हा विषय वाचताच डोळ्यापुढे माझी लेह-लडाखची सहल उभी राहिली. कारगिलचं युध्द आठवलं. तिथे जाऊन कारगिलच्या युध्दात आपण कशी बाजी मारली हे तिथल्या सैनिकांकडून ऐकतांना अभिमान तर वाटलाच, कौतुकही वाटलं आणि डोळ्यात अश्रूही दाटून आले.
हुतात्मा झालेल्या जवानांसाठी तेथे बांधलेल्या स्मृतिस्थळाला भेट देतांना आम्ही पादत्राणे काढतांच जवान म्हणाले, अहो थंडी वाजेल. किती ही काळजी ! पण आम्ही म्हटले, असू दे. हे आमचे मंदिर आहे. तिथे सर्वांनी मनापासून प्रणाम केलाच आणि संपूर्ण वंदेमातरम् पण म्हटलं.

तिथल्या प्रत्येक जवानाला साश्रू नयनांनी वंदन केलं. त्यांना खाऊ द्यायची इच्छा होती पण नियमात बसणार नाही हे आम्हाला आधीच सांगितलं होतं म्हणून आम्ही हिंदी गाण्यांच्या काही सीडी त्यांना भेट म्हणून दिल्या. आणि साश्रू नयनांनी निरोप घेतला.
अमृतसरच्या भारत पाकिस्तानच्या सीमारेषेवरील दृश्यही डोळ्यापुढे उभं राहिलं. राष्ट्रध्वजाला सूर्यास्तानंतर सलामी देऊन ध्वजावतरण करतात तो प्रसंग. दोन्ही देशांचे सैनिक एकाचवेळी ध्वजावतरण करतात तेव्हां एक क्षण असा येतो की दोन्ही देशांचे ध्वज एकमेकांना क्षणभर भेटतात. असं वाटतं की त्यांच्या मनातलं ते एकमेकांना सांगत असावेत. ध्वजावतरणानंतर थोडावेळ आम्ही तिथेच रेंगाळलो. सीमारेषेला हात लावला, जवानांशी बोललो.

त्यांच्याशी बोलतांना लक्षात आलं की त्यांनाही नागरिकांशी बोलायला हवं असतं. कदाचित् त्यांना त्यांत घरच्या माणसांशी बोलत आहोत असंही वाटत असेल. आत्मियतेने, आपलेपणाने आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या खूप आनंद झाला.
राजस्थानातील तन्नोट बाॅर्डरवरील एक प्रसंग. तेथे पाकिस्तानचा गर्व उतरवून जिंकलेल्या युध्दाची आठवण देणारा पॅटन टॅक उभा आहे. तेथील जवानांना मी पॅटन टॅकवर चढून बसायला सांगत होते. मला त्यांचा फोटो हवा होता. पण आपले सैनिक तयार होईनात. मलाच आग्रह करायला लागले. तेव्हां हंसून म्हणाले मी, काय जोक करताय कां, आम्ही शोभणार आहोत का ? तुमची वीरश्री जागृत झालेली पाहायची आहे आम्हाला. शेवटी नाही हो करता करता स्वा-या तयार झाल्या आणि मला फोटो मिळाला. इतक्यात माझी छोटी भाची गाऊ लागली ‘संदेसे आते है….’ तर तिला जवळ घेऊन एक जवान म्हणाला, ‘बेटी यहां किसीका संदेसा नही आता’. ते ऐकून आम्ही भावनावश झालो.

आता मनालीची एक गंमत. आम्ही बागेत हिंडत होतो. हिरवळीवरून चालण्याचा आनंद लुटत होतो. अचानक एक सरदारजी आमच्या दिशेने धावत येताना दिसला. आम्हाला वाटलं की आपण रस्ता सोडून हिरवळीवर चालतोय म्हणून ओरडायला आला असावा.-इतक्यात तो आला आणि विचारु लागला, तुम्ही कुठून आलात ? आम्ही म्हटलं मुंबईहून. म्हणजे पुण्याच्या जवळच ना. म्हटलं हो ! लगेच आम्हाला नमस्ते म्हणाला, मी पुण्याला मराठा इंन्फ्रंटीमध्ये होतो. तुमचं मराठी बोलणं ऐकलं नि मला राहवलं नाही. त्याच्याशी बराच वेळ बोलून त्याच्या फॅमिलीची चौकशी करुन आम्ही निरोप घेतला.
आता पूर्वांचलच्या तेजपूरची आठवण ! एका हाॅटेलमध्ये आम्ही चहासाठी बसलो होतो. आमचे जोरजोरात बोलणे चालू होते. अचानक एक जवान आला आणि म्हणाला, तुम्ही महाराष्ट्रीयन ना ? म्हटलं, हो. मी पटकन् वेटरला सांगितलं लगेच यांच्यासाठी चहा आण. त्यावर तो म्हणू लागला, मी पाणी न्यायला आलोय, कर्नलसाहेब वाट पाहात असतील. आम्ही म्हटलं, ठीक आहे पण चहा पिऊनच जा. इतक्यात चहा आणि कर्नलचा फोन एकदमच आले. घटाघटा चहा पिऊन तो निघाला. बाहेर पडत असतांनाच दुसरा जवान आला. त्याला त्याने आम्हाला भेटायला सांगितले. तो नुकताच रजेवरून परत आला होता. आमच्याशी छान गप्पा मारल्या. त्याच्या घरच्यांची आम्ही चौकशी केली. इथली परिस्थिती, सुरक्षितता याबद्दलही बोलणं झालं. आता सर्व चांगलं आहे. काळजी करू नका. त्यानंतर आम्ही काय काय पाहिलं काय पाहा तेही सांगितलं आणि खुशीत आमचा निरोप घेतला.
माझ्या एका वर्गमित्राचा अनुभव. तो श्रीनगरला गाडीची वाट पाहात बेंचवर बसला होता. तेवढ्यात एक जवान तिथे आला. त्याच्याशी गप्पा मारतांना मित्राने सद्य परिस्थितीविषयी विचारले. आणि तो जवान खुशीत येऊन म्हणाला, छान चाललयं. एक अद्भूत आजपर्यंत कधीच न अनुभवलेली विलक्षण गोष्ट अनुभवली. ती म्हणजे आपल्या पंतप्रधानांबरोबर जेवण आणि मनमोकळ्या गप्पा ! कधीही न विसरता येणारा विलक्षण अनुभव! सारे जवान खूष आहेत.
हे सारे जवान देशासाठी लढतात. देशबांधवांना सुरक्षित, सुखायुष्य देतात. त्यांना त्यांच्या पराक्रमासाठी बक्षिसे, पुरस्कारही मिळतात. पण एक नागरिक म्हणून त्यांची आत्मियतेने चौकशी करणे, हुतात्म्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे.
आमच्या सुसज्ज, वीर जवानांना मनापासून धन्यवाद आणि सलाम !

– लेखन : स्वाती दामले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप सुंदर लिहिलं आहे.
सैनिक पण एक माणूसच आहे, तो शिस्तबद्ध असतो. आपले माणसं, गाव सोडून देशासाठी तो सीमेवर तैनात असतो. तो प्रेमाच्या दोन शब्दाला भुकेला असतो.
खूप सुंदर वर्णन केलं आपण. 🌹
धन्यवाद.
एक माजी नौसैनिक
जय हिंद स्वाती मॅडम
क्षणभर वाटलं की, आम्ही तमाम बदलापूरकर सीमा रेषेवरील जवानांशी सुसंवाद साधत आहोत. इतक्या सहजपणे तुम्ही लिहिले आहे. तुमची लेह लददाख स्मृती स्थळ भेट खूप काही सांगून जाते. वाघा बाॅर्डर, राजस्थान बाॅर्डर च्या जवानांची विचारपूस, चहा पाजणे इ.तुमचा जवानां बद्दलचा आदरभाव हेच सांगतो की, तुम्ही सच्च्या मनाच्या देशप्रेमी आहात.
जय हिंद.
खूपच छान लिहिलं आहे स्वातीताई…
असं वाटलं की आम्ही प्रत्यक्ष तुमच्याबरोबरच तिथे आहोत !!
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007