Wednesday, February 5, 2025
Homeलेखस्त्री पुरुष समानता कधी ?

स्त्री पुरुष समानता कधी ?

स्त्री ही मुळातच कणखर असल्याने सर्वस्व पणाला लावून अतोनात कष्ट करून यशस्वी वाटचाल करते.

हा प्रवास म्हणजे एक मुलगी असताना अभ्यास, करिअर हे सर्व शक्य व सोपे असते कारण पालकांची पुरेपूर साथ असते व घरच्या जबाबदाऱ्या फारश्या नसतात.

मात्र जेव्हा त्याच मुलीचे लग्न होते तेव्हा तिच्या
करिअरचे महत्व कमी होते. प्रथम प्राधान्य हे कुटुंबाला द्यावे लागते. सर्वांच्या संमतीने निर्णय घ्यावे लागतात. तुझा संसार हेच आता तुझे विश्व आहे ते सांभाळून जमत असेल तरच करिअर करावे अथवा घरात बसावे असे अनेकांचे स्पष्ट मत असते.

आजही अनेक घरात सासू, सासरे व पती स्त्रीला कोणतीही मदत करत नाही. महिलांना कसले आले आहे करिअर असे सर्रास टोमणेही मारले जातात. त्यामुळे अनेक महिलांना इच्छा असूनही माघार घ्यावी लागते.

काही महिला मात्र यातून सुवर्ण मध्य काढतात. मुलं थोडी मोठी झाल्यावर करिअरची नव्याने सुरवात करतात. काही महिला वेळेचे उत्तम नियोजन करून स्वतःचे कलागुण जपतात, नोकरी अथवा स्वतःचा व्यवसाय ही करतात. ही तारेवरची कसरत असते. त्यासाठी तिला अनेक गोष्टींचा त्याग ही करावा लागतो. दिवसभर काम व कौटूंबिक जबाबदारी यामुळे तिला दमायलाही ही वेळ नसतो. न थांबता, न थकता फक्त पुढे जायचे असते. आपले ध्येय साधायचे असते .

अशी स्त्री न बोलता करून दाखविण्यावर जास्त विश्वास ठेवते व त्यावर तिचा भर देखील असतो.

आधुनिक स्त्री आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आणि तिने हे वेळोवेळी सिद्ध ही केले आहे व करत आहे. ज्या प्रामाणिक हेतूने सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचा वसा घेतला होता त्यांच्या कष्टाला व त्यांच्या आधुनिक विचारसरणीला न्याय मिळत आहे.

अर्थात हे वाटते तितके सोपे अजिबात नाही. कारण फार कमी जागी हे दिसून येते की पती आपल्या पत्नीला सहकार्य करतात, तिला प्रोत्साहन देतात तिच्या कामाचे कौतुक करतात. नशीबवान असतात त्या महिला ज्यांना कुटुंबाचे व पतीचे सहकार्य लाभते. मात्र…….कटू सत्य हे आहे की हा आकडा फारच कमी आहे.

अनेक पुरुषांना पत्नीची प्रगती सहन होत नाही. त्यांचा इगो दुखावला जातो. स्त्री आपल्या पुढे गेलेली अथवा तिची प्रसिद्धी, प्रगती त्यांना खटकते. कारण हे मान्य करायला मनाचा मोठेपणा असायला लागतो जो फारसा दिसत नाही आणि त्यामुळे आज ही ह्या आधुनिक काळात देखील अनेक महिला पुरुषी अहंकाराला बळी पडतात. तिचे मानसिक खच्चीकरण होते व मनावर अनेक न दिसणारे आघात होतात.

ती हे सर्व सहन करते कारण झाकली मूठ सव्वा लाखाची ! आपल्या कुटुंबाचे समाजात नाव जाऊ नये म्हणून. फक्त आधुनिक राहणीमान असून चालणार नाही तर विचारांमध्ये आधुनिकता असली पाहिजे तरच महिलांच्या कला गुणांना वाव मिळेल न्याय मिळेल.

फक्त स्त्री पुरुष समानतेचे नारे लावून चालणार नाही. त्याची सुरवात घरापासून झाली पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल.

आज अशाही अनेक स्त्रिया आहेत ज्यांना समाजात मानाचे स्थान आहे, जे तिने स्वकर्तुत्वाने मिळवले आहे व स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

मात्र…..स्वतःच्या घरातील चित्र काही वेगळेच आहे. घरात तिच्या कामाची, प्रगतीची चेष्टा केली जाते. तिला कमी लेखले जाते व अपमानित ही केले जाते ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे.

तिला साथ नाही दिली तरी चालेल, मात्र तिचे खच्चीकरण होता कामा नये. त्यामुळे अनेक महिला आत्मविश्वास गमावून बसतात व तिची प्रगती खुंटते.

स्त्री ही समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे व तिचे मोलाचे स्थान आहे, तिचा आदर झाला पाहिजे तरच समाजाची व देशाची प्रगती होऊ शकते. महिलांना सशक्तीकरण व सक्षमीकरण हे प्रत्येक कुटुंबाचे व समाजाचे कर्तव्य आहे.

स्त्री करत असलेल्या कामाला किंमत दिली व जोडीला थोडी हिंमत दिला तर तिची प्रगती निश्चित आहे. जर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असू शकतो तर स्त्रीच्या प्रगतीमागे पुरुषाचा हाथ का असू नये ? जर प्रत्येक महिलेला आपल्या जोडीदाराच्या यशाचा अभिमान वाटतो, आनंद वाटतो, तीच अपेक्षा तिने केली तर तिचे काय चुकले ?

तुम्हाला काय वाटते ?

रश्मी हेडे

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी