गर्भावस्था आणि कोव्हीड लसीकरण
गर्भावस्था म्हटले की, घरात सर्वांचा आनंदाचा विषय ! होणाऱ्या आईची सर्वजण खूप काळजी घेतात. नवरा असो, आई बाबा किंवा सासू सासरे- सर्वजण होणाऱ्या आईच्या सुख सुविधांकडे लक्ष पुरवतात. तिला काही कमी पडू नये म्हणून सतत धडपड सुरू असते. होणारे बाळ सुदृढ निरोगी, आरोग्य संपन्न व्हावं, आई सुखरूप असावी हाच हेतू असतो.
या कोरोना महामारीच्या काळात मात्र ताण वाढतच चालला आहे. आपण सर्वच जण एका मोठ्या जागतिक संकटाचा सामना करत आहोत. आर्थिक, शारिरीक, मानसिक, सामाजिक अशा सर्व प्रकारे हानी आपण अनुभवली आणि ह्याचे मूळ कारण म्हणजे आरोग्य राखणे हे आपले पहिले प्राधान्य होते. या भीषण काळात गर्भवती होणे म्हणजे सतत मनात एक भीती असते. आपल्याला किंवा आपल्या बाळाला या कोरोना मुळे काही हानी तर होणार नाही ना ? या विचाराने गर्भवती स्ञी आणि घरचे खूप अस्वस्थ होत असतात. या जीवघेण्या आजारापासून जीव वाचवता यावा हीच खटपट चालू आहे. आणि गर्भधारणा म्हटली की, 2 जिवांचा प्रश्न ! ह्यातून सुटका करण्याचा एकमेव मार्ग आहे- तो म्हणजे लसीकरण !
भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे आता भारतात करोना लस गरोदर स्त्रियांना दिली जाऊ शकते. जवळ जवळ अडीच कोटी महिलांना ह्याचा फायदा होणार आहे.पण गरोदर स्त्रीयांसाठी लस सुरू झाली ही बातमी ऐकल्यावर सर्वांच्या मनात प्रश्न आहेत, तर दुसरीकडे एका चुकीच्या बातमी मुळे गोंधळ सुद्धा झाला. तर आज या सर्व प्रश्नांचा उहापोह करणार आहे आणि लसीबद्द्दल निर्माण झाले गैरसमज सुद्धा दूर करणार आहे.
कोव्हीड आणि गर्भावस्था
उपलब्ध आकडेवारीनुसार कोव्हिडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये गर्भवती महिलांना जास्त त्रास आढळून आलेला आहे. व्हेंटिलेटर सपोर्ट, कृत्रिम श्वासाची गरज ह्याची संख्या वाढलेली आहे.
गर्भधारणे मुळे कोव्हीड होण्याची शक्यता वाढत नाही पण गर्भवती महिलांना कोव्हीड झाल्यास आजाराची तीव्रता मात्र वाढू शकते. 90% बायकांची लक्षणे सौम्य असतात. पण गर्भधारणे दरम्यान कोविड-19 संसर्गामुळे गर्भवती महिलांचे आरोग्य झपाट्याने बिघडू शकते आणि त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका असतो आणि यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो. गर्भधारणे मध्ये कोविडमुळे मुदतपूर्व प्रसुती (preterm delivery) ची शक्यता वाढते.
गरोदर महिलांचे लसीकरण
कोव्हिड लसीचे दीर्घकालीन परिणाम अजून आपल्याला माहित नाहीत. पण सध्या कोरोना झाल्यावर मृत्युमुखी न पडण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय आहे-कोव्हिड व्हॕक्सीन ! यासाठी पुढील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
* गर्भावस्थेच्या कुठल्याही महिन्यात महिला लस घेऊ शकतात.
* गर्भावती महिलांना मधुमेह, रक्तदाब, थ्रोम्बोसिस किवा इतर काही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर लस घ्यावी.
* महिला धनुर्वाताची लस आणि कोव्हीड लस एकाच दिवशी घेऊ शकते.
* कुठल्याही कारणाने रक्त चढवले असेल किंवा दुसरे इंजेक्शन घेतले असेल तरी कोव्हीड वॕक्सीन घेता येऊ शकते
* भारतात उपलब्ध असलेल्या कोणत्याही लसी गर्भावस्थेत घेऊ शकतात- Covisheild, Covaxin आणि Sputnik V. यापैकी कोणतीही !
लस कोणी न घ्यावी ?
* गर्भवती महिला ज्यांना पहिल्या डोस नंतर अॕलर्जी आढळली असेल तर घेऊ नये.
* कोविड संक्रमण झाल्यास- 2 ते 3 महिन्या नंतर लस घ्यावी
यासाठी कोविन (CoWIN) पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. गरोदर महिलांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन देखील थेट लस घेता येईल.
आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ही लस कोरोना होऊ नये यासाठी नसून केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराला कोरोना विषाणू विरुद्ध लढण्याकरता ताकद देण्यासाठी आहे. मास्क, सॕनिटायझर, वारंवार हात धुणे, एकंदरीत स्वच्छता राखणे ह्याला पर्याय नाही.
काय लक्षात ठेवाल ?
गर्भवतींनी लसीकरण करून घेणं हे त्यांच्या गर्भातल्या बाळांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
एकंदरीत या कोव्हिड संदर्भात अनेक उलट सुलट चर्चा झाल्या आहेत. तसेच प्रशिक्षित, अप्रशिक्षित, जाणकार, तज्ञ किंवा जाणकार नसलेले सर्वांनी आपली माहिती सोशल मिडियाच्या सोप्या माध्यमातून पोहोचवली म्हणून निर्णय घेणे कठीण होऊन बसते. म्हणूनच गर्भवती महिलांनी प्रसूतीतज्ञ आणि स्ञीरोग तज्ञाशी संपर्क साधून त्यांच्याच शास्ञीय गोष्टीवरून निर्णय घेऊन उपचार करावेत ज्यामुळे याही काळात आपल्या बाळाचे आगमन आपल्याला तेवढेच सौहार्दपूर्वक आणि आनंददायी करता येईल हे नक्कीच !

– लेखन : डाॕ.प्रशंसा राऊत- दळवी, गायनाॕकाॕलीस्ट, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.