भिवंडी येथील सेतू प्रकल्पांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन नुकतेच भिवंडी- निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी
महापालिकेच्या वतीने या उपक्रमास सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
निवृत्त अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन तथा सेतू चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री सतीश त्रिपाठी, निवृत्त कृषि संचालक तथा सेतू चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री अशोक लोखंडे, निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांचीही यावेळी समयोचीत भाषणे झाली.
पत्रकारितेतील “चौथास्तंभ” हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री देवेंद्र भुजबळ यांचा यावेळी श्री सतीश त्रिपाठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंब्रा सेतू प्रकल्प व्यवस्थापक श्री समीर अली यांनी
कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी मुख्य समन्वयक (समुदाय विकास) श्री एस बी कुलकर्णी, उल्हासनगर येथील फार्मसी पॉलिटेकनिकचे प्राचार्य के.एम, कुंदनानी, भिवंडी – निजामपूर महानगरपालिकचे शहर अभियंता
श्री गायकवाड, भिवंडी सेतू प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती नसरीन अन्सारी, आणि लाभार्थी मुली, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुमारे तीन महिने चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात ७५ गरजू मुली व महिलांना शिवण कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
“सेतू ” : परिचय
समाजातील दुर्बल घटकातील बालके, युवक- युवती, महिला, लैंगिक कामगार, निराधार घटक यांच्यामध्ये आरोग्यविषयक, सामाजिक, आर्थिक क्षमता विकसित करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणे यासाठी सेतू संस्था प्रामुख्याने कार्यरत आहे.
याशिवाय जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, शेवगा लागवड यासाठी महाराष्ट्रातील ठाणे, औरंगाबाद, परभणी, जालना, हिंगोली तसेच उत्तर प्रदेशातील देवरिया या जिल्ह्यात लोकसहभाग आणि सीएसआरच्या माध्यमातून संस्था काम करीत आहे.
प्रशासकीय क्षेत्रात अनेक वर्षे काम करूनही,मातीशी घट्ट नाळ असलेले, अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सतत कार्यशील, “प्रशासनातील लोकसेवक” असा लौकिकप्राप्त श्री सतीश त्रिपाठी यांनी ही संस्था स्थापन केली आहे. संस्थेला मार्गदर्शन करण्यात तसेच दैनंदिन कामकाजातही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो.
विशेष म्हणजे, परदेशात वास्तव्य असलेले त्यांचे चिरंजीव मयांक आणि कन्या मयूर यांचीही संस्थेच्या कामात सतत भरीव मदत असते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800.