काट्यानी घेरलं म्हणून काय
फुलानी रडत बसायचं ?
नाय नाय नाय….
उलट काट्यानाच अंगावर घेउन
गुलाबासारखं फुलायचं
संकटानी घेरलं म्हणून काय
रडत कुढत बसायचं ?
नाही, बिलकुल नाही…
उलट संकटाशी सामना करून
विजयानं हसायचं
दुःखाकडे बघतानाच मुळी
सुखाच्या चष्म्यातून बघायचं
आणि….
दुःखही आपण सुख समजून
हळूहळू पचवायचं
दुख्ख.., ते चघळत नाही बसायचं
ते गटकन गिळायचं
आणि…
सुख मात्र आरामात रवंथ करीत
चवीनं चघळायचं
रात्रीला कशाला घाबरायचं ?
उलट चांदण्यात खुलायचं
आणि…
सुखाचा उरात महापूर आणून
दुःखाला त्यात वाहून घालवायचं
– रचना : पांडुरंग कुलकर्णी