शैलजा राजे
स्वातंत्र्योत्तर काळात स्त्री-विषयक नियतकालिकांची संख्या वाढल्यामुळे ज्या लेखिकांच्या लेखनाला उत्तेजन मिळाले आणि विशेष लोकप्रियता लाभली त्यांपैकी एक म्हणजे शैलजा राजे होत. कथाकार, कादंबरीकार, चरित्रकार शैलजा प्रसन्नकुमार राजे यांची आज ओळख करून घेऊ या.
साठ- सत्तर वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या मराठी सारस्वतांत ज्या काही स्त्री लेखिका झाल्या त्यामध्ये शैलजा राजे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
कथाकार, कादंबरीकार व चरित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूर्वाश्रमीच्या शकुंतला दत्तात्रय कोतवाल म्हणजेच शैलजा राजे यांचा जन्म १२ एप्रिल १९२० रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी कला शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतले.
शैलजा राजे माहेर आणि मेनका या मासिकाच्या माजी संपादक सुमन बेहरे आणि मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर या चांगल्या मैत्रिणी होत्या. “माहेर’च्या पहिल्या लेखिका असलेल्या शैलजा राजे यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केलेली असून कथा, कादंबरी, ललितगद्य, बाल-साहित्य, अनुवाद, चरित्र असे साहित्याचे विविध प्रकार हाताळले आहेत.
पुण्याच्या केसरी संस्थेच्या सह्याद्री मासिकाच्या त्या सहसंपादिका होत्या.
बालसाहित्य या वाड्मय प्रकारांत प्रामुख्याने त्यांनी लेखन केले. त्यांच्या कथा गाजलेल्या साप्ताहिक, मासिक, वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत होत्या.त्यांच्या गाजलेल्या ललितगद्य लेखनाचे संग्रह प्रकाशित झाले आहेत त्यापैकी “खणानारळाची ओटी”, “अष्टभूजेच्या कन्या” “हितगुज” यांसारखे ललितगद्य संग्रह आजही वाचकांना भावतात हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य…
शैलजा राजे यांच्या एकंदर ५३ कादंबर्या, ३९ कथासंग्रह, ४ ललितगद्य, २ चरित्रे, मुलांसाठीची पुस्तके प्रसिद्ध “तुळशीपत्र’” ही कादंबरी सावरकरांच्या येसूवहिनींवर लिहिली आहे. ‘स्वरवंदन’ हे ज्योत्स्ना भोळे यांचे नाट्यपूर्ण चरित्र आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर लिहिलेल्या ‘”यज्ञ’” या कादंबरीसाठी भा.द.खेर यांच्याबरोबर त्यांनी सहलेखन केले. ‘”वतन’” या चरित्रात्मक कादंबरीत त्यांनी रंगोबापू गुप्ते यांची सत्यकथा मांडली आहे.
शैलजा राजे यांच्या “ऋणानुबंध” या कथेला य.गो. जोशी पारितोषिक तर “शहर” व “बिदागी” या दिवाळी अंकातील मराठी कथा साहित्याला महाराष्ट्र टाइम्स ने घेतलेल्या लोकमताने तिसरा क्रमांक मिळाला होता.
त्यांच्या बहुतेक कथा-कादंबर्या तारुण्यातील प्रेम, प्रेमाचा कैफ, स्वप्नभंग, विवाहबाह्य संबंध, निपुत्रिकाचे दुःख, मन एकापाशी आणि शरीर दुसरीकडे असल्यामुळे येणारी अगतिकता यांसारख्या विषयांभोवती गुंफल्या आहेत. कथानकाची साधीसोपी मांडणी आणि आयुष्यातले पेचप्रसंग सहजगत्या सोडविण्याची हातोटी, यांमुळे त्यांचे लिखाण रंजकतेकडे झुकते. घटनाप्रधानता, स्वप्नरंजन आणि आदर्शवाद हा त्यांच्या लिखाणाचा स्थायिभाव आहे.
चमत्कृतिपूर्ण मांडणी, योगायोग, सुखद शेवट या लेखन वैशिष्ट्यांमुळे शैलजा राजे यांचे लेखन त्या काळात लोकप्रिय ठरले. त्यांच्या लेखणीमध्ये समस्त वाचकांच्या मनाला गुंगवून ठेवण्याची ताकद होती. त्या काळात अनेक गृहिणी त्यांचे साहित्य आवर्जून वाचत असत.
साहित्य विश्वात विपुल लेखन करून प्रचंड लोकप्रियता व वाचकांचे प्रेम मिळवणाऱ्या शैलजाताई राजे यांचे १३ ऑक्टोबर २००६ रोजी निधन झाले.
— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800