सिडकोने विकसित केलेल्या, नवी मुंबईतील सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्स या गृह संकुलात ९ गृहनिर्माण संस्था आहेत. या संस्था आणि अंतर्गत परिसराच्या देखभालीसाठी, विविध प्रकारच्या उपक्रमांसाठी मिलेनियम टॉवर्स हाउसिंग सोसायटी फेडरेशन नियमितपणे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असते.
दिवाळी निमित्त, या फेडरेशनने प्रतिथयश गायिका प्रा डॉ मृदुला दाढे यांचा “रहे ना रहे हम” हा केवळ गीत संगीताचाच नाही तर चित्रपट गीतांच्या रस ग्रहणाचा बहारदार, नितांत सुंदर असा कार्यक्रम नुकताच संकुलाच्या हिरवळीवर आयोजित केला होता.

एकेक गाजलेले गीत, ते लिहिण्यामागची गीतकाराची भावना, संगीतकाराने दिलेल्या चालीचे मर्म आणि संबंधित गायक, गायिका यांनी त्या गीताचा, चालीचा, संगीताचा आशय लक्षात घेऊन ते गाणे का, कसे गायले, कुठल्या शब्दांवर भर दिला, असे सर्व मृदुलाताईंनी छानपैकी समजावून सांगितल्याने ही गीते वरवर न ऐकता, कशी कान देऊन ऐकली पाहिजे, जेणेकरून गाण्यांचा अधिकाधिक आनंद घेता येईल, हे कळल्याने उपस्थितांची अभिरुची वाढण्यास नक्कीच मदत होईल. विशेष म्हणजे त्या मराठी बरोबरच हिंदी भाषेतही निरूपण करीत राहिल्याने विविध भाषिक रहिवासी त्यांना वेळोवेळी दाद देत गेले. ही रात्र कधी संपूच नये, असे वाटणारा असा हा कार्यक्रम झाला.
यावेळी मृदुलाताईंना अमोल चव्हाण या त्यांच्या युवा शिष्याने द्वंद गीतात साथ दिली. तसेच काही गाणी स्वतंत्रपणे गायली. त्यालाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
साथ सांगत…
मृदुलाताईंना आणि अमोल यास श्री ऋषीराज साळवी यांनी तबला, श्री हर्षल कलबाती यांनी ढोलक आणि ऑक्टोपेड,श्री प्रशांत लळीत यांनी सिंथेसाईझर, श्री व्यंकटेश कुलकर्णी यांनी साइड रिदम या प्रमाणे अतिशय सुंदर साथसंगत केली. ध्वनी व्यवस्था श्री पांचाळ यांनी समर्थपणे सांभाळली.
प्रारंभी मिलेनियम टॉवर्स हाउसिंग सोसायटी फेडरेशन चे श्री श्रीकांत जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले. तर सौ माधुरी जोशी यांनी मृदुलाताईंचा परिचय करून दिला.

“माध्यमभूषण” भेट :-
यावेळी विविध प्रसार माध्यमांतील विविध प्रकारची कामे करणाऱ्या ३६ व्यक्तींच्या जीवन कथा असलेले, “माध्यमभूषण” हे पुस्तक, लेखक तथा मिलेनियम टॉवर्स चे रहिवासी श्री देवेंद्र भुजबळ यांनी मृदुलाताईंना भेट दिले.

तसेच प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या आणि मृदुलाताईंचीही जीवन कथा असलेल्या त्यांच्या आगामी पुस्तकाची सद्यस्थिती त्यांना अवगत केली.

दीर्घकाळ मनात रेंगाळत राहिल अशा या सुरेल कार्यक्रमास मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
