सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे समन्वयक म्हणून काम करण्याचे भाग्य प्रा डॉ सतीश शिरसाठ यांना लाभले.
भाग्य यासाठी की, आपल्या समाजातील ‘आद्य समाजक्रांतिकारक’ असा ज्यांचा गौरव केला जातो, अशा महात्मा जोतीराव फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू त्यांना सापडले.
अशा महामानवाला, म.जोतीराव फुले यांना त्यांच्या ११ एप्रिल, या जन्मदिनी वाहिलेली ही शब्द सुमनांजली…
महात्मा जोतीराव फुले यांचा गौरव ‘आपल्या देशातील आद्य समाजक्रांतिकारक’ असा केला जातो. समाजातील विषमता (विशेषत धर्मांधतेमुळे), अज्ञान, शोषण, अनिष्ट रूढी इ.ची धूळ झटकून टाकण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिक पातळीवर जसे कार्य केले तसेच पत्नी सावित्रीबाईंसोबतही प्रचंड कार्य केले. औपचारिक शाळांची स्थापना, त्यांचे देखणे आणि नेटके व्यवस्थापन, शाळांचे ठेवलेले चोख हिशोब, त्यांच्या यशस्वी संचालनाने उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे तयार झालेले अनेक विद्यार्थ्यी …अशा प्रकारे औपचारिक शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत त्यांचे विचार आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेले कार्य क्रांतिकारकच आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारसमोर शिक्षणाबाबत त्यांनी मांडलेली कैफियत, विदारक आणि शोचनीय सद्यस्थिती तसेच त्यात सकारात्मक, आमूलाग्र सुधारणा व्हावी यासाठी सुचवलेल्या उपाययोजना आजही मार्गदर्शक आहेत.
जोतिबा औपचारिक शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण, महिलांचे शिक्षण, कामगारांचे शिक्षण, उपेक्षित आणि वंचितांचे शिक्षण यांचा सतत पुरस्कार करत. समाजातील सारे अनर्थ एका अविद्येने केले असे ते ठासून सांगत. “दारूवर पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा ग्रंथासाठी वापरा, स्त्री पुरूषांनी कष्टकरी व्हावे, मुली आणि मुलांना शिक्षण द्यावे” असा सल्ला ते देत. इतकेच काय, भारतातील पहिले सामाजिक नाटक म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या म.फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकातील एक खेडूत आणि शेतकरी जोडपे जे अज्ञान, अंधश्रद्धा आणि रूढींच्या जोखडाने सर्व बाजूंनी नाडले गेले आहे, ते या संकटातून मुक्त होण्यासाठी शेवटी निश्चय करतात की, ‘आता शिक्षणाची कास धरू’
या नाटकातील बाईच्या नवऱ्याने पुरूष आणि स्त्रियांसाठी सुरू केलेल्या रात्रशाळेची माहिती दिल्यावर त्याची पत्नी म्हणते, “ठीक आहे. चला तर आपण दोघे आजपासून रोज रात्री फुल्यांच्या शाळात जाऊन लिहिणे, वाचणे शिकू. म्हणजेच पुढे जगातील सर्व गोष्टी आपणांस कळूं लागतील”.
नाटकातून हे सांगताना म.फुले हे स्वतःच्या रात्रशाळेची टिमकी वाजवत नाही तर ‘शिक्षण’ हे ‘सर्वसामान्य माणसाच्या दु:खाचे खरे औषध आहे’ हा मौलिक सल्ला देतात.
म.फुले यांचे विविध सामाजिक, शैक्षणिक कार्य, साहित्यप्रसार यांतून लोकांशी त्यांचा जो संवाद घडून आला, त्याचे दृश्य परिणाम म्हणजे दिसून येणा-या सामाजिक सुधारणा आणि घडून आलेले समाजपरिवर्तन ! त्यांनी समाजातील विविध स्तरांवरील लोकांशी संवाद साधताना उपयोगात आणलेल्या कौशल्यांचा आढावा घेऊन त्यांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे, असे सतत वाटते.
म.फुले हे देशीय परंपरेशी निगडित होते. येथील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्या प्रश्नांचा सखोल व बारकाईने अभ्यास केला होता.इथले प्रश्न, संस्कृती, चालीरीती, व्यवहार आणि माणसांचा सूक्ष्मपणे त्यांनी अभ्यास करून त्यातून या मातीत रुजणारी देशीय संवाद कौशल्ये त्यांनी विकसित केली होती. ‘प्रयोग करा व शिका’ या पध्दतीतीचाही त्यांनी वापर केला होता. आपल्या कार्यात, आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी झाले होते. अशाप्रकारे त्यांची संवादाची कौशल्ये अनुभवजन्य होती.
जोतिबांचा जीवनकाल १८२७ -१८९० असा आहे. त्यांना अनेकदा विविध प्रकारच्या साधनांपासून वंचित रहावे लागे. त्याकाळी आजच्यासारखी दळणवळणाची, संपर्कमाध्यमे नव्हती. त्यांची उपलब्धता दुर्मीळ होती. अनेकदा त्यांना आर्थिक पाठबळ, साधनांचे सहकार्य मिळाले नाही.
उदरनिर्वाहासाठी त्यांनी विविध व्यवसायही केले. त्यातून मिळणा-या पैशातून समाजकार्यही केले. त्यांनी समाज परिवर्तनातून लोकहिताचा मार्गही चोखाळला. तो अनेकदा प्रचलित समाज प्रवाहाविरूध्द होता.
त्यांनी पुरस्कार केलेली विचार-मूल्ये ही लोकांना पटणारी नव्हती. यामुळे त्यांना लोकांचे सहकार्य मिळाले नाही. ब-याचदा रोषही पत्करावा लागला. त्यांची पत्नी सावित्रीबाई, पुढे जाऊन मुलगा यशवंत यांनी त्यांना जीवनभर साथ दिली. या साऱ्यातून म.फुले हे आपल्या सुधारणावादी संदेशांचा प्रसार करण्यात यशस्वी झाले.ते आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ होते. निस्पृहता, स्वच्छता, पारदर्शकपणा, कोणताही अपपर भाव मनात न आणता ठेवलेला व्यापक दृष्टिकोन असा आपल्या कार्यपद्धतीने त्यांनी लोकांत विश्वास निर्माण केला होता.
त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा समाजात तेव्हाही उमटला होता त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची’ त्यावेळी संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यात पोहोचलेली सामाजिक चळवळ’अशी नोंद केली जाते. आजही हा ठसा टिकून आहे.त्यांचे एक जीवलग सहकारी भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या शब्दांत
“जोतीरावांच्या कार्याची ध्वजा फडकत आहे”.
आजही अनेक जण त्यांचे कार्य पुढे नेत आहेत. म.फुले यांनी आपल्या कार्यातून, साहित्यातून, जगण्यातून आणि वागण्यातून ज्या प्रेरणा निर्माण केल्या आहेत त्या मौलिक आहेत. म.फुले हे एका व्यक्तीचे नाव राहिले नाही तर ती एक ज्ञानशाखा म्हणून ओळखली जाते. यात त्यांच्याबरोबरच सावित्रीबाई फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेबाबा इ.महामानवांचा समावेश करता येईल. याच ज्ञानशाखेत म.फुले यांच्या पूर्वीच्या गौतम बुद्धांपासून अलिकडच्या काळातील अनेक समाजकार्यकर्त्यांचा उल्लेख करता येईल.
म.फुले ज्ञानशाखेची काही वैशिष्ट्ये-
– प्रत्येक माणूस हा श्रेष्ठ आहे.जन्माने तो लहान किंवा मोठा समजणे चूक आहे.
– सर्वसामान्य माणूस (विशेषत: समाजातील सर्वहारा, शोषित, गरिब, स्त्रिया इ.) हा अज्ञान, विषमता, सर्व बाजूंनी होणारे शोषण, धर्मांधतेमुळे होणारा अन्याय यामुळे बेजार होतो.
– समाजातील दारिद्र्याचे – विषमतेचे उदात्तीकरण यामुळे तो हतबल होतो,त्याच्या संवेदना बोथट होतात.
– यातून मुक्त होऊन स्वतःच्या उन्नतीसाठी सिध्द होण्यासाठी तो स्वावलंबी झाला पाहिजे.
– स्वसामर्थ्याची ओळख,स्वावलंबन, आपल्यासारखेच इतर शोषितांच्या श्रृंखलेत त्याने स्वतःला गोवून घेतले पाहिजे.संघटीत झाले पाहिजे.
– शिक्षण हे माणसाला समर्थ बनवण्याचे प्रभावी साधन आहे.
-सारी सर्वहारा माणसं बहुधा शिक्षणापासून वंचित असतात. शिक्षण मिळण्यातील भौतिक अडचणींबरोबरच या समाजघटकांना शिक्षण घेण्याच्या मार्गातही अडथळे आणले जातात. शिक्षण हे आपल्याला शक्यच नाही आणि ते मुळात आपले कामच नाही हे त्यांच्या मनावर बिंबवले गेल्याचे विपरित परिणाम- ते शिक्षणापासून वंचित राहिल्याचे दिसते.
– सर्वसामान्य माणसाची मुस्कटदाबी थांबावी आणि त्याने आपल्या जीवनाला व्यक्त करावे यासाठी लोकशाही प्रणालीचा स्वीकार समाजजीवनात झाला पाहिजे.
– हेकटपणा, दांभिकपणा, फसवणूक, कोणत्याही क्षेत्रात मध्यस्थांची लुडबुड, श्रेष्ठत्वाचा अहंकार या वृत्तींचा धिक्कार केला पाहिजे.
– धर्माच्या नावाखाली सामान्यांचे शोषण , अन्याय यांचा धिक्कार केला पाहिजे.
– स्वातंत्र्य,समता, बंधुता, सामाजिक न्याय, सत्य यांची प्रतिष्ठापना झाली पाहिजे.
– सर्वसामान्य माणसाच्या उत्थानाच्या दृष्टीने त्याचा भौतिक विकास झाला पाहिजे.
– धर्मग्रंथात उल्लेख असलेल्या किंवा तसा उल्लेख असल्याचा दावा करणा-या, सामान्य माणसांच्या फसवणूक- शोषण करणा-या तत्त्वांची चिकित्सा केली जावी.
– ज्यामुळे सामान्य माणूस नाडला जातो, अशा अनिष्ट रूढी आणि विषमतेवर प्रहार केला पाहिजे.
– सतत लोकप्रबोधन आणि लोकशिक्षण केले पाहिजे.

– लेखन : डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

🌹खूप विचारपूर्वक लेख लिहिला आहे 🌹
अप्रतिम सर 🌹🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
कर्जतची साहित्यिक कामगिरी,भौगोलिक स्थान व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे पुस्तकांचे गाव असणे योग्य ठरेल