समाजाकडून आपणास बरेच काही मिळाले आहे आणि आपण जे काय घडलो त्यात समाजाचा वाटा देखील महत्त्वाचा आहे याची मनःपूर्वक जाणीव ठेवून नवी मुंबईतील, सानपाडा येथील थोरवे कुटुंबीय त्यांच्या परीने समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहे.
समाजातील उपेक्षित, गोरगरीब, निराधार व्यक्तींच्या कल्याणासाठी हे कुटुंब नेहमीच मदतीचा हात देत असते, त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणासाठी या कुटुंबाचा नेहमीच पुढाकार असल्याचे दिसून येते.
सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा त्यांनी दिवाळी निराधार कुटुंबीयांसमवेत साजरी केली. अंधेरी येथील निराश्रीत व कुष्ठरोगांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेत प्रा सौ वैशाली व सुधीर थोरवे तसेच प्रशांत काशीद व त्यांच्या कुटुंबीयांनी दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांच्या सानिध्यात गप्पागोष्टी करत त्यांच्या समवेत दिवाळीचा आनंद लुटला.
थोरवे कुटुंबीयांचे, मागील सहा महिन्यातील सामाजिक उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
1. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वनविभागात मित्रमंडळी समवेत 200 झाडांची लागवड.
मागील सहा वर्षे ते हा उपक्रम राबवत असून आतापर्यंत बाराशे झाडांची लागवड केली असून या झाडांच्या संगोपनाचे कार्यही ते करीत आहे.
2. पर्यावरण जनजागृती चे विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आहेत.
3. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा यशस्वीतेसाठी मार्गदर्शन.
4. डिकसाळ, कर्जत येथे 160 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. तसेच शाळेला फळ्यांचे वाटप
5. शिरोली, पुणे येथे गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य.
6. वय वर्ष 70 ते 80 वयाचे ज्येष्ठ नागरिक यांना आपल्या मित्र परिवारांमध्ये बोलावून सगळ्यांनी एक वेगळाच आनंद लुटला. या मेळाव्याला मुंबई, ठाणे, पुणे येथून 65 जण आले होते.
विशेष म्हणजे थोरवे कुटुंबीय कुठलाही गाजावाजा न करता आपले कार्य करत असते. त्यामुळे उगाचच, कुठेही सेल्फी घेऊन स्वतःला चमकवण्याच्या आजच्या जगात हे कुटुंबीय, त्यांचे कार्य अधिकच उठून दिसते.
असे हे सेवाभावी थोरवे कुटुंबीय आजच्या समाजासाठी नक्कीच एक आदर्श आहे.
त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
थोरवे कुटुंबियांप्रती
कर माझे जुळती
ही खरी देवमाणसे
खूपच छान उपक्रम..आणि कार्य
🌹अप्रतिम कार्य 🙏🙏🌹