3 फेब्रुवारी 2016 या घटनेला काल नऊ वर्ष पूर्ण झाली. भारतीय सेना दलात सियाचिन ग्लॅशियरवर घडलेली ती एक दुःखद घटना होती.
सियाचीन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंचावर असलेली युद्धभूमी !! समुद्रसपाटीपासून 22 हजार फूट उंचीवर असलेली ही युद्धभूमी…
येथे तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांसाठी प्रत्येक क्षण हा खूप आव्हानात्मक असतो. मृत्यू कधी कोणत्या क्षणाला झडप घालेल याचा नेम नसतो. सतत घोंगवणारे वारे, बर्फाचा पाऊस आणि कधी बर्फाची कोणती भिंत कोसळेल याचा नेम नाही. त्यात अचानकपणे होणारे हिमस्खलन !!
12 हजार ते 22 हजार फूट उंचीवर असलेल्या या भागात कडाक्याची जीवघेणी थंडी पडते. हिवाळ्यात तर तापमान -50 ते – 70 अंश सेल्सिअस पर्यंत घसरते. अतिशय थंड वारा, आजूबाजूला सर्वत्र बर्फ, कडाक्याची थंडी आणि वाईट रस्ते या प्रतिकूल परिस्थितीमध्ये धडपडावं लागतं ते देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी !!
या घटनेला नऊ वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. जीव कासावीस होतो. मृत्यूशी झुंजावं तरी किती, याचं जिवंत उदाहरण म्हणजे लान्स नायक हनुमंथप्पा कोप्पाड !!
हनुमंथप्पा हे 19 मद्रास रेजिमेंटचे लान्स नायक होते. मूळचे कर्नाटकातील बेटादूर धारवाड येथील राहणाऱ्या हनुमंथप्पा यांची पोस्टिंग सियाचीन ग्लेशियरच्या भागात सोनम पोस्टवर होती. समुद्रसपाटीपासून 21000 फूट म्हणजेच 6400 मीटर उंचीवर असलेली ही जागा म्हणजे जिकडे तिडके बर्फाचे भले मोठे डोंगर.!! तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणूस त्या ठिकाणी एक तास सुद्धा राहू शकत नाही, अशा ठिकाणी तीन महिने किंवा एक महिना आपली सेवा देणे हे खरे जिकरीचे काम असते.
दिवस होता 3 फेब्रुवारी. 2016. आपल्या नऊ साथीदारांसोबत पोस्टवर गस्त घालत असताना अचानक हिमस्खलन झाले आणि काही समजायच्या आत एका क्षणात दहाही जण बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तब्बल 35 फूट बर्फाच्या ढिगाराखाली गाडल्या गेलेल्या या दहा जणांमध्ये हनुमंथप्पा सुद्धा होते.
काय अवस्था झाली असेल त्यांची ? ही घटना इतकी अचानक घडली की कुणालाही आपल्या बचावासाठी वेळ मिळाला नाही. वरतून कित्येक टन बर्फाचा दबाव त्यांच्यावर पडला.
बर्फात गाडल्या गेल्यानंतर माणसाची अवस्था काय होऊ शकते ? तेही 35 फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली ?.. फक्त विचार करून अंगाला काटा येतो. ह्या ढिगाऱ्याखालून वरती येणं शक्यच नव्हतं. थंडीच्या आवश्यक जॅकेट्सनी काय शरीर वाचणार होत.? त्यांची ऑक्सिजनची लेव्हल संपली असेल. त्यांचा किती जीव गुदमरला असेल याची कल्पना करवत नाही.
जीवघेण्या थंडीने त्यांचे संपूर्ण शरीर गोठून गेल असेल आणि शेवटी जे व्हायचं ते झालं.
तब्बल सहा दिवसानंतर म्हणजे 8 फेब्रुवारीला बचाव पथकाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले.
त्यांच्याबरोबरचे सर्व साथीदार मृत पावले होते. त्यांच्या वेगवेगळ्या अवयवांनी काम करणं थंडीमुळे बंद केल होतं.
खरंतर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणीही जिवंत राहणं शक्य नव्हतं. – 45 डिग्री तापमानामध्ये रक्त गोठवणारी थंडी, ऑक्सिजनचा कमी झालेले प्रमाण तुमचा एक एक ऑर्गन निकामी करत चालते.
बचाव पथकाने यांना जेव्हा बाहेर काढले तेव्हा बचाव पथकातील डॉक्टरांना हे लक्षात आले की हनुमंथप्पा हे अजूनही जिवंत आहेत. त्यांचा श्वास चालू होता. त्यांचं जिवंत असणं म्हणजे हा एक देवी चमत्कार होता. कुणाचाही विश्वास बसत नव्हता. त्यांच्याभोवती बर्फामध्ये खोल गाडले गेले असताना निर्माण झालेले एअर बबल्सनी त्यांना जिवंत राहण्यास मदत केली असा डॉक्टरांनी अंदाज लावला.
खरं तर सर्वांनी यांच्या आशा सोडल्या होत्या. कुणालाही वाटलं नव्हतं की यापैकी एकही जण जिवंत राहील. परंतु हनुमंथप्पा यांनी मृत्यूलाही हुलकावणी दिली होती.
सियाचीन ग्लेशियर म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लढणे. त्यांना जेव्हा बाहेर काढण्यात आले तेव्हा ते कोमात होते. त्यांना ताबडतोब सियाचीन बेस कॅम्प वरून परतापुर ला आणण्यात आले. तिथून चॉपर विमानाने त्यांना थाईस तळावर नेले. नंतर सी 17 विमानाने त्यांना दिल्लीला आणण्यात आले.
दिल्लीतील आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न चालू केले. त्यांच्या सिटीस्कॅन रिपोर्ट मध्ये मेंदूला ऑक्सिजन कमी झालेला दिसत होता. यकृत आणि किडन्यांमध्ये बिघाड झालेला होता. त्यांना दोन्ही फुफुसांमध्ये निमोनिया झाला होता. ते अजूनही व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्याबरोबरचे नऊ सहकारी वीर गतीला प्राप्त झाले होते.
हनुमंथप्पा अजूनही जिवंत आहेत या बातमीने त्यांच्या पत्नीचा आणि आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्यासह सर्व गावातील लोक खुश झाले होते, जणू एक आनंद उत्सव साजरा करत होते. परंतु त्यांचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही, या आनंदाचे दुःखात रूपांतर झालं. शेवटी शरीराचे अनेक अवयव काम न करता बंद पडायला लागले, अशा प्रकारे शरीराचे अवयव निकामी होऊन शेवटी 11 फेब्रुवारी 2016 ला 11 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी आपला देह सोडला. नऊ दिवस सतत ते मृत्यूची झुंजत होते.
त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांची मुलगी केवळ सहा महिन्याची होती आणि त्यांचं वय होतं अवघे 32 वर्ष.
या सर्व शौर्यगाथा लिहिताना आणि वाचताना एक लक्षात येते की आपलं आयुष्य खूप सुखांनी भरलेलं आहे परंतु हेच सीमेवर रक्षण करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे आयुष्य किती धोक्यात असते याची प्रचिती या घटनेतून येते
आणि आपसूकच लता दीदींचे..
“ए मेरे वतन के लोगो,
जरा याद करो कुर्बानी”…
हे गीत मनात तरळायला लागते .. या सर्व शुर वीरांना त्रिवार वंदन.
— लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को (नॉर्थ आफ्रिका)
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800