गेली तीन दशके तानसा खोऱ्या मध्ये आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रसाद चिकित्सा, गणेशपुरी या धर्मादाय संस्थेच्या वतीने आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवले जातात.
जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने संस्थेतर्फे परिसरातील २० अंगणवाड्यांमध्ये गर्भवती महिलांना व प्रसूती झालेल्या मातांना स्तनपानाबद्दल माहिती देण्यात आली. मातांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देणे, स्तनपान हे बाळासाठी कसे फायदेशीर आहे, तसेच बाळाला आईचे दूध दिल्याने आईला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात हे सांगण्यात आले.
प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तनामधून येणारा चिक बाळासाठी अमूल्य असतो. या चिकामध्ये अ आणि क हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असतात. त्यांमध्ये प्रतिबंधक द्रव्य व इतर आवश्यक घटक असल्यामुळे जन्तुसंसर्गापासून बाळाचे रक्षण होते. यामध्ये प्रथिने व कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळाच्या वाढीला फायदा होतो.
आईचे दूध हे एंटीबॉडी आणि एंजाइम आवश्यक पोषण प्रदान करते, जे मुलाच्या वाढीस मदत करते. ज्यामुळे त्याचा बुद्ध्यांकही वाढतो याविषयी समुपदेशन करण्यात आले. स्तनपानामुळे नवजात बाळाला उत्तम पोषण मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक व शारीरिक विकासास मदत होते.
स्तनपान सप्ताहाच्या माध्यमातून समाजात स्तनपानाचे महत्व आणि मातांच्या स्वास्थ्यासाठी त्याचे फायदे याबद्दल जागरूकता वाढवणे हा मुख्य उद्देश असतो. यामुळे पुढील पिढी निरोगी होऊन कुपोषण नियंत्रित होऊ शकते, असे मत संस्थेच्या वैद्यकीय संचालक डॉ. अबोली देशमुख यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800