शकुंतला परांजपे
मराठी साहित्य क्षेत्राबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या कर्तृत्वाने विलक्षण व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवणाऱ्या महत्त्वाच्या स्त्रियांमधील एक अपवादात्मक तसेच अतिशय करारी व्यक्तिमत्त्व.. कथाकार कादंबरीकार आणि आधुनिक विचारांच्या अशा शकुंतलाबाई परांजपे म्हणजे महाराष्ट्राला भूषण असलेले एक स्त्री व्यक्तिमत्त्व होय.
शकुंतला परांजपे हे नाव लेखिका म्हणून सुपरिचित असले तरी त्यांची खरी ओळख संततिनियमनाच्या क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कार्यामुळे अधिक आहे.
रँग्लर डॉ. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांची कन्या असलेल्या शकुंतलाबाई यांचा जन्म १७ जानेवारी १९०६ रोजी पुणे येथे झाला. ‘रँग्लर र. पु. परांजपे यांची कन्या’ ही ओळख शकुंतलाबाईंना जन्मापासून मिळालेली असली तरी त्या ओळखीला ओलांडून त्यांनी स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली.
आज आघाडीच्या ‘लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांची आई’ अशी दुसरी नवी ओळख त्यांना प्राप्त झाली असली तरी त्यांची स्वत:ची ‘लेखिका, समाज कार्यकर्त्यां शकुंतला परांजपे’ ही ओळख अद्याप विझलेली नाही यातच त्यांच्या कार्याचे खरे मर्म आहे.
१९२९ मध्ये केंब्रिजच्या न्यूनहॅम महाविद्यालयातून त्यांनी मॅथमेटिकल ट्रायपोजमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढच्या वर्षी लंडन विद्यापीठातून शिक्षण या विषयातील डिप्लोमा पूर्ण केला. फ्रेंचसह अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या, अत्यंत बुद्धिमान व विविध कलानिपुण अशा विदुषी होत्या.
जिनिव्हाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी काही वर्षे नोकरी केली. ज्या काळात ‘संततीनियमन’ हा शब्द उच्चारणेही शक्य नव्हते अशा काळात त्यांनी वीस वर्षे संततीनियमनाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य अत्यंत धडाडीने केले. त्यांनी संततीनियमनाच्या प्रचाराचे कार्य पुष्कळ वर्षे हिरिरीने केले. या कामातील त्यांचे स्फूर्तिस्थान म्हणजे महर्षी कर्वे यांचे चिरंजीव व शकुंतला बाईंचे भाऊ आणि संतती नियमनाच्या कार्याचे प्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे हे होते. या कामासाठी शकुंतला परांजपे यांनी काही काळ पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात नोकरी केली. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना राज्यसभेचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले.
१९५८ साली राज्य सरकारने त्यांची नियुक्ती विधानसभेवर केली. संततिनियमनाच्या संदर्भात ‘पाळणा लांबवायचा की, थांबवायचा ?’ हे पुस्तक आणि र.धों.कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्या’तून काही लेखन केले… ‘काही आंबट काही गोड’ या पुस्तकातील ‘”राष्ट्रपती नियुक्तीची सहा वर्षे’” या लेखातही या कार्यासंबंधीचे अनुभव आले आहेत…
कुटुंब नियोजनाच्या संदर्भात शकुंतला परांजपे यांनी केलेलं स्वातंत्र्यपूर्व काळातलं कार्य त्यांच्या विचारांची दिशा आणि झेप दाखवतं.
शकुंतला परांजपे यांचे ललितगद्य, कादंबरी आणि नाटक या तीनही साहित्य प्रकारांतील लेखन वेधक आहे. भिल्लिणीची बोरे’ (१९४४), ‘माझी प्रेतयात्रा’ (१९५७), ‘काही आंबट काही गोड’ यांतील बहुसंख्य लेख आठवणीवजा आत्मचरित्रात्मक असून या लेखांमधून हळूहळू साकारणारे खुद्द लेखिका आणि तिचे वडील रँग्लर परांजपे यांचे चित्र हृद्य आहे.
‘घराचा मालक’, ही कादंबरी बालमानसशास्त्रावर आधारलेली असून “चढाओढ’ आणि ‘सोयरीक’ ही फ्रेंचमधून मराठीत घेतलेली दोन प्रहसने असून ‘प्रेमाची परीक्षा’ आणि ‘पांघरलेली कातडी’ ही दोन स्वतंत्र नाटके आहेत. ‘प्रेमाची परीक्षा’ हे चार अंकी प्रहसन पुरुषपात्रविरहित असून ते महर्षी कर्वे यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले आहे. तर “पांघरलेली कातडी’” हे पाच अंकी संगीत नाटक आहे.
किशोर कादंबरी : सवाई सहांची कोकणातील करामत (१९७२), सवाई सहांची मुंबईची मोहीम (१९७५), सवाई सहांची दर्याची राणी (१९८१),
इंग्रजीतील लेखन : Three years in Australia आणि Sense and Sensibility (१९७०) हे त्यांचे साहित्य प्रसिद्ध.
समाजाकडे आणि स्वतःकडे बघण्याची मिस्कील दृष्टी, नर्म विनोद, हलकी-फुलकी, खुसखुशीत लेखनशैली या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे सर्वच ललितलेखन लोकप्रिय आहे.
संपन्न व रसरशीतपणे जीवन जगणाऱ्या शकुंतला परांजपे यांना अत्यंत फटकळ वृत्तीबरोबरच मार्मिक, मिश्कील स्वभावाचीही देणगी लाभली होती. अशा या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाने लेखनही विपुल व विविध प्रकारचे केले. मात्र त्यांना अंत:प्रेरणेने लिहावेसे वाटले तेव्हाच त्यांनी लिहिले.
त्यांनी काही चित्रपटांत भूमिका ही केल्या. त्यापैकी ‘कुंकू’, ‘सैरंध्री’, ‘लोकशाहीर रामजोशी’, ‘रामशास्त्री’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.
कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९१ साली भारत सरकारच्या ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच रॅमन मेगासॅसे पुरस्कारनेही ह्या ज्येष्ठ समाजसेविकेला सन्मानित करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तीन विविध समित्यांच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जागतिक बँक, फोर्ड फाऊंडेशन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कुटुंब नियोजन विभागाच्या सल्लागार म्हणूनही यांनी काम पाहिले.
समाजसुधारणेची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या, निष्ठेने आणि तळमळीने समाजसुधारणेचे कार्य केलेल्या आणि या त्यांच्या कार्यामुळे मरणोत्तरही लोकांच्या स्मरणात राहिलेल्या शकुंतलाबाई परांजपे यांचे पुणे येथे २००० साली निधन झाले.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800