इरावती कर्वे
मानववंशशास्त्र व समाजशास्त्र या विषयांतील जागतिक कीर्तीच्या संशोधिका तितक्याच उत्कृष्ट लेखिका आणि स्वत:च स्त्री-स्वातंत्र्याचे उदाहरण ठरलेल्या पुरोगामी विचारवंत म्हणजे इरावती कर्वे होत.
विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका. मानववंशशास्त्राबरोबरच पुरातत्त्वविद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये उल्लेखनीय संशोधनकार्य करणा-या इरावती कर्वे या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्नुषा व फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत..
इरावती कर्वे यांचा जन्म ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) इरावती नदीच्या काठी वसलेल्या मिंगयानमध्ये (म्यिंज्यान) येथे १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला.
इरावतीबाईं यांचे बी. ए. पर्यंतचे शिक्षण पुण्यास झाले. त्यावेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे ह्यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली “‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण”’ ह्या विषयावर प्रबंध लिहून एम्. ए. ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. ‘”मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’” ह्या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी त्यांनी घेतली..काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले.
१९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानववंशशास्त्र ह्या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ह्या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या.
इरावतीबाई स्वतंत्र विचारांच्या व स्वत:ला पटणारी गोष्ट निकराने करणार्या होत्या. स्वतंत्रपणे काम करणार्या संशोधक असा त्यांचा पिंड होता. त्यांनी व्यासंगी प्राध्यापक, संशोधक, लेखिका, व्याख्याती अशा माध्यमांतून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला. दुचाकी (स्कूटर) चालवणार्या पुण्यातील पहिल्या महिला असाही त्यांचा लौकिक ..
स्त्री-स्वातंत्र्या’ बाबतच्या त्यांच्या कल्पना अतिशय आधुनिक होत्या.. जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि व नवे यशस्वीपणे आत्मसात करणे असे दुहेरी यश इरावती बाईंना लाभले मात्र ही धडपड त्यांनी एकाकीपणे केली.
इरावतीं बाईचे “अभिरुची’” मधील सुरुवातीचे लेखन ‘क’ ह्या टोपण नावाने होते. त्यांचा भारतीय भाषा, महाभारत, रामायण, वेदवाड्.मय या विषयांचा गाढा अभ्यास होता. शालेय वयातच हुजुरपागेच्या बालिकादर्श अंकात त्यांची एका भिकारणीची कैफियत मांडणारी “कैफियत” ही कविता छापून आली होती..
इरावतीबाईं यांनी मानववंशशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र ह्या विषयांत विपुल संशोधन केले. त्यांचे संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांपैकी “हिंदू सोसायटी ॲन इंटरप्रिटेशन” हा कुटुंब संस्थेवर आधारलेला, “किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया” हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगमान्यता पावला.
मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगांत, धर्म, संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास इ. संदर्भातील त्यांचे ग्रंथ तर परिपूर्ती, भोवरा, गंगाजळ हे त्यांचे ललित संग्रह प्रसिद्ध आहेत.. संवेदनक्षम भावोत्कटता हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य तर टवटवीत तरलता ही वाचकाच्या मनाला प्रफुल्लित करणारी..
जन्मांतरीची भेट’आणि ‘वाटचाल’ ह्या लेखांमुळे त्यांची साहित्यिक उंची सर्वांच्या नजरेत भरली तर माणसाचा ‘माणूस’ म्हणून त्या शोध घेत असताना अप्पासाहेब परांजपे यांचे ‘दुसरे मामंजी’ तसेच महर्षी कर्वे यांचे ‘आजोबा’ ही व्यक्तिचित्रे सरस उतरली नी ‘युगान्त’ने त्यावर कळस चढविला. तर “‘परिपूर्ती”’ हे पुस्तकच्या पुस्तक स्पर्शाची नानाविध रूपं कधी जात्याच तर कधी ओघात मांडत जाणारं आहे… त्यांच्या बहुतेक इंग्रजी ग्रंथांस आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली..
महाभारताचा व्यासंग असणा-या इरावतीबाईंचं महाभारतातले कंगोरे उलगडून दाखविणार युगान्त हे पुस्तक म्हणजे तर महाभारताकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देणारा ग्रंथ आहे.
ह्या महाभारतावरील चिकित्सक ग्रंथास साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन यांचा तसेच इतरही पुरस्कार लाभले.
याशिवाय इंग्रजी भाषेमधूनही इरावतीबाईं यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी एक ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते.
तसेच त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. त्यांनी इंग्रजी व मराठी नियतकालिकांतून ही स्फुट लेखनही केले…
त्यांची भाषा साधी सोपी प्रसन्न आणि हलकासा विनोदाचा शिडकाव करणारी.
दुसर्या महायुद्धानंतर सांस्कृतिक मानववंशशास्त्र व सामाजिक मानववंशशास्त्र यांचा स्वतंत्र शास्त्रे म्हणून विकास झाला. या विषयांचा सखोल, संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी संस्कृती व इतिहासाचे विश्र्लेषण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला .
अशा प्रकारचे संशोधनात्मक कार्य करणार्या डॉ. इरावती कर्वे या जगातील एकमेवाद्वितीय शास्त्रज्ञ होत.
मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाई यांच्या लेखनाकडे पाहिले जाते.
इरावतीबाईंनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले. अनेक वर्षे पंढरीची वारीही केली. अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.
त्यांनी समाजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो. माणसे एकमेकांच्या जवळ येतात.जोडली जातात. एकमेकांच्यात मिसळतात व पुन्हा तुटली जातात तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते असा समर्पक विचार त्यांनी मांडला.
जागतिक स्तरावर कार्य करतांना मानववंशशास्त्र व मानवंशशास्त्रात त्यांनी जे योगदान दिले ते ऐतिहासिक म्हणावे लागेल.
इरावतीबाई या ज्ञानगंगा होत्या. भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र, साहित्य, इतिहास, समाजशास्त्र तत्वज्ञान इ. अनेक विषयांवर मौलिक संशोधन व कार्य त्यांनी केले. एक प्राध्यापिका, ज्ञानतपस्वी संशोधिका, कर्तव्यदक्ष गृहिणी आदर्शमाता, आधुनिक विचारांची ज्ञानगंगा, मनस्वी प्रेमळ आणि सढळ हाताने मदत करणारी, सत्याच्या बाजूने सतत लढणारी दुरदृष्टीची तत्ववेत्ता जिज्ञासू वृत्तीची ज्ञान तपस्विनी अशा अनेक रुपात इरावतीबाईंचे कार्य थोर आहे.
आजन्म अभ्यास, विवेचन, चिकित्सकपणा, संशोधन डोळसवृत्ती, साहित्य, लालित्य यामुळे इरावतीबाईं यांचे कार्य अखिल जगात गाजले. समाजाबद्दलची आत्मियता, श्रध्दा, ओजस्वी वाणी, उत्तम प्रकृती, निडर स्वभाव अशा गुणांमुळे आणि उत्स्फुर्त संशोधनामुळे इरावतीबाई जीवनाच्या अखेरपर्यंत नम्र उपासक म्हणून जगल्या.
एक चैतन्यमयी आणि चैतन्यदायी असलेल्या इरावतीबाई यांचे ११ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचे निधन झाले..
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800