स्वातंत्र्योत्तर मराठी कथांना समृद्ध कथा म्हणून गौरवले जाते. आशय-अभिव्यक्तीच्या दृष्टीने या कथेला नवी परिमाणे लाभलेली आहेत. यात पुरुष कथाकारांचे जेवढे योगदान आहे, तेवढा स्त्री कथाकारांचाही महत्त्वाचा वाटा ठरतो. स्त्रियांनी कथालेखनास जरी उशिरा सुरुवात केली तरी त्यांचे लेखन वैविध्यपूर्ण आहे. स्त्रियांनी वेगवेगळे विषय हाताळून जे पाहिले, साहिले आणि अनुभवले, त्यातील दु:ख कथालेखिकांनी प्रकर्षाने मांडले आहे. या कथांना विशिष्ट धार आहे. लैंगिक, अलैंगिक विषयही मोठ्या समर्थपणे लेखिकांनी पेलवला आहे. अशातच काही स्त्री कथाकारांनी परदेशगमन केले. काही परदेशातच स्थायिक झाल्या आहेत अशा लेखिकांपैकी तारा वनारसे एक आहेत.
मराठी नवकथेच्या सुरुवातीपासूनच्या साक्षीदार असणाऱ्या प्रसुती तज्ञ डॉ. तारा वनारसे यांचा जन्म १३ मे १९३० रोजी पुण्यात झाला. त्यांचे सुरुवातीपासूनचे सर्व शिक्षण पुण्यात झाले .बी.जे. मेडिकल महाविद्या-लयातून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळविली. लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ आब्टेट्रिक्स अॅन्ड गायनाकॉलाजी’ची फेलोशिप त्यांना मिळाली. त्यांनी १९५८ पासून लंडनमध्ये वास्तव्य केले व पुढे तेथील बेनेडिक्ट रिचर्डस या इंग्रज डॉक्टराशी विवाह करून त्या तेथेच स्थायिक झाल्या त्या अखेरपर्यंत.
पाश्चात्य आणि मराठी साहित्याचे वाचन हा ताराबाईंचा एक छंद. इंग्लंडमधील त्यांच्या घरी वैद्यक आणि पाककला, उद्यानकला पासून ते मराठी संत साहित्यापर्यंत जमवलेला आणि वाचलेला ग्रंथसंग्रह याशिवाय निरनिराळ्या प्रायोगिक, परफॉर्मिंग आणि दृक्-श्राव्य यांच्याविषयी त्यांना प्रेमच नव्हे तर अभ्यासही होता. त्यांनी मोजकीच पुस्तके लिहिली. पण त्यांचे लेखन मर्ढेकर-गंगाधर गाडगीळ यांनी सुरू केलेल्या नवयुगाचे होते. कविता, नाटक, कथा, प्रवासवर्णन असे सारे लेखन त्यांनी केले. त्यांनी कथा आणि एकांकिका लिहिलेल्या. त्या काळच्या ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाल्या. तसेच त्यांच्या एकांकिका ‘नसेर्स क्वार्टर्स’ या संग्रहातून ‘मौजे’ने प्रसिद्ध केल्या. साहित्य, संगीत, नाटक यांची आवड व त्यातून त्यांनी लेखन केले. त्यांचा ‘पश्चिमकडा’ हा पहिला कथासंग्रह १९६३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘केवल कांचन’ हा संग्रह २००७ मध्ये प्रसिद्ध झाला. या दोन्ही संग्रहांतून मानवी नातेसंबंध विशेषतः पति-पत्नी, प्रियकर-प्रेयसी यांच्यावर प्रकाश पडतो. त्यांच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी स्त्री अनेक सूखवस्तू पुरुष आयुष्यात येऊनही स्त्रीला क्वचितच प्रेमसाफल्य लाभते. मनुष्य स्वभावातील ज्ञान-अज्ञान अशा अनेक कंगोर्यांचे दर्शन सूचकपणे घडविण्याचा लेखिकेचा प्रयत्न जाणवतो… त्यांनी लिहिलेले ‘कक्षा’ हे नाटक मराठी नाटकाला नवे वळण देणारे ठरले… त्यांच्या ‘कक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग आत्माराम भेंडे यांच्या ‘कलाकार’ या संस्थेने केला. त्या काळात पहिल्या प्रयोगाला संहिता प्रसिद्ध होण्याची प्रथा होती. ‘कक्षा’ चा विशेष म्हणजे मराठी रंगभूमीवर नवसाहित्याच्या खुणा स्वतंत्र नाटकात पहिल्यांदा या नाटकातून दिसल्या..
नर्सेस क्वार्टर्स ही एकांकिका, पश्चिमकडा, केवल कांचन हे लघुकथा संग्रह, बारा वाऱ्यांवर घर हा कविता संग्रह, श्यामिनी आणि सूर या कादंबऱ्या, तिळा तिळा दार उघड हा प्रवासवर्णनांचा संग्रह आणि गुप्त वरदान हा भाषांतरित कथांचा संग्रह असे मोजकेच पण दजेर्दार लिखाण त्यांनी केले. रामायणातील शूर्पणखेच्या जीवनाची शोकांतिका व्यक्त करणारी ‘श्यामिती’ ही कादंबरी त्यांची महत्त्वाची कलाकृती नी यांच्या लेखनातला एक महत्त्वाचा टप्पा.त्यांच्या बारा वाऱ्यावरचे घर या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तसेच त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.. त्यांच्या सर्व लेखनातून जाणवते की लेखिकेची उत्कटतेने भारलेली अभ्यासू वृत्ती आणि त्याहूनही अधिक त्यांचे आत्मभान. प्रत्येक अनुभवाशी तादात्म्य पावत त्यांना शब्दरूप देण्याची क्षमता.
इंग्लंडमधील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्या सक्रिय होत्या इतकच नाही तर त्यांनी लंडनच्या महाराष्ट्र मंडळासाठी ही बरेच काम केले.१२ मे रोजी डॉ. तारा वनारसे यांच्या वयाला ऐंशी वर्षे पूर्ण होणार होती व त्याच दिवशी प्रत्यक्षात ‘नवकथा’ हा प्रकार युरोपमधून कसा आला, त्याचा चित्रपट या नवीन माध्यमाशी असलेला संबंध, हा समजून घेण्यासाठी त्यांनी आपल्याला आवडलेल्या काही कथांचे अनुवाद आणि त्याबरोबरच नवकथेचे स्वरूप विशद करणाऱ्या एलिझाबेथ बोवेन आणि एच. ई. बेट्स यांच्या मतांचा अनुवाद असे एक वेगळेच रूप असलेले पुस्तक” या पुस्तकाचे काम ही पुरे होणार होते. पण नेमक्या त्याच दिवशी म्हणजे १२ मे २०१० रोजी तारा वनारसे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी मराठी वाचकांना दिलेली नऊ मोजक्याच पण फार वेगळ्या आणि गुणवान पुस्तकांची भेट नेहमीच आपल्या जवळ राहील..
त्यांची कविता- कथा-कादंबरी आपल्या स्मृतीत कायम राहतील…
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800