माधवी देसाई
“नाच गं घुमा” या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात वेगळी नाममुद्रा उमटविणाऱ्या कथा, कादंबरीकार कवयित्री ज्येष्ठ लेखिका माधवी रणजित देसाई यांचा आज आपण परिचय करून घेऊ या.
अतिशय आशयघन चित्रपटांची निर्मिती करून आपला विशेष ठसा मराठी मनावर उमटवणारे निर्माते, दिग्दर्शक, संकलक भालजी पेंढारकर आणि लीलाबाई पेंढारकर यांची मुलगी व लेखक रणजित देसाई यांच्या पत्नी लेखिका माधवी देसाई यांचा जन्म २१ जुलै १९३३ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे सर्व शिक्षण कोल्हापूर येथे झाले. राजाराम महाविद्यालयातून त्या बी.ए. झाल्या. त्यांना मराठी व इतिहास या दोन्ही विषयांची आवड असल्याने हे विषय घेऊन त्या पदवीधर झाल्या. त्यांना धर्म, इतिहास इत्यादी विषयी लहानपणापासूनच आवड निर्माण झाली व वाचनाची गोडी लागली. त्यांनी लहान वयातच तत्कालीन विविध नामवंत साहित्यिकांचे साहित्य वाचलेले होते. सुमारे सतरा वर्षे त्यांनी मुंबईत अध्यापनही केले. कविता-लेखनाने त्यांच्यातील साहित्यिकाचा जन्म झाला.
१९५३ साली विवाहोत्तर गोव्यात आल्यावर त्यांनी मुक्तिसंग्रामात भाग घेतला व पुढे त्यांना सत्याग्रहात तुरुंगवासही भोगावा लागला.
कथा, कादंबरी, कवितासंग्रह आणि ललित लेखसंग्रह असे साहित्याचे विविध प्रकार माधवी देसाई यांनी हाताळले. त्यांनी आपल्या कथा- कादंबर्यांमधून भोवतीच्या स्त्रियांच्या दु:खांना, त्यांच्या जगण्याला शब्दरूप दिले. त्यांचे ‘सायली’, ‘चकवा’, ‘घर माणसांचे’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध असून ‘असं म्हणू नकोस’, ‘सागर’, ‘कथा सावलीची’, ‘शुक्रचांदणी’, ‘किनारा’ इ. कथासंग्रह प्रसिद्ध तसेच सूर्यफुलांचा प्रदेश (व्यक्तिचित्रण); (इंग्रजी भाषांतर -‘द लॅंड ऑफ सनफ्लॉवर्स’) सीमारेषा (माहितीपर कादंबरी), स्वयंसिद्ध आम्ही (चरित्रात्मक-संस्कृत) प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर नामवंत हिंदी लेखिका अमृता प्रीतम यांच्या कथांचे केलेले अनुवाद व फिरत्या चाकावरती (हावठण या कोकणी कादंबरीचा मराठी अनुवाद) तसेच महाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद ही प्रसिद्ध आहेत.
गोव्याच्या पार्श्वभूमीवरील ‘प्रार्थना’ ही त्यांची कादंबरी गाजली. तर गायिका अंजनी मालपेकर यांच्यावरची ‘कांचनगंगा’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी. त्यांच्या ‘मंजिरी’, ‘नियती’, ‘सगुणी’ याही कादंबर्यांमधून त्यांनी स्त्री-जीवनातले वास्तव मांडलेले आहे. ‘धुमारे’ या ललित लेखसंग्रहातूनही त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन, निसर्गाची नावीन्यपूर्ण रूपे यांची काव्यमय शैलीतली दर्शने वाचकाला खिळवून ठेवतात. असं म्हणू नकोस, धुमारे, स्वयंसिद्धा आम्ही, नियती, किनारा, नकोशी, फिरत्या चाकावरती, हरवलेल्या वाटा अशा एक ना अनेक कादंबर्यांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच स्त्रीच्या भावभावनांचे कंगोरे समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला.
स्वतःच्या जीवनाचे चित्र हुबेहुब रेखाटणारे ‘नाच गं घुमा’ हे आत्मचरित्र खूपच लोकप्रिय ठरले. यांच्या या आत्मचरित्रास सोलापूरच्या भैरूरतन दमाणी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले तर “प्रतारणा” व “सीमारेषा” या पुस्तकांना कला अॅकॅडमी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला.
माधवी ताईंचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी गोव्याच्या वास्तव्यात असताना १८०० ते २००९ या दोन शतकांतील गोव्यातील कर्तृत्वसंपन्न स्त्रियांची “गोमांत सौदामिनी” हे पुस्तक लिहिले. संकटातूनही स्त्री कशी उभी राहते, तिच्या वाटेत आलेले काटे दूर सारत ती आपल्या भविष्याची दिशा कशी सुखकर बनविते ते रेखाटून तमाम मराठी मनावर राज्य केले. या पुस्तकाने विविध प्रकारच्या क्षेत्रात काम करणार्या महिलांना एक नवे विश्व दिले. या पुस्तकाद्वारे त्यांनी गोव्यातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेल्या शंभर महिलांच्या कार्याचा परिचय करून दिला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी त्यांच्या साहित्यकृतींचे कौतुक केले होते. इतकेच नाही तर इ.स. २००० मध्ये हेरंब प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या गोमांत सौदामिनी याची दुसरी आवृत्ती ही प्रकाशित झाली. महिला संघटना स्थापन करून त्यांनी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
स्त्रीवादी लेखनामुळे त्या सातत्याने चर्चेत राहिल्या. स्त्रीवेदनेच्या हुंकाराला अर्थ देणार्या माधवीताईंचा बेळगावजवळील कोडोली साहित्य संमेलन सुरू करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.
सीमावर्ती भागातील (बेळगाव-कारवार-गोवा) साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.. त्यांनी “घे भरारी” या चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखनही केले. या चित्रपटाला अल्फा गौरव अॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.
“नाच गं घुमा’ या आत्मचरित्राने वाचकांच्या मनात घर करून राहिलेल्या ज्येष्ठ लेखिका माधवी देसाई यांचे १५ जुलै २०१३ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने स्त्री मनाचा वेध घेणारे चौफेर प्रतिबिंब हरवले.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800