राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते नुकतेच मीराताई धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा हा प्रेरणादायी जीवन प्रवास.
मीराताई धोटे यांचे एनएसटी पोर्टल परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
– संपादक
‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल‘ पुरस्कार हा परिचारिकांसाठी सर्वोच्च मानाचा पुरस्कार आहे. तो मिळणे म्हणजे परिचारिका क्षेत्रात काम करण्याचे सार्थक झाले असेच समजले जाते.
हा पुरस्कार सहजा सहजी कोणालाही मिळत नाही. त्याची आपली नियमावली असते. मात्र देशातील नावाजलेली ऑल इंडिया मेडीकल संस्था म्हणजेच एम्स येथील परिचारिका मीराताई धोटे यांच्या सेवेची दखल खुद्द तेथील व्यवस्थापनाने घेऊन त्यांचे नाव या मानाच्या पुरस्कारासाठी पाठविले आणि ते मंजुरही झाले. मीराताई धोटे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मीराताई धोटे या मुळच्या नागपूरातील. नव्वद च्या दशकात त्यांनी परिचारिकेचा अभ्यासक्रम नागपूरातून पूर्ण केला. त्यानंतर त्या नोकरी निमित्त नवी दिल्ली येथील प्रख्यात एम्स मध्ये रूजु झाल्यात. त्या काळात लग्ना पूर्वी एकटी मुलगी आपले घर सोडून जाणे, इतक्या दुर थोडे जाणे म्हणजे मोठे धाडसाचे होते. तरी त्या दिल्लीत आल्यात.
एम्स येथील विविध वार्ड मध्ये त्यांनी त्यांची सेवा दिली. मुलत: मृदु स्वभावाच्या असलेल्या मीराताई यांचा जन्म परिचारिका क्षेत्रासाठीच आहेत असे त्यांना बघितल्यावर जाणवते. त्यांनी 30 वर्षांची सेवा एम्स या शासकिय रूग्णालयाला दिलेली आहे. या 30 वर्षांच्या कालावधीत त्यांनी व्यक्तीगत तसेच नोकरीच्या ठिकाणी अनेक धक्के खाल्लेत. मात्र त्या खचल्या नाहीत.
नोकरी सोबत त्यांनी परिचारिका क्षेत्राशी निगडीत विशेष शिक्षणही घेतले आहे. कोविड महामारीच्या काळात जेव्हा संपुर्ण देश बंद होता तेव्हा रूग्णालयात अधिक काम असायचे यावेळी त्यांची भुमिका महत्वपूर्ण ठरली. या काळात त्या जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. हे पद नर्सिंग क्षेत्रातील मानाचे पद समजले जाते. राजधानी दिल्लीत एक मराठी महिला हे पद सांभाळीत होती हे विशेष. कोविड काळात एम्समध्ये सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका ठरली. यासोबतच संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत या केंद्र सरकारच्या आरोग्याशी निगडीत उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असायचा. हे उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना यापुर्वीही सन्मानित करण्यात आले.

मीराताई नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत.काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचे आणि सेवानिवृत्त्त झाल्यावर काम केल्याचे समाधान आहे.
मीराताईना मिळालेला हा पुरस्कार व्यक्तिशः त्यांच्या साठी गौरवाचा आहेच, पण तो महाराष्ट्राची शान वाढविणाराही आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : अंजु निमसरकर. माहिती अधिकारी,
महाराष्ट्र परिचय केंद्र. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800