श्री. देवेंद्र व सौ अलकाताई, १४ जुलैचा डाॅ. सुलोचना गवांदे यांचा “सुख म्हणजे नक्की असत काय ?” हा लेख वाचला व खुप आवडला. सुख-दु:खाबद्दलचे त्यांचे विचार, विश्लेषण त्यांनी छान शब्दांत लिहिले आहे. शेवटी सुख-दु:खाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा न करणे हेच चांगले हे त्यांनी उदाहरणांनी छान मांडले आहे. असेच आणखी काही वाचायला मिळो ही आशा करते. या विषयावर बऱ्याच वर्षांपूर्वी मी केलेली हि शब्दरचना आठवली. ती तुमच्यापर्यंत पोचवते आहे.
——- सुखदुःख——-
सुख आणि दु:ख म्हणजे, ऊन पावसा सारखे असते
लपंडावाच्या त्यांच्या खेळांत, हार-जित चालूच असते ।।१।।
ऊन्हाचे दोनच कवडसे, पावसाला हटवतात
तर ऊन्हाचा आनंद घालवायला, काळे ढग टपून असतात ।।२।।
पण ,
सुखे हे कशात मानायचे, आणि दु:ख तरी कशाला म्हणायचे
आप-आपले सुख, दुःख, प्रत्येकानेच ठरवायचे असते ।।३।।
गारव्याची छोटीशी झुळुकहि, तापलेल्या वाळवंटात सुखावते
तर मखमलीच्या दुलईतली सुरकुतीहि, कांट्यासारखी खुपत रहाते ।।४।।
सदैव सुखी असणारे, अमाप सुखहि कमीच मानतात
तर अभागी लोक हंसतमुखाने, दु:खाचा डोंगर उचलतात। ।।५।।
सर्वजरी क्षणभंगूर आहे, या अशाश्वत जगतात
सुख-दुःखाच्या भावना मात्र, मनांत कायमच्या रहातात ।।६।।
एक मात्र खरे —
सुखाच्या आनंदात दुसरेहि, खुशीने सहभागी होतात
पण दुःखाच्या यातना मात्र, ज्याच्या- त्यालाच भोगाव्या लागतात ।।७।।
– रचना : सौ. लीना फाटक, वाॅरिंगटन, इंग्लंड.
सुरेख कविता
मनापासून धन्यवाद सुहास गोखले. सौ लीना फाटक