नवी मुंबईतील, डॉ सचिन व डॉ जयश्री लोखंडे हे डॉक्टर दाम्पत्य त्यांच्या सेवाभावी वृत्ती व कार्यामुळे लोकप्रिय आहे.
डॉ सचिन हे निष्णात सर्जन असून स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत तर डॉ जयश्री या फिजियोथेरपीस्ट आहेत.
मूळचे नांदेड येथील, डॉ सचिन लोखंडे यांनी १९९७ ते २००१ दरम्यान मिरज येथील प्रख्यात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर पुण्यात (डी जीओ) पीजी केले. तर डीएनबी हा अभ्यासक्रम तामिळनाडूतील प्रख्यात ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केला. त्यानंतर केरळच्या एका हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतला. नंतर दिल्लीला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नोकरी केली.
मुंबईतील एका फार मोठ्या हॉस्पिटलने पूर्ण पात्रता असताना देखील केवळ वय कमी आहे, म्हणून त्यांना कन्सलटंट म्हणून न नेमता ज्युनिअर म्हणून रुजू होण्यास सांगितले. पण स्व:ताच्या गुणवत्तेवर, क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी स्वाभिमान दाखवून, आता आपणच उभे राहिले पाहिजे म्हणून स्वतंत्र प्रॅक्टिससाठी वयाच्या ३१ व्या वर्षी, २०१३ मध्ये ते नवी मुंबईत आले. स्वतःचे क्लिनिक असावें, याबाबत वडील, सासरे आणि फिजिओथेरपिस्ट पत्नी डॉ जयश्री यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही डॉ सचिन यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देऊन सर्व ते सहकार्य केले.
त्याचवेळी नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील आचरे मामांनी त्यांची जागा भाड्याने देण्याची तयारी दर्शविली. सुरवातीला ६० हजार इतके भाडे त्यांनी सांगितले. त्यावर दोन दिवस विचार केला. मग दवाखाना सुरु करण्याचा धोका पत्करला. डॉक्टरांच्या वडिलांचे नावच महावीर असल्यामुळे व ते जैन पंथीय असल्याने त्यांच्याच नावाने हॉस्पिटल सुरू करावे, असे पत्नीने सुचविले. माझ्या सर्व कामात तिचा संपूर्ण सहभाग असतो, असे डॉ. सचिन लोखंडे सांगतात.
मुल न होणार्या रुग्णांना सल्ला व योग्य उपचार, जनरल सर्जरी, बाळंतपणं, अशाप्रकारच्या सेवा या रुग्णालयात नाममात्र दरात दिल्या जातात. गर्भवती महिलेचे सिझरीन करण्यापेक्षा नैसर्गिकरित्या प्रसूती व्हावी, याला डॉक्टर अधिक प्राधान्य देतात. यासाठी रुग्ण महिलेचा व्यायाम करुन घेतला जातो, असे सांगून महावीर रुग्णालयात आतापर्यंत म्हणजे १० वर्षात हजारो महिलांची यशस्वीपणे प्रसूती झाल्याचे डॉ. सचिन लोखंडे यांनी सांगितले.
डॉ सचिन लोखंडे यांच्या पत्नी डॉ जयश्री या फिजियोथेरपिस्ट आहेत. पूर्वाश्रमीच्या जयश्री पाथरकर या नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील आहेत. तिथे त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी पुणे येथील डॉ संचेती हॉस्पिटल मधून
फिजियोथेरपी तील पदवी प्राप्त केली. तर कोइंबतूर येथील के जी कॉलेज ऑफ फिजियोथेरपी येथून मास्टर्स ची पदवी संपादन केली.
तसेच डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट केल. या अभ्यासक्रमात त्या पुणे विद्यापीठात दुसऱ्या आल्या.
पुणे येथीलच अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या
हॉस्पिटलमध्ये काही काळ काम केले. २००५ मध्ये त्यांचा विवाह डॉ सचिन यांच्याशी झाला.
पहिला मुलगा, सजग १४ महिन्यांचा असताना त्यांनी त्याला आईजवळ ठेवून चेन्नई येथून ६ महिने कालावधीचा म्यान्यूअल थेरपीचा कोर्स केला. हा त्यांच्यासाठी अतिशय कसोटीचा काळ होता. पण तरीही त्यांनी अतिशय जिद्दीने हा कोर्स पूर्ण केला.
२०१२ मध्ये त्यांनी शेअरिंग बेसिसवर नवी मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. पुढे २०१४ मध्ये पती डॉ सचिन यांच्या बरोबर त्यांनी महावीर हॉस्पिटल ची स्थापना केली. आता तिथेच त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे.
अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले हे दाम्पत्य काही ना काही निमित्ताने, विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून सर्व सामान्य व्यक्तींच्या विविध आरोग्य तपासण्या करीत असते.
त्यांना स्वस्त दरात उपचार मिळावे म्हणून प्रयत्न करीत असते. म्हणुनच स्वतःचे मोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढण्याबरोबरच गोर गरीब रुग्णांसाठी मोठे मल्टी स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल काढण्याचे स्वप्न हे सेवाभावी डॉक्टर पतीपत्नी बाळगून आहेत. त्यांच्या उदात्त स्वप्नपूर्तीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.