कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नुकताच सोमवंशी क्षत्रीय कासार समाजाचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. नवरात्रीचे 10 दिवस धार्मिक, स्पर्धा, आरती, श्रीसुक्त, होमहवन सर्व साजरे झाले. सर्व समाज एकत्र आल्याने दिवस आनंदात गेले.
W’app ग्रुप वर मेसेज आला, विविध गुणदर्शनमध्ये कुणाला भाग घ्यायचा असेल, तर नावे द्या.
मी हौसाबाई ! लगेचच, पहिलं माझं नाव दिले ! काय करायचे हे कांहीही न पहाता न ठरवता आधी नाव देऊन मोकळी झाले. (माझं वय फक्त ७९ वर्षे हं ! 😀) नंतर विचार केला सध्या आपल्या जीवनाची संध्याकाळ जशी घालवतो, त्याच विषयावर आपण एखादे गाणे ॲक्शनसह सादर करु या. मग पार्टनर शोधला. त्यांना तयार केले. गाणं तर मला माहित होत. पार्टनरला सगळं नीट समजावून सांगितलं. विचार केला की, आपल्याला कधीच असा प्लॅटफॉर्म सादर करायला नाही मिळाला. मग आलेल्या संधीचे सोने करु या.
जीवनाची संध्याकाळ
वर्धक्याच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण साठीचं !
अन् साठांव वरीस ग् काठीच ग् बुध्दीच्या नाठीचं.. ll ध्रु ll
पिसाट वारा थंडीचा, मफलर स्वेटर घालण्याचा
तोल जाऊनी पडण्याच, हाड कटकन मोडण्याच.. ll १ ll
अन् साठांव…..
अग अग म्हणतो पतिराज.. हे झालं बघ काय आज ?,
डॉ., वैद्य रोज सांगती… वय हे गोळ्या घेण्याचं गं.. ll २ ll
अन् साठांव…..
आपण दोघं पेशंट, सून मुलगा केअर टेकर
देवावर ठेऊनी भरोसा.., चालन बोलण जिकरीचं.. ll ३ ll
अन् साठांव…..
ओढ लागली भक्तीची, कीर्तन प्रवचन घालण्याची,
आज मला हे गुपित कळलं, भवसागर हा तरण्याचं..ll ४ ll
अन् साठांव…..
हे गाणं सादर केलं. सगळ्यांनी भरभरून दाद दिली.
आयुष्यभर संसार, मुले त्यांचे आरोग्यमय व संस्कारक्षम संगोपन, अथार्जन, संसाराच्या आर्थिक अडचणी यातच गेले. आमचे दुकान झेंडे, फेटे, पगडी, बॅचेस, सर्व पक्षांचे चिन्ह, झेंडे, धार्मिक कार्यक्रमाचे मटेरीयल यामुळे मी सून, हाऊस वाईफ + बिझीनेस वूमन + पत्नी + आई या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष देऊ शकले नाही. त्यातून मला केटरींगची आवड असल्याने मी भारती विद्यापीठाची सातारा रोड येथील लेडीज हॉस्टेलची 300 मुलींची मेसही चालवत होते. हे सर्व करत करत बासुंदी + पुलाव + बिर्याणी तसेच गोडा/काळा मसाला या सर्वांच्या ऑर्डरही घेत होते. अनेक विविध पदार्थ करुन सर्वांना खाऊ घालणे, तर फारच आवडते. तो माझा छंदच आहे आणि सर्वांना मदत करण्याची सवय असल्याने, ‘जिथे कमी-तिथे मी’, अशी उभी रहाते.
मी सतत वृद्धाश्रम, बालवाडी, महिला मंडळे, समाज, नातेवाईक, भिशीग्रुप, मैत्रिणींचे विविध ग्रुप या सर्वांत सामील होते व राजहंस पक्षी जसे दुध + पाणी एकत्र करुन दिले तरी दुधच प्राशन करतो आणि खाली पाणी रहाते तसे मी सर्वे ग्रुपमधे फिरले तरी चांगले ते स्विकारते बाकी सोडून देते व आनंदी रहाते. लाकडी तलवारीने खेळून संसार केला, पण आलेली कुठलीच संधी आता सोडायची नाही हे ठरविले.
मला सर्वजण म्हणतात पण, ‘या वयात एवढा उत्साह कसा ? काय गुपित तुमच्या उत्साहाचं ? आम्हाला तरी सांगा ! मग मी त्यांना सांगते…
1) सकारात्मक विचार शैली.
2) जशी आयुष्यात माणसे आली तशी स्विकारणे.
3) जशी परिस्थिती आहे ती आनंदाने स्विकारणे.
4) समोरची व्यक्ती कुणीही असो ॲडजेस्ट करुन वागणे + बोलणे.
5) सर्वांशी चांगले वर्तन ठेवणे.
मी माझ्या घरा बाहेर 25 वर्षापासून एक वाक्य लिहून ठेवले आहे… “जर सुख हवे असेल तर समोरच्यास बदलायला जाऊ नका स्वतःला बदला”. त्याचप्रमाणे मी वागते.
मैत्रिणी म्हणतात, कुठल्या चक्कीचा आटा खातेस ? आम्हाला तरी सांग ! सततच हिरवीगार असतेस. मी त्यांना सांगते, मी दुःखी आहे असं म्हणूच नका. कायम असेच समजा की, आपण मागच्या जन्मी केलेल्या पापांचे व चुकींचे प्रायश्चीत्त देव आपल्याला देतो, की जेणे करुन आपण या जन्मी असे काळजीपूर्वक वागावे-जगावे की, पुढच्या जन्मी आपल्याला पुन्हा दुःख व भोग नको.
म्हणूनच मला या कार्यक्रमाची संकल्पना सुचली व या व्हिडीओच्या मार्फत मी सादरीकरण केले. तुम्हाला ते कसे वाटले ? अवश्य कळवा.
— लेखन : कुंदा मुरुडकर. पुणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सर्वच छान👍👌
खूप छान. सकारात्मक लिखाण आणि विचार 👍
खूपच छान मस्त साठाव वरिस.सादरीकरण उत्तम 👌👌
खूप छान कविता ,संकल्पना ,सादरीकरण -सर्वकाही 👌👌👍👍👏👏👏🎉🎉🎉🎉🙏🙏🙏