आज, कस्तुरबा गांधी यांची पुण्यतिथि आहे. गेल्या वर्षीच्या पुण्यतिथी निमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आशा कुळकर्णी यांनी बां वर लिहिलेला लेख आपण प्रसिध्द केला होता. तर आज त्यांनी लेख लिहिला आहे, तो कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट च्या कामकाजावर.
बां ना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींसह अनेक राष्ट्रीय नेत्यांना चले जाव चळवळी दरम्यान, १९४२ मध्ये ब्रिटीशांनी तुरुंगात टाकले.
गांधीजी आणि कस्तुरबा दोघेही पुणे येथील आगाखान प्रसादात कारागृहात होते. कस्तुरबा सतत आजारी असत. बंदिवासातच २२ फेब्रुवारी १९४४ रोजी बांचे निधन झाले. गांधीजींना अश्रू आवरेनात. ६२ वर्षांची जीवनसाथ तुटली. बापू एकाकी झाले. जनक्षोभ होऊ नये आणि सुरक्षेसाठी मोजक्याच नातेवाईक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रसादाच्या मागील बाजूस नदीकाठी कस्तुरबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बांच्या स्मरणार्थ देशभरातून देणग्या आल्या. महात्मा गांधींनी त्या निधीतून १९४५ साली कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट स्थापन केला.
कस्तुरबा ट्रस्ट ही महिला सक्षमीकरणाचे ध्येय असलेली महात्मा गांधींनी स्थापन केलेली भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. ट्रस्टचे मुख्यालय इंदौर येथे असून येथे कस्तुरबा ग्रामची स्थापना व्हावी अशी बापुजींची इच्छा होती. गांधीजी नंतरही ट्रस्टला महान अध्यक्षांची परंपरा लाभली. त्यात सरदार वल्लभभाई पटेल, ठक्करबाप्पा, दादासाहेब मावळंकर, लेडी प्रेमलीला ठाकरसी, श्रीमती लक्ष्मी मेनन, मणीबेन पटेल तसेचडॉ. सुशीला नायर अशा महान व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टने उत्तरोत्तर प्रगती केली. ट्रस्टची ८०% हून अधिक शाखा व केंद्रे ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागात वसलेली असून गरीब, आदिवासी आणि वंचित समाजाच्या विकासाचे कार्य करत आहेत. हे कार्य केवळ ट्रस्टच्या निर्भीड, ध्येयवादी आणि समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सेविकांमुळेच साध्य होत आहे.
मध्यप्रदेशात इंदौर शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या कस्तुरबाग्राम पासून ट्रस्टच्या कार्याची खरी सुरुवात 2 ऑक्टोबर १९५० पासून झाली. हे कस्तुरबाग्राम विविध उपक्रमांचे प्रेरणास्थान आहे. येथे बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, कृषीविज्ञान केंद्रे, नर्सिंग तसेच सेविकांचे प्रशिक्षण केंद्रे या शैक्षणिक संस्था आहेत. २५ खाटांचे एक छोटेखानी इस्पितळ असून आसपासच्या ३० गावांना आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य करते. गोशाला आणि पशु चिकित्सालय आहे. सुत कताई, बुनाई, रंगाई, सिलाई असे वस्त्रोद्योगाचे खादीचे सर्व विभाग शास्त्रोक्त पद्धतीने चालवले जातात त्यातून प्रशिक्षणाबरोबर निर्मिती व विक्रीही साधली जाते. कस्तुरबाग्राम मध्ये बँक, पोस्ट ऑफिस, विद्युत केंद्र इत्यादी सुविधाही उपलब्ध आहेत.
महिलांच्या आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सर्व उपक्रम राबवले जातात. त्याच बरोबर पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीही मदत केली जाते. त्यामध्ये वसतिगृह तसेच अल्पवेळ निवासस्थाने, कायदेशीर सल्ला, वैवाहिक आणि कौटुंबिक समुपदेशन या सारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.
कस्तुरबाग्राम मध्ये गांधीदर्शन प्रदर्शन आणि कस्तुरबा ग्रंथालय असे दोन महत्वाचे उपक्रमही आहेत. ग्रंथालयातील २७ हजारांहून अधिक पुस्तकांचा तसेच प्रेरणादायी अशा प्रदर्शनाचा लाभ रोज हजारोंनी लोक घेतात. तसेच “कस्तुरबा दर्शन ” नावाचा एक तिमाही अंक गेली ६० वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होतो. हा एक अतिशय रचनात्मक उपक्रम महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका निभावत आहे. कस्तुरबा आरोग्य सदन इस्पितळ १९५२ मध्ये सुरु झाले आणि आज आसपासच्या ३५ ते ४० गावांतील जनतेला एक वरदानच ठरले आहे. येथील रक्त तपासणी विभाग १९९७ मधे सुरु झाला, आणि आज पर्यंत सातत्याने अतिशय अल्पदरात सर्व चाचण्यांची सुविधा गरीब जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे.
अशांत क्षेत्र घोषित झालेल्या उत्तरेकडील राज्यांमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी महिला शांती सेनेची स्थापना ट्रस्टने केली असून ट्रस्टच्या सेविकांनी अतिशय धीराने अत्यंत कठीण प्रसंगातून विकासाचे कार्य केले आहे. भूकंप, दुष्काळ आणि महापूर सारख्या नैसर्गिक आपत्ती असो अथवा मानवनिर्मित दंगे असोत सर्व सेविकांनी मनोधैर्य ढळू न देता काम केले आहे. यातील काही उल्लेखनीय कामे पुढील प्रमाणे आहेत.
१) १९६२ च्या चीनच्या आक्रमणा नंतर सरहद्दीवरील गावे ओस पडू लागली तेंव्हा सेविकांनी महत्प्रयासाने त्यांना धीर देऊन विस्थापित होण्यापासून वाचवले
२) आसाम राज्यातील आतंक माजवलेल्या नक्षलवाद्यांशीही अनेकदा दोन हात केले.
३) बिहार जिल्ह्यातील गुन्हेगारी सर्वश्रुत आहे. परंतु तेथे सेविकांना ग्रामस्थांना धीर देऊन महिला व बालविकासाचे कार्य सुरूच ठेवले.
४) पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बाल विवाहाचे प्रमाण कमी करण्यात ट्रस्टच्या सेविकांची महत्वाची भूमिका आहे. त्यांनी तरुणींच्या क्षमता वृद्धीचे महत्वाचे कार्य केले आहे.
५) दिल्लीतील १९८४ च्या दंगल पीडितांना सेविकांचा फार मोठा आधार वाटला. ५० हून अधिक दंगल पीडितांना त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यास मदत व महिलांना आश्रय असे मोलाचे कार्य सेविकांनी केले आहे.
६) श्रीनगरमधील पंडित जेव्हा आतंकवाद्यांना कंटाळून जम्मूला विस्थापीत झाले तेंव्हा त्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा सेविकांनीच सुरु केली.
७) मध्य प्रदेशातील आदिवासी मुलींकरिता गेली ४० वर्षाहून अधिक काळ शैक्षणिक सुविधा पुरवण्यात ट्रस्टचे मोठे योगदान आहे आज ११०० आदिवासी मुली शाळेत शिकतात आणि वसतिगृहाचा लाभ घेतात.
८) ओरिसातील चक्रीवादळाच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी खंबीरपणे सेविकांच जनतेला मार्गदर्शक ठरल्या. एका आठवड्यात १६० हून अधिक प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्याचे महा कठीण काम याच शूर वीरांगनांनी करून दाखवले आहे. अनेक मैल पायी चालून रुग्णांना झोळीतून नेऊन वैद्यकीय सुविधा पुरवल्या आहेत.
९) राजस्थानातील २६ लाखांहून अधिक विधवांसाठी त्यांच्या संपत्तीवरील हक्कांसाठी याच सेविकांनी लढा दिला.
हा ट्रस्ट म्हणजे महिला सक्षमीकरणाचे गांधीजींनी पाहिलेले स्वप्न होते. महिला व बालकांचा सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट घेऊन ट्रस्ट चे कार्य सुरु आहे. ट्रस्टचा पसारा आसाम पासून गुजरात पर्यंत आणि जम्मू काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत पसरलेल्या विशाल अशा भारत देशात २३ राज्यातील ११७ शाखांमधील ४५० हून अधिक केंद्रांमार्फत लाखो लोकांपर्यंत पोचला आहे. ट्रस्टच्या सेविकांची हा प्रचंड पसारा सांभाळून सर्व उपक्रम अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरळीत राबवण्यात खूप मोठी भूमिका आहे. ट्रस्टच्या सेविका म्हणजे खरी पुंजी असून ट्रस्टचा कणाच आहेत.
ट्रस्टची महाराष्ट्रातील पहिली शाखा पुणे जिल्ह्यातील सासवड येथे सुरू झाली. पुढे विस्तार होत गेला. नुकतीच मेळघाटातील धारणी येथील उपशाखेला भेट देण्याचा मला योग आला. तेथील सर्वात जुन्या बालवाडीसाठी विकसित केलेल्या राधा दामोदर बालोद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या उपशाखेची सुरुवात बालवाडीने झाली आज येथे ६५ बालके शिकतात. बालवाडीला जोडूनच कस्तुरबा गांधी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असून तेथे अंदाजे ५०० विद्यार्थी शिकतात.
मेळघाटातील गोंडवाडी या अतिदुर्गम भागात १९५० साली महात्मा गांधींच्या घराण्यातील ताराबेन मश्रुवाला यांनी ग्रामीण आरोग्य केंद्र सुरु केले. काही स्थानिक महिलांना आरोग्य सेविकेचे प्रशिक्षण दिले. या केंद्राचा लाभ आजूबाजूच्या गावातील शेतकरी, महिला व बालकाना झाला. प्रसूती, लसीकरण इत्यादी सेवा दिल्या जात.
बाल संगोपनाबरोबर बालवाडी सुरू झाली. नंतर प्राथमिक शाळा. आणि आता कस्तुरबा गांधी गोंडवाडी निवासी आश्रम शाळेचा माध्यमिक विभागही २००६ पासून सुरु झाला. ट्रस्टच्या दोन्ही शाळांचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल दर वर्षी शंभर टक्के लागतो. या निवासी आश्रमशाळेत एकूण २४० विद्यार्थी, विद्यार्थिनी आनंदाने, खेळीमेळीच्या वातावरणात राहतात, शिकतात.
असे विविध विधायक सामाजिक कार्य करणारा हा ट्रस्ट आहे. या ट्रस्ट च्या आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800