गर्भधारणेचा स्ट्रेस !
एक २१ वर्षीय तरुणी त्या दिवशी क्लिनीक मध्ये आली. सोबत सासुबाई, जराशी डॅामीनेटींग दिसत होती. भयंकर टेंशन मध्ये दोघीही. प्रेग्नंसी राहत नाही. मी विचारले लग्नाला किती वर्षे झाली ? उत्तर आले ३ महिने होऊन गेले हो !!! २१ वर्षीय बायको, २२ वर्षीय नवरा ! ३ महिन्यात कसलं ऐवढं टेंशन ? खूपच संवेदनशील असा हा विषय आहे- वंध्यत्व ! पण नेमकं वंध्यत्व म्हणजे काय ?
जोडप्याने १ वर्ष गर्भ निरोधकाशिवाय गर्भ धारणा करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही गर्भ न राहणे. हो १ वर्ष. तेव्हा त्याला म्हणतात वंध्यत्व. आजकालच्या काळात जेथे लग्न तिशी नंतर होणे नॅार्मल झाले आहे, अशा जोडप्यांनी ६ महिन्यांच्या प्रयत्नांनंतर वैद्यकीय सल्ला घेण्यातच शहाणपणा आहे. स्पेशल केसेस जिथे काही मेडिकल कारणास्तव लवकर प्रेग्नंसी ठेवण्याचा सल्ला दिला आहे, त्यांनी नक्की ट्रीटमेंट करावी.
अजुन एक किस्सा सांगते. एक सुशिक्षित जोडपे माझ्याकडे आले. त्रस्त होते, लग्नाला ४ वर्ष झाली पण अजुन मुल नाही. काहीही करा पण आता प्रेग्नंसी हवी ! कळतय मला, खूप कठीण असतं. त्यांना मी धीर दिला. प्रेग्नंसी राहणार, त्यांना मी समजावले आणि काही टेस्ट लिहुन दिल्या. ह्या ४-५ तपासण्या बायको साठी आणि नवऱ्या साठीही होत्या.
नवरा एकदम अचंबित- काय, माझी कसली तपासणी ? मी परत आपलं समजवायला सुरु केले. अगदी बेसिक टेस्ट आहेत. जसे आपण बायकोला काही विकार नाहीत नं हे चेक करतो, तसेच नवऱ्याची सुद्धा तपासणी करावी लागतेच. नवऱ्याचे उत्तर आले “मला काही त्रास नाही, ही प्रेग्नंट रहात नाही हिची टेस्ट करा”. कितीही सरळ भाषेत समजावले तरीही नवरा काही टेस्ट करायला तयार नाही.
दर वेळी बायको मध्येच प्रॅाब्लेम आहे हे मानून आपण का चालतो ? तुम्हाला ऐकुन आश्चर्य वाटेल की, वंध्यत्वामध्ये ४०% प्रमाण पुरुष वंध्यत्वाचे आहे.
वंध्यत्वाचा पूर्ण दोष एका बाईनेच का घ्यावा ? कित्येक वेळा अगदी लहान-सहान प्रॅाब्लेम सुधारला की, प्रेग्नंसी राहते.
पण आजच्या काळात वंध्यत्व ही वाढती समस्या आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात. कारणे शोधण्याचे काम डॅाक्टर करतच असतात. इथे आपण आज जरा उपायावर वर प्रकाश टाकू या.
वंध्यत्व एक खूपच क्लेशकारक समस्या आहे. पूर्ण घराचे वातावरण बिघडवून टाकायची क्षमता यात आहे. मुळात एक गोष्ट या जगाने समजायला हवी, स्ञी प्रेग्नंट राहावी यातच आपल्याला मतलब आहे, इथे दोष काढण्यात आणि आरोप करण्यात काही अर्थ नाही. त्याने फक्त तणाव निर्माण होत असतात.
तुम्ही डाॕक्टरकडे गेल्यास ते तुम्हाला काही टेस्ट लिहून देतात. या चाचण्या करायलाच हव्यात. यात अजिबात संकोच करण्यात अर्थ नाही.
इकडे मी तुम्हाला अगदी थोडक्यात वंध्यत्वा साठी काय ट्रीटमेंट उपलब्ध आहेत त्या बद्दल सांगणार आहे.
साधारणत: यातील पहिला टप्पा पार केल्या शिवाय दुसऱ्या टप्प्यावर जाण्याची सहसा गरज पडत नाही.
1. मुळ चाचण्या : बाईच्या चाचणी मध्ये अंडाशयांची चाचणी, सोनोग्राफी, हॅार्मोन्स,थायरॅाईड ई. चेक करणे महत्वाचे. पुरुषाच्या विर्याची चाचणीही आवश्यक .
2. Ovulation Induction/ओव्हुलेशन इंडक्शन : पुरुषाचे शुक्राणू चांगले असल्यास, बायकोला उत्तम प्रकाराचे अंड बनवण्यासाठी गोळ्या/इंजेक्शन दिले जाते. ह्या मध्ये फॉलिक्युलर स्टडी म्हणजे पाळी नंतर जवळ जवळ एक दिवसा आड सोनोग्रॅफी केली जाते. व योग्य वेळेस जोडप्याला संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
3. IUI : आययूआय: मध्ये पतीच्या विर्याला घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते व त्यातील उच्च दर्जाचे, वेगवान शुक्राणू गर्भपिशवीत सोडले जातात. त्या आधी स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गोळ्या / इंजेक्शन दिले जाते. या प्रकारे अंडाशयात चांगल्या प्रतीची अंडी बनण्याची आपल्याला खात्री मिळते.
4. IVF / आयव्हीएफ : म्हणजे जसे शरीरात स्त्री बीज व पुरुषाचे शुक्राणू एकजीव होऊन गर्भ राहतो तसेच, फक्त ही प्रक्रिया शरीराबाहेर एका प्रयोग शाळेत केली जाते आणि गर्भ तयार होताच स्त्री च्या गर्भपिशवीत ठेवण्यात येतो. म्हणजे स्वत:चे अंड व शुक्राणू पण मेहनत बाहेरुन केली जाईल. किती सुंदर संशोधन आहे नं हे !!
5. डोनर : जर स्त्रीचा अंडाशयाचा साठा पर्याप्त नसेल तर गर्भधारणेची शक्यता कमी होते. अशा वेळेस ही निराश होण्या सारखे काही नाही. स्त्री तरीही स्वत: गर्भधारण करु शकते पण डोनर अंड घेऊनच ! तसेच जर पुरुषांच्या विर्यात शून्य शुक्राणू आढळले तर डोनर शुक्राणू वापरु शकतो. आणि आयव्हीएफ केले जाते. डोनर ची माहिती गुपीत असते. त्या मुळे कधीही पुढे समस्या निर्माण होत नाही.
6. Surrogacy / सरोगॅसी : बायकोला काही कारणास्तव गर्भ धारणा शक्य नसल्यास, बायकोचे अंड व पतीच्या शुक्राणूचा गर्भ तयार करुन तो सरोगेट (दुसऱ्या बाई) च्या गर्भात वाढवला जातो. हे नीट कायदेशीर केले जाते व ह्या बद्दल आधीच पूर्ण माहिती पुरवली जाते.
यातील कोणत्याही ट्रीटमेंट मध्ये घाबरण्यासारखे किंवा दडपण घेण्यासारखे काही नाही.
मी हे अगदी सोप्या पद्धतीने इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, यावर खोल माहिती फर्टीलिटी तज्ज्ञ ट्रीटमेंट आधी पुरवतात.
जोडप्यांनी एकमेकांना सांभाळून एकत्र ट्रीटमेंट बद्दल निर्णय घ्यावा. वंध्यत्वावर अभ्यास आणि पूर्ण माहिती गोळा करावी हे महत्वाचे. फर्टीलिटी ट्रीटमेंट साठी फर्टीलिटी तज्ज्ञ निवडावे आणि सर्व शंकांचे निवारण करुन मग योग्य तो निर्णय घ्यावा.
वंध्यत्वावरचे उपाय समजले किंवा शक्यता पडताळून पाहिल्या आणि त्यात सकारात्मकता आढळली की, त्यावर सहज मात करता येते ! आणि प्रत्येक स्ञीला असणारा मातृत्वाचा जन्मजात अधिकार आणि आनंद या दोन्ही गोष्टी सहजपणे अनुभवता येतील यात शंका नाही !!

– लेखन : डाॕ. प्रशंसा राऊत- दळवी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800