दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख.
अटलबिहारी वाजपेयी यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा अजातशत्रू, कविमनाचा, संवेदनशील, हळवा तरीही प्रसंगी कठोर भूमिका घेणारा लोकनेता पुन्हा होणे नाही. पन्नास वर्षाहून अधिक काळ राजकारणात राहूनही केवळ सहा वर्षे सत्ता भोगणारा, तरीही कायमच जनतेच्या प्रेमाला आणि आदराला पात्र असणारा नेता म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.
अल्पकाळ सत्तेवर असूनही अटलजींनी देशाच्या राजकारणावर आपला विशिष्ट ठसा उमटवला तो अंगभूत सद्गुणांच्या बळावरच. देशाच्या इतिहासात असे नेते अगदी थोडेच असतात. आज सर्वजण अटलजींची तुलना भारताची पायाभरणी करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी करतात. थेट नेहरूंशी नाते प्रस्थापित करणाऱ्या या नेत्याने आपल्यातली हिंदू प्रेरणा कधीही लपविली नाही. अटलजी कडवे हिंदू नव्हते. ते भारताच्या अथांग आणि समृद्ध परंपरेत मुरलेले हिंदू होते.
गंगेबद्दलच्या नेहरूजींच्या आणि अटलजींच्या भावना एकसारख्याच होत्या. भारताच्या लोकशाहीचा नेहरूजींनी रचलेला पाया अटलजींसाठी आदरणीय होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारांवर त्यांची जेवढी श्रद्धा होती, तेवढीच नेहरूजींच्या विचारांवर होती. भारताची जडणघडण आणि परराष्ट्र धोरण यावर अटलजींचा नेहरूजींशी कधीच वाद नव्हता.
जवाहरलाल नेहरू यांना अटलबिहारी या तरुण नेत्याबद्दल विशेष कौतुक होते. तरुण वाजपेयीमधील गुण नेहरुंनी तेव्हाच ओळखले होते आणि त्याला दादही दिली होती.नेहरूंचा हा उदारमतवाद वाजपेयींनी आयुष्यभर जपला. बांगलादेश स्वतंत्र केल्याबद्दल त्यांनी इंदिरा गांधी यांचे ‘दुर्गा’ ही उपाधी देऊन खुल्या दिलाने कौतुक केले.

याच इंदिराजींनी त्यांना आणीबाणीत तुरुंगात टाकले. पण त्यानंतरच्या निवडणुकीवेळी अटलजींची वाणी देशभर समशेरीसारखी तळपली. काँग्रेसच्या ध्येयधोरणांचे आणि हुकुमशाहीचे त्यांनी वाभाडे काढले. परंतु या समशेरीने कधीही विखारी जखमा केल्या नाहीत.
अजोड वक्तृत्त्व ही अटलजींना मिळालेली आणखी एक ईश्वरी देणगी. भाषा त्यांच्यावर प्रसन्न होती. परंतु ती किती तोलून मापून वापरायची याचे भान त्यांना सदैव होते. सभेतील भाषणे आणि संसदेतील भाषणे यातील फरक ते ओळखत होते. भाषेवर हुकमत गाजवणारा त्यांच्यासारखा नेता अलीकडच्या काळात झाला नाही.
अटलजींचे साहित्यावरील प्रेम हे एका कवीचे प्रेम होते. त्यांची देशावरील निस्सीम भक्ति हा त्यांच्या कवितेचा प्राण होता. नरसिंहराव आणि अटलजी यांच्या गाढ मैत्रीचा दुवा म्हणजे त्यांची कविता होती, या मैत्रीला साहित्याचे अंग होते. मुत्सद्देगिरीतील हे दोन निष्णात खेळाडू साहित्याच्या आस्वादात रमणारे होते. या काव्यप्रेमामुळेच असेल कदाचित, अटलजी सदैव मातृहृदयी होते. हिंदू असल्याचा त्यांचा अभिमान कधीही दुराभिमान झाला नाही.
अटलजींचे १९९६ मधील पहिले सरकार तेरा दिवसात पायउतार झाले. हिंदुत्त्ववादी शक्तींना बाहेर ठेवण्यासाठीच सारे विरोधी पक्ष एकत्र आले. या देशात हिंदू बहुसंख्य असूनही अल्पसंख्य असल्याची भावना त्यांच्यात का बळावत आहे, हा त्यावेळी त्यांचा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय होता. राजीनामा देतांना त्यांनी याच मुद्द्याची चर्चा केली. परंतु वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, हे सरकार पडले तरी भाजपचे मित्र पक्ष वाढतच राहिले. तेरा दिवसांनंतर तेरा महिने आणि त्यानंतर पाच वर्षे त्यांचे सरकार अव्याहत चालले. असंख्य पक्षांची मोट अटलजींनी लीलया सांभाळली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप स्वपक्षीयांइतकीच विरोधी पक्षीयांवरही पडत असे. इतकेच नव्हे तर क्लिंटन, नवाझ शरीफ यांच्यासारखे परदेशी नेतेही अटलजींना आपले मित्र मानत असत.
अटलजींचे अमोघ वक्तृत्त्व आत्मविश्वासाने तुडुंब भरलेले असले तरीही त्यात उदारमतवादाचा धागा स्पष्टपणे दिसत असे. अटलजींचे पंतप्रधान कार्यालय हे सर्वात कार्यक्षम कार्यालय होते, असे अनेक ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
थोडक्यात, अटलजी म्हणजे राजकारणातील सुसंस्कृत चेहरा होता असेच म्हणावे लागेल. म्हणून मला त्यांचे नेतृत्त्व आवडत असे..

— लेखन : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
