स्त्रीत्वाच्या पलीकडे जात ज्यांनी चैतन्यतत्त्वाचा शोध घेतला, अशा संत कवयित्रींची परंपरा आपल्या संस्कृतीने जपली आहे. त्यांनी मूल्यांना नवे अर्थ दिले. प्रेम, पातिव्रत्य, निष्ठा, भक्ती यांचे संदर्भ त्यांनी अलौकिकाशी जोडले. मळलेल्या वाटा सोडून, धैर्याने भगव्या वाटांवर पाऊल टाकणार्‍या त्या सार्‍या जणी..

तुकारामांच्या समकालीन वारकरी संप्रदायात सत्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, जनाबाई यांचे स्धान अद्वितीय आहे…

“”मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी “”
असे लिहिणा-या मराठी संत कवयित्री आणि ज्ञानदेवांच्या धाकट्या भगिनी संत मुक्ताबाईं..

संत मुक्ताबाई या मुक्ताई या नावाने ओळखल्या जात.
ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे.
चांगदेवांचे गर्वहरण करणारी ही मुक्ताई.. “‘लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी, केले देशोधडी महान संत”’ असे उद्गार काढणारी मुक्ताबाई..!

संत मुक्ताबाईचे गुरु म्हणजे त्यांचेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हे होय..तर चांगदेवांच्या गुरू मुक्ताबाई… त्यांनी योगी चांगदेव यांना ’”पासष्टी’” चा अर्थ उलगडून दाखविला त्यामुळे चांगदेव हे मुक्ताबाईंचे शिष्य झाले..

संत मुक्ताबाईं यांच्यावर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर मुक्ताबाईला अमृत संजीवनीची प्राप्ती झाली..
संन्याशाची मुले म्हणून हिणवल्याने रुसून बसलेल्या ज्ञानदेवांना मुक्ताईने खूप विनंत्या केल्या.. त्याच ‘”ताटीचे अभंग’” या नावाने प्रसिद्ध आहेत.

ताटी म्हणजे दरवाजा बंद करून झोपडीत बसलेल्या ज्ञानेश्वरांचे सांत्वन करणारे अभंग लिहिले, त्यालाच ‘ताटीचे अभंग’ म्हणतात…
संत मुक्ताबाईनीं ताटीचे एकूण बेचाळीस अभंग केलेले आहेत . त्या अभंगामध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेल्या आपल्या भावाला म्हणजेच संत ज्ञानेश्वरांना दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केलेली आहे…

संत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले आहेत…संत मुक्ताबाईं यांचे ताटीचे अभंग म्हणजे संतप्रणित प्रबोध सृजनाचे एक अलौकिक दर्शन.. एकीकडे लौकिकाची जाणीव तर दुसरीकडे अलौकिकाची अनुभूती देणारा प्रेम उपदेश आहे..
—ताटीचे काही अभंग—

संत तोचौ जाणा जगी । दया क्षमा ज्याचे अंगी ।।१।।

लोभ अहंता नये मना । जगी विरक्त तोचि जाणा ।।२।।

इह परलोकि सुखी । शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी ।।३।।

मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।४।।
……….

एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले ।।१।।

उठे विकार ब्रम्ही मुळ । अवघे मायेचे गाबाळ ।।२।।

माया समुळ नुरे जेव्हा । विश्व ब्रम्ह होईल तेव्हा ।।३।।

ऎसा उमज आदि अंती । मग सुखी व्हावे संती ।।४।।

काम क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।
………..

ब्रम्ह जैसे तैश्या परी । आम्हा वडील भुते सारी ।।१।।

हात आपुला आपणा लागे । त्याचा खेद करू नये ।।२।।

जीभ दातांनि चाविली । कोणे बत्तीसी ताडिली ।।३।।

थोर दुखावले मन । पुढे उदंड शहाणे ।।४।।

चणे खावे लोखंडाचे। मग ब्रम्हपदी नाचे ।।५।।

मन मारूनी उनमन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।६।।

संत मुक्ताबाई यांनी हरिपाठाचे अभंग ही लिहिले आहेत.. हरिपाठ म्हणजे संत मुक्ताबाईचे अनुभव कणच आहेत.. आत्मरुपाचा साक्षात्कार शब्दांत व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक अविष्कार, असे मी इथे मनापासून नमूद करीन..

मुक्ताबाईंनी रचलेल्या त्यांच्या अभंगवाणीतून त्यांच्या विचाराची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवायला मिळते. त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून आणि शब्दाशब्दांतून त्यांचा परिपूर्ण अध्यात्माधिकार, योगसामर्थ्य, प्रौढ प्रगल्भ जाण, अविचल आत्मविश्वास यांचे सुशांत दर्शन घडत जाते…घडत राहते…

संत मुक्ताबाईंनी सुमारे पाऊणशे अभंग रचले. त्या सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध आहेत.. त्यांच्या या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आणि साक्षात्काराचे पडसाद आहेत. हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे…

संत मुक्ताबाई यांचे कल्याण पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य प्रसिद्ध आहेत…

संत मुक्ताबाई यांचे ज्ञान फारच अफाट होते. त्यामुळे त्यांचे हे ज्ञान बघून योगी चांगदेवांनी त्यांना आपले गुरु मानले होते…

संत मुक्ताबाईनीं “ज्ञानबोध” नावाच्या ग्रंथाचे लेखनही केलेले आहे…
“” ‘मुक्तपणे मुक्त। मुक्ताई पैं रत
हरिनाम स्मरत सर्वकाळ’”
असे म्हणणा-या ज्ञानदेवांच्या या धाकटय़ा बहिणीची समाधी खानदेशात तापीच्या काठी ‘मेहुण’ या गावी आहे…

संत मुक्ताबाई वैकुंठवासी झाल्यानंतर संत नामदेव महाराजांनी समाधीग्रहण प्रसंगाचे हृदय वर्णन केले आहे… ते म्हणतात…
!! कडाडली वीज निरंजनी जेव्हा
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी
जेव्हा निरंजनी गुप्त झाली
गेले निवारुनी आकाश आभुट
नाम म्हणे कोठे मुक्ताबाई !!
क्रमशः

संगीता कुलकर्णी

– लेखन : संगीता कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं