Sunday, September 8, 2024
Homeसाहित्यसाहित्य तारका : ५३

साहित्य तारका : ५३

कथा, कांदबरी, नाटक, ललित असे विविधांगी लेखन करणा-या ज्येष्ठ लेखिका वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन, पूर्वाश्रमीच्या वसुधादेवी काशीनाथ खानविलकर यांचा जन्म १८ एप्रिल १९१७ रोजी मुंबईतील गिरगाव येथे झाला. नाथीबाई दामोदर ठाकरसी शाळेत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. मराठी सातवी (फायनल), इंग्रजी ४ थी इतके शिक्षण त्यांनी घेतले. त्यावेळच्या व्हरनॅक्युलर फायनल पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्या साहित्य विशारदही झाल्या..

लेखन ही उपजत कला आहे हे वसुंधरा ताई यांना पटले. मालतीबाई बेडेकर, इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांच्या लेखनाच्या त्या चाहत्या होत्या आणि त्यांच्या सरोजिनी वैद्य चाळीस वर्षांपासून जवळच्या मैत्रिणी होत्या.
पर्यावरणाच्या, स्त्रियांच्या समस्यांबद्दल, इतरांच्या जीवनातील घटनांच्या अनुभवातून त्यांना त्यांच्या कथा समजल्या.
स्त्रियांच्या प्रश्नांचे, त्यांच्या सभोवतालचे आणि विचार करण्याच्या पद्धतींचे त्यांनी सखोल चित्रण केले.

स्वातंत्र्योत्तर काळात विविध बदलांना सामोरी जाणारी स्त्री त्यांनी सक्षमपणे रेखाटली. त्यांच्या लिखाणात स्त्रीवादाची वैचारिक उत्कटताही दिसते.

वसुंधराताई फक्त कथालेखन करून थांबल्या नाहीत तर त्यांनी कादंब-या, नाटके, ललित लेखनही केले..
लेखनाच्या स्वतंत्र गुणवत्तेमुळे त्यांना खूप लोकप्रियता लाभली.

“संसारशोभा’” हा वसुंधरा ताईंचा पहिला कथासंग्रह १९५१ साली प्रकाशित झाला. “शोध’ (१९५४),‘ चेहरा’ (१९५८), ‘पिपाणी’ (१९६१), ‘अंतरपाट’ (१९६२), ‘प्रतिबिंब’ (१९६३), ‘उपासना’ (१९६९), ‘पैठणी’ (१९७९) असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले . ‘प्रीतीची हाक’ (१९५१), ‘नेत्रा’ (१९८७) या कादंबर्‍या खूप गाजल्या. १९५४ मध्ये ‘हिरकणी’ हे नाटक, १९५९ मध्ये ‘”मी भटकते आहे’” (लघुसंग्रह), १९८४ मध्ये ‘ऋणानुबंध’ हे व्यक्तिचित्र ही पुस्तकेही प्रकाशित झाली. त्याशिवाय “‘हाऽऽय”’ हे अमेरिकेचे प्रवास वर्णन गाजले. तर ‘जयंताच्या गोष्टी’ हे बालसाहित्य प्रसिद्ध माणसामाणसातील गुंतागुंतीच्या नात्याचे दर्शन घडविणा-या कथा देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत.. (“जप्ती”, “बाबूकाका”), किशोरावस्थेतील बालिकेच्या मनाचे पदर हळूवार हाताने उलगडणारी “अंकुर” सारखी कथा त्यांच्या नावावर जमा आहे.

वसुंधराताईंच्या कथा हिंदी-गुजरातीत अनुवादित झाल्या आहेत. ‘मधूची आई’ या त्यांच्या कथेवरून ‘एकटी’ हा  चित्रपट निघाला अन् तो खूप गाजला. ‘”नावेतील पाणी’” या कथेवरून “‘हिरकणी”’ हे नाटक लिहिले. मो.ग.रांगणेकर यांनी या नाटकाचे प्रयोगही केले. त्यांचे ‘”संघर्ष”’ हे पुस्तक आध्यात्मिक अनुभव आणि त्या तर्‍हेच्या विचारांवर आधारित आहे. त्या पुस्तकाला प्रा.राम शेवाळकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
पैठणी’, ‘पिपाणी’, ‘चेहरा’ आणि ‘शोध’ हे त्यांचे कथासंग्रह विशेष लोकप्रिय ठरले. तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘हिरकणी’ या एकमेव नाटकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
पु. भा. भावे साहित्य स्मृती समिती, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राज्य सरकारने त्यांचे लेखन गौरविले.

वसुंधरा पटवर्धन यांच्या लिखाणात सहजता होती त्यामुळेच ते अनेकांना आपलेसे, जवळचे वाटले. त्यांनी बालविवाह, परित्यक्तांच्या समस्या आपल्या लेखनातून मांडल्या. विचार करण्यास प्रवृत्त करणारे लेखन त्यांनी खूप सहजतेने मांडले.
कथा क्षेत्रात आपला खास ठसा उमटविणार्‍या नी मागील पिढीतील वाचकप्रिय ज्येष्ठ लेखिका वसुंधरा पटवर्धन यांचे २ सप्टेंबर २०१० रोजी निधन झाले.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मराठीतील एक ज्येष्ठ लेखिका वसुंधरा पटवर्धन यांच्या साहित्यसंपदेची ओळख करुन देणारा,संगीता कुलकर्णी यांचा सुरेख लेख.
    ललित लेखनाबरोबरच, स्त्री जीवनाचे विविध पैलू त्यांच्या लिखाणातून दिसतात. लेखनातील अष्टपैलुत्व हेच त्यांच्या अलोट लोकप्रियतेचे इंगित असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments