मी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करत असताना एक वयस्कर तृतीयपंथी मला बऱ्याचदा भेटत असे. चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य घेऊन. पैसे दिले अथवा नाही दिले तरी डोक्यावर हात ठेऊन भरभरून आशीर्वाद देत त्या निघून जात असत.
एका संध्याकाळी मी स्टेशन वरून उतरताना त्या मला दिसल्या. त्यांचं ते जादुई स्मित हास्य नेहेमीच एक ओली झुळूक घेऊन येत असे. माझ्याकडे छत्री नव्हती आणि पाऊस इतका धो धो होता की मला रिक्षापर्यंत जाण्यासाठी पूर्ण भिजावे लागणार होते. मी थोडं थांबले पण पाऊस तर आभाळ रिकामं होत पर्यंत बरसत राहणारच होता.
मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवल्याचं मला जाणवलं. मी वळून बघितलं तर, ती प्रसन्न मुद्रा स्वतःची छत्री उघडून माझा हात धरून मला रिक्षापर्यंत घेऊन पण गेली, आणि मला कळलं देखील नाही. साठच्या जवळपास वय असावं त्यांचं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच दैवी पावित्र्य होतं. मी त्यांच्याकडे बघतच होते तेवढ्यात त्या म्हणाल्या, “अरे रिक्षा मे बैठो बिटीया” बिटीया शब्द कानावर पडला आणि मी भानावर आले. मी रिक्षात बसले. मला, आत मधल्या बाजूस बसण्याची खूण करत डोक्यावर हात ठेवून त्या स्टेशनकडे वळल्या. पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी त्यांच्या केसातला मोग्ऱ्याचा गजरा आणखीच चमकत होता. तो मायेचा सुगंध माझ्या मनात दरवळत राहिला.
स्त्री मन जपणाऱ्या आणि जाणणाऱ्या अश्या अनेक तृतीयपंथी या समाजात आहेत. अनेक तृतीय पंथिना आश्रय देऊन त्यांचं आई सारखं पालन पोषण करणाऱ्या सुंदराबाईची कहाणी निश्चितच अत्यंत प्रेरणादायी आहे. ती आपल्या आज पुढे मांडतेय.
अर्धनारी नटेश्वराची पुराणात अशी कथा आहे, की एकदा भगवान शंकर व पार्वती बसले असताना अनेक देव व ऋषी भृगू तेथे आले. त्यांनी शिवपार्वती, दोघांना प्रदक्षिणा घातली आणि वाकून नमस्कार केला. पण भृगू यांनी पार्वतीमातेकडे दुर्लक्ष केले. तिला नमस्कार पण केला नाही. कारण ते फक्त शंकराचे भक्त होते. देवी पार्वतीला ते आवडले नाही. पार्वतीने भृगू ऋषींना शाप दिला, की भृगूच्या शरीरामधील मांस-रक्त नाहीसे होईल ! लगेच तसे झाले व शरीर हाडावर फक्त कातडे घातल्यासारखे झाले. त्यांना नीट उभे राहता येईना, तेव्हा शंकरांना त्याची दया आली. शंकरांनी भृगूंना उभे राहण्यासाठी तिसरा पाय दिला. भृगू आनंदी झाले व ते आनंदाने नाचू लागले. पार्वतीला ते आवडले नाही. तेव्हा पार्वतीने तपश्चर्या करून शंकराकडून वर प्राप्त केले, की शिवपार्वती कधीही वेगवेगळे होणार नाहीत. त्यामुळे शंकरांनी अर्धनारी नटेश्वर असे स्वरूप धारण केले.
ही पुराण कथा प्रचलित आहे.आणि महादेवांनी अर्ध नारी नटेश्र्वर अवतार घेऊन एकाच शरीरात स्त्री आणि पुरुष दोन्ही मन, भावना रुपात असू शकतात असा संकेत दिला असून हे स्वरूप निश्चितच निंदेची बाब असू शकत नाही.
असेच काहीसे विचार घेऊन सुंदराबाई यांनी आपल्या पुरुषी शरीरातील स्त्री मन ओळखलं आणि जपलं. स्त्रीच्या हळव्या मनाचा कोपरा तृतीयपंथी सुंदरबाई यांनी स्वतः च्या शरीरात जाणवला आणि आपल्या या रूपाचा तिरस्कार न करता त्यांनी स्वतःचा, नैसर्गिक आणि परमेश्वराचा आशीर्वाद म्हणून स्वीकार केला.
सुंदराबाईचा जन्म छत्तीसगढच्या एका छोट्याश्या गावात झाला. त्यांचा जन्म नटेश्र्वराच्या कृपेने झाला अशी त्यांच्या कुटुंबीयांची श्रद्धा असल्यामुळे त्यांचं नाव नटेश्र्वर ठेवण्यात आले. त्यांना तीन भाऊ व एक बहिण आहे. त्यांच्या जन्मानंतर आई वडिलांना ते इतर मुलासारखे नाहीत, हे स्वीकारता आलं नाही. लहान असताना आई त्यांची खूप काळजी घेत असे, आणि यांना फार जपून राहण्यास सांगत असे.
पण वडील खूप राग करत. वडिलांचा द्वेष सहन करत ते मोठे होऊ लागले. तेरा वर्षांचे असताना एकदा इतर मुलांसोबत खेळत असताना त्यांना ती मुलं चिडवत होती. ते मुलीचे कपडे घालून मुलींमध्ये खेळत असतान त्यांच्या वडिलांनी बघितलं आणि त्यांच्या कुटुंबाची अब्रू मातीमोल होत आहे असा विचार करून रागात त्यांना खूप मारहाण केली. सुंदराबाईच्या तोंडातून रक्त येत होतं तरी त्यांचे वडील त्यांना चपलेने मारतच गेले. वडिलांच्या डोळ्यातली आग त्यांचं नाजूक मन पोळत होती. त्यावेळी सुंदराबाई यांना आपला आत्मा आणि शरीर यात मोठा फरक आहे याची जाणीव झाली. आणि एका रात्री सगळे झोपले असताना खिन्न मनाने ते घर सोडून निघून गेले.
दोन दिवस सतत चालून ते एका गावी पोहोचले आणि भूक तहान यामुळे चक्कर येऊन पडले. त्यांनी डोळे उघडले तेंव्हा ते एका अश्या समूहात होते जिथे सगळे त्यांच्या सारखे होते याची त्यांना जाणीव झाली आणि ते सुखावले. ज्यांना ते आपली माणसं, आपलं कुटुंब समजत होते त्यांनी बद्रुबाईची खूप अवहेलना केली होती. पण या समूहात त्यांना आपुलकीची ऊब मिळाली. त्यांचे रीतिरिवाज शिकून ते त्यांच्यात मोठे होऊ लागले.
पुढे ते आपल्या एका समूहाला घेऊन मुंबईत आले. मुंबईत ट्रेनमध्ये, स्टेशनवर रस्त्यावर सुंदराबाई अत्यंत अदबीने बोलताना वावरताना दिसतात. जुनी मधुर गाणी गाताना सुंदराबाई हरवून जातात. ट्रेन मधले प्रवासी पण क्षण भर आपला थकवा विसरून जातात.
आपल्या कुटुंबापासून लांब झाल्यानंतर त्या कधीच घरी परत गेल्या नाही. त्यांच्या कुटुंबातील लोकांनी पण कधी त्यांचा शोध घेतला नाही. ते सगळे खुश होते. सुंदराबाई बाहेरून आपल्या घरातील लोकांची माहिती ठेवत असे. काही वर्षांनी त्यांना कळले की त्यांच्या बहिणीचे पती वारले आणि आपल्या दोन मुलांसोबत ती आता त्यांच्या आई वडिलाकडे असते. मग सुंदराबाई यांनी आपली बहीण व तिची दोन मुलं यांची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या मुलीसारखं त्यांचं आई म्हणून पालनपोषण केलं, आणि योग्य वर शोधून थाटामाटात लग्न देखील करून दिलं. स्वतः तिचे कन्यादान केलं.
आपल्या वयोवृद्ध आईला देखील ते आपल्या घरी घेऊन आले आणि तिचा पण अत्यंत प्रेमाने सांभाळ करतात. त्यांची आई सुंदराबाई विषयी बोलताना भावूक होऊन म्हणते, की ज्या मुलांचा सांभाळ करण्यात आयुष्य खर्ची घातलं त्यांनी कधीच आमची साधी विचारपूस देखील केली नाही, पण ज्या लेकराला वेगळा म्हणून आम्ही त्याचा त्याग केला त्यानेच आता आमची सगळी जबाबदारी घेतली.
सुंदराबाई या तृतीयपंथी समाजातील मुलांचे संगोपन करतात. लहानपणीच तृतीयपंथी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातून हकलून दिल्यावर त्यांना आपल्या वस्तीत आश्रय देतात आणि समाजाची दीक्षा देऊन उदरनिर्वाहचं साधन आणि एक जिव्हाळ्याचं कुटुंब देतात. त्यांचं शिक्षण करतात. ही सगळी मुलं त्यांना अम्मा म्हणतात.
सुंदराबाई म्हणतात, “रिश्ते सिर्फ खून से नहीं मन से भी पैदा होते हैं.” निसर्गाच्या अगम्य अश्या शक्ती आणि रहस्य यापुढे आपण नतमस्तक असतो. निसर्ग कोणाच्या वाट्याला काय वाढेल माहिती नाही. परंतु त्याने जे दिलंय ते आशीर्वाद म्हणून स्वीकारणं आणि आपल्याकडून जे जे चांगलं होऊ शकेल ते करत जाणं यालाच जीवन म्हणावं लागेल.
सुंदराबाई नटेश्र्वर यांनी स्वतःचं नैसर्गिक रूप स्वीकारलं आणि आपल्या अर्ध नर नारी अस्तित्वाला आई रूप देऊन आपल्या चांगल्या कार्याने पूर्णत्व दिलं. त्यांना सन्मानपूर्वक प्रणाम.

– लेखन : डॉ.राणी खेडीकर, बाल मानस तज्ञा
अध्यक्षा, बाल रक्षक प्रतिष्ठान, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800