निमंत्रित भारतीय श्रोते आणि सिंगापूर कलासक्त श्रोत्यांच्या उपस्थितीत नुकतेच सिंगापूर येथे छान
कविसंमेलन झाले. या कवि संमेलनास चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, सुप्रसिद्ध लेखिका आशा बगे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
सिंगापूर महाराष्ट्र मंडळाची शब्दगंध ही शाखा असून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मंडळी एकत्र येतात आणि दिलेल्या एका विषयावर कविता सादर करतात. तसेच एक चित्रकाव्य ही सादर केले जाते.
यावेळी श्रीरंग केळकर यांनी श्री बाबासाहेब सौदागर यांच्या बरोबर संवाद साधला. त्यांनी अनेक लोकलयींमध्ये अहमदनगर शैलीत अनेक निसर्ग कविता आणि लावण्य गीते सादर केली. यामुळे सिंगापूरचे मराठी भाषिक मंत्रमुग्ध झाले.
सिंगापूरचे नाट्यचित्रपट कलावंत राहुल बर्वे आणि कवयित्री नीला बर्वे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राहुलच्या हस्ते जनस्थान पुरस्कारप्राप्त आशाताई बगे आणि कवी सौदागर यांना सन्मानित करण्यात आले. माझ्या नगरी कविता साता समुद्रापार येऊन कृतार्थ झाली असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
यावेळी ओळख हा विषय होता. त्यावर कवयित्री माधवी कासलीकर, प्रतिमा जोशी, पूजा पेठे, अश्विनी म्हैसाळकर, स्नेहल केळकर, दीप्ती इनामदार तर कवी अरुण मनोहर, अजित वैद्य, भवान म्हैसाळकर, निरंजन भाटे, मोहित कुलकर्णी, अभिजित ठाकूर, नंदकुमार देशपांडे, श्रीरंग केळकर यांनी वैविध्यपूर्ण कविता सादर करून बहार आणली.
आपली ओळख आहेच, आमच्याकडील कार्यक्रमाला उपस्थित राहून ती अधिक दृढ होईल असे म्हणून नीला बर्वे यांनीही विविध प्रकारच्या ओळखीवर कविता सादर केल्या.
तर राहुलनेही दोन्ही विषयांवर कविता सादर करतांना चित्रकाव्यावरील कविता गाऊन सादर केली. कवी सुगम काळे यांनी चित्रावरील कविता वेगळ्या विचारांनी सादर केली. कवी सौदागर यांचे जावई, सिंगापूर रहिवासी, डॉ. सतीश पाटील यांनी या चित्रकृतीवर आयुष्यावर भाष्य करणारी कविता सादर करुन श्रोत्यांची दाद मिळविली.
महाराष्ट्र मंडळाने मराठी भाषेला परदेशातही सन्मान दिला. मानाचे वस्त्र अलंकार चढविले. तिच्या आईपणाचा हा गौरव आहे, अशा भावना कवी सौदागर यांनी व्यक्त केल्या. तर सर्वांच्या कविता अतिशय सुरेख होत्या, एकाच विषयाचा विविधरित्या विचार होऊन त्याचे विविध पैलू उलगडले गेले असे म्हणून आशाताईंनी सर्वांना शाबासकी दिली.
मराठी साहित्यातील दोन ख्यातनाम व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून लाभल्यामुळे काव्यात्मक शब्दगंध मैफिल संस्मरणीय झाली आणि सुग्रास भोजनाने तिची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सिंगापूर महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सचिन गांजापुरकर आणि कार्यवाह किशोर वामन यांनी विशेष परिश्रम घेतले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
वा सुंदर सिंगापूरच्या कवी संमेलनाचा आनंद या लेखातून घेतला. 👍🌷👌