Friday, December 19, 2025
Homeसाहित्यसाहित्य तारका : 1

साहित्य तारका : 1

मराठी साहित्यात अनेक लेखिकांनी स्त्रियांच्या मनभावना प्रगट करणारे लेखन केले…विपुल प्रमाणात साहित्य लिहिलेले आहे…
मराठी साहित्यामध्ये स्त्रियांनी आपल्या वेगवेगळ्या साहित्याचा सुंदर ठसा उमटविला आहे..त्यांनी निर्मिलेले साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इतकचं नाही तर त्यात वेगळे लावण्य ही आहे..

मराठी साहित्यक्षेत्रातल्या साहित्य निर्माण करणा-या या स्त्रिया साहित्यातील स्त्री- लावण्य प्रतिमा आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.. कथा-कादंबरी हा समाजाशी आतून निगडित असलेला साहित्य प्रकार आहे…. दलित, ग्रामीण, स्त्रीकेंद्री, आदिवासी अशा उपेक्षित जीवनाच्या चित्रणातून मराठी साहित्य आशय संपन्न झाले आहे. मराठी कथा कादंबरीचे दालन स्त्री-लेखिकांनी समृद्ध केले आहे…

मराठी साहित्यात स्त्रियांचे स्थान मोठे आहे. मदम्मा, मुक्ताई, जनाबाई यांना वारकरी संप्रदायाने लिहिते केले..
अश्या लेखिकांचा थोडक्यात आढावा घेऊया “साहित्य तारका” या लेख मालेतून. दर शुक्रवारी प्रसिध्द होणारी ही अभ्यासपूर्ण लेख माला लिहित आहेत, संगीता कुलकर्णी.

अल्प परिचय : –
संगीता कुलकर्णी या लेखिका /कवयित्री /निवेदिका /मुलाखतकार म्हणून परिचित आहेत. त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या माजी अध्यक्षा आहेत. “संगीतपुष्प”, “पारिजात” हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे.
साहित्य विषयक कार्यक्रमात त्या व्याख्याती म्हणून निमंत्रित असतात. त्यांचे विविधांगी लेखन नामांकित दिवाळी अंक, विविध मासिकांतून नामांकित वृत्तपत्रातून सातत्याने प्रसिद्ध होत असते.
या शिवाय विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सातत्याने सहभाग असतो. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांची साहित्य तारका ही लेख माला आपल्याला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.
– संपादक

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या वाङ्ममयीन परंपरेत स्त्री संत कवयित्रींचे कार्य व महत्त्व अनन्यसाधारण आहे…
“न स्त्री स्वातंत्र्य मर्हति” या मनुवादी विचारांपासून मुक्त असणारे संत कवयित्रींचे काव्यलेखन आणि पुरूषप्रधान संस्कृतीतही स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडविणा-या संत कवयित्री…

बारावे ते सतरावे शतक हा स्त्री संत कवयित्रींचा कालखंड म्हणून ओळखला जातो. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असताना, त्यांनी केलेला संघर्ष जाणून घेताना मध्ययुगीन संत स्त्रियांच्या वाड:मयाचा अभ्यास करावाच लागतो… स्त्रीवादी लेखनात संत स्त्रियांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे..

संत कवयित्रींचे काव्य (अभंग, ओव्या, भारूड, प्रासंगिक गीते) हे त्यांच्या मनोगतांचे प्रकटीकरण आहे. कधी सामाजिक, कधी पौराणिक अश्या प्रसंगांना केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती काव्यात्मक प्रबोधन, मनोगत सांगणाऱ्या या संत कवयित्री एकीकडे स्त्री गीताशी जोडल्या गेल्या आहेत तर दुसरीकडे आजच्या स्त्रीवादी साहित्य परंपरेशीही त्यांच्या लिखाणाचे धागे जुळलेले आहेत…

प्राचीन मराठी वाङ्ममयात संत कवयित्रींनी मोलाची भर घातली आहे. आद्य कवयित्री महदंबा, संत परंपरेतली जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई यांसारख्या अनेक कवयित्रींनी मराठी वाङ्यमयात अमिट ठसा उमटविला आहे.
मराठी साहित्य विश्वातील आद्य मराठी पहिली कवयित्री महदंबा ऊर्फ महदाईसा यांची आज ओळख करून घेऊ या.

महदाइसा ऊर्फ महदंबा या महानुभाव पंथातील महिला मराठीतील आद्य कवयित्री होत्या. त्या महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींच्या शिष्या असून त्यांनी धवळे नामक काव्य रूढ केले.
त्यांचा जन्म मराठवाडयातील जालना जिल्ह्यामधे झाला.

मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री म्हणून संत महदंबा यांचा उल्लेख केला जातो किंवा असे म्हटले तरी चालेल की त्या मराठी भाषेतील पहिल्या संत कवयित्री आहेत.
श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचार धर्माचे काटेकोरपणे पालन करणा-या महदाइसा या संन्यासिनी, कवयित्री, तपस्विनी होत्या अशी त्यांच्याविषयी महानुभावांंची श्रद्धा आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे “म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक” अश्या शब्दांंमधे महानुभावपंंथीय त्यांचा गौरव करतात. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञाना वर त्यांची गाढ श्रद्धा होती.

चक्रधरस्वामी यांच्या काळात महानुभाव पंथाचा खर्‍या अर्थाने प्रसार झाला..महदाइसा म्हणजेच महदंबा या चक्रधरस्वामींची शिष्या..
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महानुभाव पंथाच्या प्रचारार्थ वेचले.
महानुभाव पंथीयांना महदंबेबद्दल फार आदर होता.. ज्ञानेश्वर मंडळात मुक्ताईचे जे स्थान तेच चक्रधर मंडळात महदंबेचे होते असे म्हणण्यास हरकत नाही..
महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा म्हणजे महदंबा या एक अग्रगण्य व्यक्ती होत्या. त्या या पंथाची मोठी आईच होत्या.. सर्वजण त्यांना आऊसा म्हणजे आई म्हणत असत.
त्यांनी रचलेले “धवळे” आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त करून देतात.
त्यांचे धवळे नावाचे लेखन महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहे. तो एक वाड्मयीन रचना प्रकार झाला आहे.

धवल या संस्कृत शब्दावरून ‘धवळा’ व ‘ढवळा’ हा शब्द आलेला आहे. ते विवाहप्रसंगी भक्तांकडून गायले जात असत.
मराठी साहित्यातील आद्य कवयित्री म्हणून महदंबेला ओळखले जाते ते त्यांच्या धवळे या काव्यप्रकारावरून. आपल्या अनेक रचनांमुळे महदंबा या संतत्वाला पोहोचल्या आणि मराठवाड्यातील संतांच्या भूमीत एक स्त्री संत व मराठीतील आद्य कवयित्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या..

धवळे हा प्रकार म्हणजे कथाकाव्य आहे आणि वर विषयक गाण्याचे गीत म्हणजे धवल होय.

पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे या धवळ्यांचे दोन भाग आहेत. साधी सुंदर रचना हे धवळ्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णतः महदंबेचा असून उत्तरार्धाच्या रचनेसाठी म्हाइंभट आणि लक्ष्मीधरभट या दोन महानुभाव पंडितांचे सहाय्य त्यांना झालेले दिसून येते.

महदंबेच्या नावावर “मातृकी रूक्मिणीस्वयंवयर” आणि “गर्भकांड” ओव्या (हे आध्यात्मिक प्रकरण आहे) अश्या दोन रचनाही आहेत.

आपल्या रचने मधून कृष्णाची रूपे वर्णन करताना संत महदंबा म्हणतात की …
!! डोळस  सावळा देखे भीमबाळा
मेघडंबरी निळा कृष्ण रावो !!
तर रुक्मिणीची अवस्था कशी होते हे सांगताना त्या म्हणतात की..
!! डोळे अश्रूजळी देह न सांभाळी
झेप तिये वेळी पाहे !!
यावरून त्यांनी काय पद्धतीने रचना तयार केल्या असतील हे आपल्या लक्षात येऊ शकते.

संत महदंबा यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध हा चार ग्रंथातून घेता येतो. ’लीळाचरित्र’, ’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतीस्थळ’ व ’धवळे’ या ग्रंथांमधून त्यांची प्रतिमा दृष्टीस पडते…

स्त्री जीवनाचा खरा अर्थ दाखवून देणा-या काही स्त्रियांपैकी एक म्हणजेच महदंबा होत…जीवनात परमोच्च स्थान प्राप्त केलेल्या महदंबा एक मानबिंदू ठरतात..
क्रमशः…

संगीता कुलकर्णी

– लेखन : संगीता कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. स्त्री संत, साहित्य तारका व कवयित्री ह्यांची सखोल माहिती करून देणारा साहित्यिका, लेखिका व कवयित्री संगीता कुलकर्णी ह्यांचा अभ्यासपूर्ण व वाचनीय लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…
सौ.मृदुला राजे on धुक्याची चादर