९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक १ ते ४ जानेवारी, छत्रपती थोरले शाहू महाराज नगरी साताऱ्यात अतिशय उत्साहाने पार पडले.
संमेलनाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताने झाली. पूर्ण शहरात साहित्य दिंडीचा जयघोष झाला. घोड्यावर बसलेले वीरपुरुष, वीरांगनांचा वेश धारण केलेली लहान मुले, नऊवारी साडी नेसून झांझ वाजवणाऱ्या स्त्रीया व ढोल, ताशे, नगारे वाजवणाऱ्या मंडळींनी प्रदर्शनात लक्ष्य वेधले. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांचा फोटो असलेला चौफेर फिरणारा रोशनाईचा स्तंभ या ग्रंथ दिंडीत शोभनीय होता. रथावर बसणारे पदाधिकारी, माय मराठीचा उबदार सावलीत लहानमुलांचे वक्तव्य, श्री रामदास स्वामींची पालखी, पौराणिक ग्रंथ, संत साहित्य असलेली दर्शनीय पालखी आणि ते उचलणारे भक्कम खांदे या साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराशी येऊन गाजत वाजत मुख्य मंडपाकडे जाऊन थांबले.

एकीकडे बालकुमार कट्टा, कवी कट्टा, गझल कट्टा, परिसंवाद तसेच मुख्य मंडपात दूरहून आलेल्या साहित्यिक व दर्दी रसिकांची गर्दी होत गेली. संमेलनात व्यवस्था, शांतता राखण्यासाठी जागोजागी पोलीस, रांगेत चालणाऱ्या मराठी शाळेतील मुले, त्यांना मार्गस्थ करणारे शिक्षक, आजुबाजुच्या गावातून आलेले कुटुंब, ज्येष्ठ साहित्यिक, पदाधिकारी व नवोदित लेखकांची वर्दळ प्रकर्षाने जाणवत होती. स्टेडियमच्या बरोबर मधे पुस्तकांचा मेळा भरला होता. त्यामुळे विविध प्रकाशने, पुस्तके दृष्टीगत झाली.
भारूड, प्रशांत दामले यांचे शिकायला गेलो एक, हास्यजत्रा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असले तरी साहित्यिकांना एकमेकांच्या भेटीतून मिळणारा आनंद त्या पलीकडचा होता. प्रचंड मोठ्या संमेलनात एका कट्टयावरून दुसऱ्या कट्यावर जायला मोठे अंतर होते. भरगच्च लोकांमधे वावरत असताना ज्यांना मुद्दामून भेटायला जावे तर मधेच भेटणाऱ्या ओळखीच्या चेहऱ्यांबरोबर नवे चेहेरे भेटायचे. नव्या ओळखी होत गेल्या. पण अधेमधेच रिंगटोन वाजून मोबाईलची रेंज गेल्याची खंत होतीच.

भेटीगाठीत जेवणाच्या वेळा न लक्षात राहणारे आपल्या सारखेच इतरही होते. किती बोलावे, किती ऐकावे ? तरी या दोन्हींचा ताळमेळ घालणेही जमते.. फक्त आणि फक्त साहित्यिकांना !
माझे आणि अनेकांचे तारीख वेळ घातलेले, मिळालेले कुपन्स तसेच पडून राहिले कारण वाढलेल्या साहित्य मेजवानीत आपल्या कडचे ताट अजून खूप लहान आहे याची खात्री संमेलनाने करून दिली !

— लेखन : दिपाली वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
