Sunday, September 8, 2024
Homeयशकथासिंहावलोकन

सिंहावलोकन

आपल्या पोर्टलचे लेखक श्री सुनील चिटणीस यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या जीवनाचे केलेले सिंहावलोकन पुढे देत आहे. श्री चिटणीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

आज गुरुवार, ११ जुलै २०२४ आषाढ पंचमी. आयुष्याच्या पुस्तकातील काही पानं अलवार चाळत असताना, हळूच थोडं मागे परतून पाहीलं अन जाणवलं की, आकाशात काळे सावळे ढग दाटून येत असताना बहात्तर पावसाळे कधी बरसून गेले कळलंच नाही ! पाऊस वर्षावात किती वर्षे अलगद पुढं पुढं सरकत गेली ना ? तरूणपणाच्या जोशातून म्हातारणाच्या सांज सावल्या पडायला लागल्या.

ऋतु हिरवा ऋतु बरवा म्हणता म्हणता ऋतु वार्धक्याकडे झुकून कधी फिक्कट पिवळा व्हायला लागला, समजलंच नाही. काही दुःखाच्या काही सुखाच्या गंधाळलेल्या चांदणराती अनुभवल्या, त्या आठवांच्या ओल्या खुणा अजून तशाच ताज्या ओल्या. भल्या बुऱ्या अनेक पौर्णिमा जीवनात चांदणं घेऊन आल्या, तर कधी घनघोर काळोखमिट्ट अमावस्याही वाटणीस आल्या, कधी कोजागिरी पौर्णिमेच्या शीतल पौर्णिमाही, याची देहा याची डोळा अनुभवण्यास मिळाल्या, अशा कित्येक पौर्णिमा जीवनात चांदणस्वप्नंही देऊन गेल्या. हे ही नसे थोडके, कधी आनंदसरी तर कधी दुःखाश्रुंच्या सरी, कधी आशेचा किरण तर कधी निराशेचा काळोख, अशा संमिश्र जीवनाची वाटचाल झाली.
आजपर्यंत भल्या बुऱ्या अनेक प्रसंगाना श्री स्वामीकृपेने सामोरा जात राहिलो अन अजून तगून राहिलो ही त्यांचीच कृपा.

अकालीच झालेल्या माझ्या पत्नि वियोगाने (५३ वर्ष हे काय तिच्या जाण्याचं वय तरी होतं का ?) तिच्या विरहात होरपळलो. त्या आठवणींचा दाह, ते चटके झेलले. शेवटी काळ हेच त्यावरचे उत्तर असते या उक्ती प्रमाणे हळू हळू मागील बारा तेरा वर्षात मन शांत व्हायला लागलं. पहा नं नियतीचं असंच असतं, एका बाजूला दुःख देताना दुसऱ्या बाजूला चांगलं काहीतरी विधायक आपल्या पारड्यात टाकण्याचं काम ती करतच असते, याची प्रचिती मला आली. आयुष्यात कधी लिखाण केलं नव्हतं परंतु हृदयस्थ सदगुरुंमुळे तसेच स्वामी कृपेने मुळात अभिजात असलेल्या माझ्या साहित्य प्रतिभेला धुमारे, कोंब, डिरी फुटून एक उत्तेजक प्रेरणा, चालना, गती मिळाली अन लिहिण्याचा व्यासंग द्विगुणीत व्हायला लागला. काही काव्यसंग्रह, ललित लेखसंग्रह, प्रस्तावना, परीक्षण, पुस्तक परिचय असे लेखनाचे अनेक कंगोरे मला सापडत गेले अन धाग्याधाग्यांनी वस्त्र वीणावे तसे लेखनाचे अनेक अंगरखे तयार झाले.

मागील चालत्या बोलत्या आयुष्यात अनेक ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत असे ऋतु वर्षानुवर्ष अनुभवण्यास मिळाले. येणाऱ्या या प्रत्येक ऋतु ऋतुंनी मला आयुष्यात भरघोस सौख्य, चैतन्य दिले हे कसं बरं विसरेन मी? मी त्यांचा खरंच अत्यंत ऋणी आहे. चांगले नातेवाईक, मित्र – मैत्रिणी, सगे – सोयरे, सवंगडी, कवी – लेखक, नामवंत साहित्यिक, प्रकाशक तर मला दिलेच दिले पण, चांगले वाचकही मला लाभले हेच मोठे महतभाग्य म्हणायचे.

माझा मुलगा केदार, सूनबाई मयुरी, दुधावरची साय असणारी माझी दोन गोंडस नातवंडे शानिल व सांज अन माझी जिवश्च कंठश्च मित्रमंडळी माझ्यासाठी प्रेमाने खूप काही करतात हीच माझ्या यशस्वी, आनंदी जीवनाच्या वाटचालीतली पोचपावती आहे. हे निर्मळ सौख्य आज मला लाभले आहे. या नितांत, निवांत सुखद रिमझिम इंद्रधनुषि श्रावणसरीत न्हाऊन निघावे असा न्हाऊन भरून पावलो आहे. आणखी काय हवं असतं हो या उतार वयात ?

पुढच्या जन्मी तुला काय व्हावंसं वाटेल ? हा प्रश्न माझ्या एका जिवलग मित्राने विचारला, तत्क्षणी मी म्हणालो “मला पाऊस व्हायला आवडेल “……………

“घडलीच असतील काही पापं
माणूस म्हणून गत जन्मी
पाऊस होऊन धुवून टाकेन
अन मोक्षास पात्र होईन मी”

धुवांधार, मुसळधार, सतत कोसळणाऱ्या, कडकडाट करण्याऱ्या विजा अशा ऐन बरसणाऱ्या पावसाळ्यात माझा जन्म झाला, म्हणूनही असेल कदाचित पाऊस मला खुपच आवडतो. माझ्या गत जीवनातले बहात्तर पावसाळे मी निगुतीने पाहिले, अनुभवले. आयुष्याच्या कित्येक कहाण्या हिरव्याकंच, ओल्याचिंब, लुसलुशीत, प्रेरणादायी राहिल्या आहेत याची जाणिव अन भान वेळोवेळी होतच असते. स्वप्नाळू संदर्भ पेरणारा हा पाऊस माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्या टप्प्यांवर अनेक बीजं पेरून गेला.
त्या त्या उगवणाऱ्या प्रत्येक रोपट्यागणिक कधी नोकरी, कधी कारखानदार, कधी बिल्डर, कधी समाजसेवक, कधी संस्थापक अध्यक्ष, तर कधी वादक, चित्रकार अन आता कवी – लेखक अशा अनेक व्यासंगाच्या, पैलूंच्या रोपट्यांमधून वास्तवतेचे दर्शन आणि जागृत प्रचिती अनुभवण्यास मिळाली, हे माझे थोर महाभाग्यच !

माझ्या आयुष्यातली माझी कमाई काय ? अनेक क्षेत्रातील, अनेक स्तरातील सहृदयी, वाल्सल्यप्रेमी, कदरदार, जीवास जीव लावणारे, ओले ताजे जिवंत जिवनानुबंध जोपासणारे, ऋणानुबंध जतन करणारे, चिरकाल संबंध अबाधित ठेवणारे माझे मित्र, आप्त, सखे, सवंगडी, साहित्यिक हीच माझी कमाई अन हाच माझा ठेवा जो कोंदणात जपून ठेवावा असाच अगदी. मी तो चिरंतन जपू पाहतो, वृद्धिंगत करू इच्छितो.

इंद्रधनु प्रमाणे आयुष्याची, “सप्तरंगी वाटचाल” करताना “पिंपळपान” या काव्यसंग्रहची प्रथम निर्मिती झाली अन लेखन क्षेत्रात एक एक दमदार पाऊल पुढे पुढे पडताना आज “वाचकांच्या भेटीला” जाता आले या मागे “पापणपंखी” ची प्रेमळ खुमासदार “झुळूक” लेखन प्रवासाच्या पदपथावर निश्चितच मार्गदर्शक ठरली आहे हे निखालस सत्यच.

श्री स्वामी कृपेने उरलं सुरलं जीवन आनंदघन सरी बरसणारं, सुखसरींनी न्हाऊ घालणारं लाभो, एवढीच माफक अपेक्षा.

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सुनीलजी, अतिशय सुंदर भावनाविष्कार करणारे मनोगत लिहिले आहेत. आत्मचरित्र लेखनाची ही पहिली पायरी म्हणता येईल. लवकरच प्रारंभ होऊ द्यात. त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला निरोगी, निरामय आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.जीवेत् शरदः शतम्!🙏💐

  2. Dear Sunil, you have,in short given your life story which is heart touching and impressive.keep up the good work for ever and entertain us.
    Enjoy your birthday and stay blessed always.
    God bless you 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments