गिरीजाबाई केळकर
स्त्रिया जेव्हा लिहू लागल्या तेव्हा सुरूवातीच्या आघाडीच्या लेखिका व पहिल्या स्त्री नाटककार म्हणजे गिरीजाबाई केळकर.
“गृहिणी गृहाची शोभा गृहिणी सुखाचा गाभा गृहिणी आनंदाचा ठेवा ऐशी गृहिणी लाभे तो भाग्यवंत देवा” या हृद्य काव्यपंक्ती (संसार सोपान’ ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविक प्रकरणाचा आरंभ) करणा-या गिरीजाबाई केळकर यांची आज ओळख करून घेऊ या.
स्त्री-जीवनातील समस्या, तिची दुःखे मांडणार्या पहिल्या गद्य लेखिकांपैकी एक म्हणून महत्त्वाच्या ठरलेल्या गिरीजाबाई केळकर यांचा जन्म १६ ऑक्टोबर १८८६ मध्ये मुंबईला झाला… त्यांचे माहेरचे नाव द्रौपदी बर्वे होते. त्यांचे वडील बर्वे यांची नोकरी सौराष्ट्रात असल्याने द्रौपदी (गिरीजाबाई केळकर) यांचे बालपण व शिक्षण गुजरातमध्ये झाले..
१९०१ साली न. चिं. केळकर यांचे धाकटे बंधू महादेवराव केळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या गिरीजा महादेव केळकर झाल्या व महाराष्ट्रात आल्या. विवाहानंतर त्या मराठी भाषा शिकल्या.. वाचनाच्या आवडीतून गिरिजाबाई केळकरांनी मराठी भाषा उत्तम अवगत केली आणि मराठीत त्यांनी प्राविण्य संपादन केले..
घरच्यांनी गिरीजाबाईं यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्या लिहू लागल्या… गिरिजाबाई केसरी वर्तमानपत्राचे संपूर्ण वाचन करीत. नंतर त्यांनी लेखनही करायला सुरुवात केली.. पतीला न सांगताच त्यांनी एक लेख ज्ञानप्रकाशला पाठवला. तो संपादकांना पसंत पडून छापून आल्यावर त्यांनी नियमितपणे लेख पाठवायला सुरुवात केली. मात्र हे सर्व लेखन निनावी असे.. त्याचबरोबर त्यांचे लेख ’आनंद’ या मासिकातही छापून येऊ लागले.. त्यांनी विपुल व विविध लेखन करून चांगली मान्यता मिळवलीच शिवाय उत्तम वक्त्या म्हणूनही लौकिक संपादन केला..
संसारी स्त्रियांना मार्गदर्शक व बोधपर असे विपुल स्फुट लेखनही गिरीजाबाईं यांनी केले आहे.
मनोरंजन’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘खानदेश वैभव’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. तर ‘पुस्तकी शीक नि व्यवहाराची भीक’ (१९१४), ‘पुरी हौस फिटली’ (१९१६) या कादंबर्या.. अंगठीचा प्रभाव’ (१९२७) ही दीर्घ सामाजिक कथा … ‘स्वभावचित्रे’, भाग १ (१९२३), भाग २ (१९३४), ‘केवळ विश्रांतीसाठी हा (१९२६) कथासंग्रह तर ‘पुरुषाचे बंड’ (१९१३), ‘आयेषा’ (१९२१), ‘राजकुंवर’ (शिरकाणाचा सूड) (१९४१), ‘हीच मुलीची आई’ (१९३२), ‘मंदोदरी’ (१९५७) ही नाटके त्यांनी लिहिली.. गृहिणी भूषण’ (१९१२), ‘पुष्पहार’ (१९२१), ‘स्त्रियांचा स्वर्ग’ (१९२१) ही त्यांची काही पुस्तके
आणखीही काही पुस्तके प्रकाशित झाल्यावर गिरिजाबाई केळकरांनी ’पुरुषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले, आणि त्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार झाल्या.
त्यांचे ‘द्रौपदीची थाळी’ (१९५९) हे आत्मवृत्त असून स्त्री-शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आणि पतिपरायण संसारी स्त्रीचे साधेसुधे जिव्हाळ्याने भरलेले हे आत्मनिवेदन आहे.. उल्लेखनीय बाब म्हणजे मराठीतील पहिल्या नाटककार गिरिजाबाईं यांना त्यांच्या साहित्यसेवेबद्दल इ.स. १९२८मध्ये मुंबईत भरलेल्या २३व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान मिळाला व त्यांचा गौरव करण्यात आला..अशा या महान लेखिकेचे २५ फेब्रुवारी १९८० रोजी निधन झाले..

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800