काव्यप्रकार – अष्टाक्षरी
जीवनाच्या सांजवेळी
ढीग पत्रांचा समोर
वाचताना एक एक
मन झालेले विभोर
काही आलेल्या पत्रात
जपलेले होते क्षण
काही पत्रात होते या
अनाथाचे बालपण
मिळालेले यश होते
लिहिलेले मी पत्रात
देवाघरी आई़च्याही
प्रेम दिसेल नेत्रात
अशी गेली सखी माझी
अर्ध्यावर डाव मोडी
दोन मुलांसाठी मग
केली पत्रांची गाठोडी
काही आलेली पत्रे ती
काही न पाठवलेली
मुलांसाठी देवानेच
जणू काही लिहिलेली
पत्रानीच सावरले
बालपण सुकलेले
पत्र लेखनाने माझे
क्षण दुःखी वेचलेले
काठी सवे पत्रांनीच
आधाराचा खांदा दिला
वाट एकट्याची होती
सोबतीचा हात दिला

– रचना : डॉ निलांबरी गानू