Wednesday, September 17, 2025
Homeलेखसाहित्य तारका : ७

साहित्य तारका : ७

संत सोयराबाई

लौकिकाला ओलांडणे ही सोपी गोष्ट नव्हे. संत स्त्रियांनी ही दुष्कर गोष्ट साध्य केली…सृष्टी व अंतरात्मा यांचा एकाकार त्यांनी पाहिला आणि नभासारखे रूप या राघवाचे असे उद््गार काढले. दिक् व काल यांच्या पैल असणारा अनुभव त्यांनी घेतला व मुक्तपणे तो गायिला मात्र तिथे पोचेपर्यंतचा त्यांचा संघर्षही विलक्षण होता.. संत स्त्रियांच्या बाबत हे सहज घडले नाही. संत स्त्रियांना त्यासाठी जबरदस्त संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे तिचा संघर्ष आणि तिचे जखमी होणे यांचे दर्शन त्यांच्या वचनांतून स्पष्टपणे घडते… परमेश्वराच्या प्राप्तीसाठी शोधासाठी प्रवृत्त झाल्या…

मराठी साहित्य विश्वातील संत कवयित्री संत सोयराबाई यांची आज ओळख करून घेऊया…

संत सोयराबाई ह्या चौदाव्या शतकातील संत होत्या. त्या संत चोखामेळा या आपल्या पतीच्या शिष्या होत्या तर वारकरी संप्रदायातील मराठी संत होत्या.
“अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग”… हा सोयराबाई यांचा
मा.किशोरी आमोणकरांनी गायलेला नितांत सुंदर अभंग ऐकून प्रत्यक्ष पांडुरंगही विरघळला असेल.

संत सोयराबाई

कोणताही रसिक मराठी माणूस जेव्हा “अवघा रंग एक झाला” हे शब्द स्मरतो किंवा वाचतो तेव्हा चटकन मनात घुमतो तो म्हणजे किशोरीताई आमोणकर यांचे स्वर…
या अभंगातली आर्तता तसूभरही कमी झाली नाही उलट संपूर्ण रूप घेऊन समोर आली.

हा अभंग संत सोयराबाई यांचा… शब्द, कर्म आणि भक्ती यांचा परमोच्च बिंदू गाठणाऱ्या संत सोयराबाई एक श्रेष्ठ संत, पांडुरंग भक्त आणि संत चोखामेळा यांच्या पत्नी व शिष्या होत्या.. महार समाजात जन्माला आलेल्या संत सोयराबाई आणि त्यांचे यजमान म्हणजेच संत चोखामेळा यांना अनेक यातना, उपेक्षा आणि प्रसंगी प्रतारणा देखील भोगाव्या लागल्या…
सहजता हा मानवी मनाचा सहजधर्म आहे. अंतरंगातून उमलणारा एक हुंकार आहे तर प्रकट मनाचा मूक आविष्कारही….

एक शुद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते त्याचा शोध घेत स्वतःला पारखते समाजाशी झगडते, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते..
तेराव्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्याने विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला तो संत..सोयराबाई त्याची बायको..

आधीच महार आणि त्यात बाई म्हणजे सोयराबाईचं जगणं आणखी एक पायरी खाली.. नव-याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता या बाईनं सांगितलेलं तत्वज्ञान अचंबित करते. ती म्हणते..
“अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
मी तू पण गेले वाया
पाहता पंढरीच्या रामा”

असा नितांत सुंदर अभंग लिहिणा-या संत सोयराबाई.. सोयराबाईचे एकूण ९२ अभंग उपलब्ध आहेत. त्यातल्या बहुतांश अभंगामधून स्वतःचा उल्लेख “चोखयाची महारी” असा करते..
सोयराबाईच्या अभंगातून असणारे तत्वज्ञान सोपे आहे. भाषा साधी सोपी रसाळ आहे. सातशे वर्षांपूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ब्र काढायचा विचारही केला नसता पण संत सोयराबाई थेट प्रश्नच विचारतात.. .देहात विटाळ बसतो मग देह कोणी निर्माण केला ?
“देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुद्ध- बुद्ध
देहीचा विटाळ देहीच जन्माला
सोवळा तो झाला कवण धर्म”

त्यांच्या कुटुंबियांचा समाजानं भरपूर छळ केला. आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणविले मारही खाल्ला..
“हिन हिन म्हणोना का ग मोकलिले
परी म्या धरीले पदरी तुमच्या
आता मोकलिता नव्हे नित बरी
थोरा साजे थोरी थोरपणे.”
या अभंगातून ही वेदना शब्दां शब्दातून ठिबकत आहे… इतकचं नाही तर विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून चोखोबाला कोंडून मारलं. कपड्यांची लक्तरं झाली चामडी लोळवली तरी सुद्धा “जोहार मायबाप जोहार” असा प्रश्न करता झाला तेव्हा सोयराबाई विठ्ठलाला साकडे घालताना म्हणतात…
“आमची तो दशा विपरीत झाली
कोण आम्हा घाली पोटामध्ये
आमचं पालन करील बा कोण
तुजविण जाण दुजे आता”

सोयराबाईच्या अभंगात जगण्यातलं वास्तव रोखठोकपणे येतं. सुखात हजार वाटेकरी असतात पण दुःख तुमच्या एकट्याचं हे त्यांनी फार सुंदर शब्दांत सांगितलयं.. त्या म्हणतात
“अवघे सुखाचे सांगाती दुःख होता पळती आपोआप.. आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि…”
नाम महात्मही त्यांच्या अभंगातून पुन्हा पुन्हा येते..
“सुखाचे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी”

आत्मा-परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी.. अपत्य प्राप्तीच्या आशेनं कासावीस झालेली सोयराबाई
“आमच्या कुळी नाही वो संतान । तेणे वाटे शीण माझ्या मना ।।”.
या अभंगात भेटते. तर कर्ममेळ्याचा जन्म झाल्यावर आनंदाने ती विठ्ठल -रुक्मिणीला बारश्यासाठी निमंत्रण देताना म्हणते…
“उपजता कर्ममळा वाचे विठ्ठल सावळा
विठ्ठल नामाचा गजर वेगे धावे रुक्मिणीवर
विठ्ठल- रुक्मिणी बारसे करी आनंदानी”

भेदाभेद आणि विटाळाच्या वास्तवाची होरपळ सोयराबाईच्या कुटुंबानं आयुष्यभर सोसली. ती त्यांच्या अभंगातून संयमितपणे आली आहे. सातशे वर्षं उलटून गेल्यावरही प्रतिक्षा संपलेली नाही..
“उदारा पंढरीराया नको अंत पाहू
कोठ वरी मी पाहू वाट तुझी”

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा