Friday, November 22, 2024
Homeलेखस्त्री मुक्त झाली का ?

स्त्री मुक्त झाली का ?

आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, वाचू हा विचार प्रवर्तक लेख….
– संपादक
“ती” जन्माला येताच काहीश्या पडलेल्या चेहऱ्यानीच तिचे स्वागत होतं. “ती” म्हणजे डोक्यावर ओझं. “ती” म्हणजे काळजी. “ती” म्हणजे संकट. “ती” म्हणजे जबाबदारी. “ती” म्हणजे फुकटचा खर्च, असा काहीसा काळ होता तो.

पण काळ बदलला, तिच्या आगमनाने चेहरे आनंदी होऊ लागले. पायघड्या घालून तिचे स्वागत मोठया थाटात होऊ लागले. काही प्रमाणात भेदभाव सम्पूष्टात आले. पण काही प्रमाणातच, ते ही काही ठिकाणीच !

अजूनही काही ठिकाणी दृश्य बदलेले नाही. असे काही पाहिलं की मग मन सैरभैर होते. मनात प्रश्न निर्माण होतात. आणि मग डोळ्यासमोर उभी राहतात ती अनेक प्रश्नचिन्ह……..

खरंच, आपण 21 व्या शतकाकडे चाललोय का ? तिचा वनवास सम्पलाय का नक्की ? तिची अग्निपरीक्षा थांबलीय का नक्की ? तिची बंधने संपलीत का ? का हे प्रश्न मनाला पडतात ? अजून का नाही खात्री वाटत ?
कारणं ही तशीच. असंख्य, न मोजता येणारी, न बोलता येणारी, आणि कधीही न सांगता येणारीच. वनवास सम्पला नाही तर त्याचे स्वरूप बदललं आहे. आता अग्निपरीक्षा नाही असं म्हणता येणार नाही, कारण तीही द्यावीच लागते फक्त तिचे स्वरूप बदललं म्हणणं योग्य ठरेल. हो ना ?

जन्माला आली की आई वडिलांनी परंपरेच्या नावाखाली आणि समाज मान्यतेच्या गोष्टी सांगून हवं ते तिच्याकडून करून घ्यायचं. तरुणपणी नवरा, सासर कडची मंडळी. त्यानंतर मुलं, सुना, नातवंड …
तिचा आलेख न थांबणाराच. सुधारणेच्या नावाखाली तिची फरफट न संपणारीच. स्वरूप फक्त बदललं, इतकाच काय तो बदल ……

अश्या बोकाळलेल्या संस्कृतीतुन तावून सुलाखून निघालेल्या “ती” ला आता कुठं आयुष्य, माणसं, समाज, मूल नातवंड कुठंतरी समजायला लागलेली असतात. धडपडत धडपडत आता कुठं तिनं किर्रर्र जंगल पार केलेलं असते आणि समोरच सप्तरंगी क्षितिज तिला खुणावत असते . तो काळ म्हणजे तिच्या चाळीशीचा. चाळीशी पार केल्यावर तिला सगळ्या गणिताची सूत्र जणू तोंडपाठ झालेली असतात. आयुष्याचे चढ उतार पाठ झालेले असतात. सगळ्या गाठी उलगडलेल्या असतात. सगळी कोडी उलगडलेली असतात . आणि आता कुठं तिचं जगणं सुरू झालेलं असतं ……

आयुष्याच्या बारीक सारीक खाचा खुचा समजलेली ती आता कळीतून बहरलेली वेल झालेली असते. तिच्यात वेगळीच चमक, एक प्रकारचा आत्मविश्वास जागा झालेला असतो. जीवन जगण्याची कला अवगत झालेली असते. समाजात वावरताना आयुष्याची बरीच सूत्रे त्यातले बारकावे, खाच खळगे, वादळ, संकट सगळ्याचा सामना करत, सगळ्या लढाया लढत ती आता कणखर पोलादी हृदयाची बनलेली असते. सोनेरी क्षितिज तिला खुणावत असते.

कारणेही तशीच असतात. असंख्य अग्निपरीक्षा देत ती इथवर पोहचलेली असते. तिच्यातील भय आता कुठच्या कुठं पळालेलं असते. संकटांचा सामना करण्याचं बळ तिला आपसूकच आलेलं असते. आणि हीच ती वेळ जेंव्हा जीवनाचा सोहळा करण्याच सामर्थ्य तिला लाभलेलं असते.

आपल्यातील सामर्थ्य ओळ्खलेली “ती “आता एक अलौकिक तेज घेऊन वावरताना दिसते. गगनभरारी घेताना दिसते. साऱ्या आसमंताचे बळ लाभलेली “ती” जग जिंकण्याचं सामर्थ्य लाभलेली “ती “. तेजाने तळपणारी “ती”, आत्मसन्मान जपणारी “ती”, संकटासमोर हार न मानणारी “ती”, हो तिच “ती”. तिच्या अफाट शक्तीला हा मनाचा मुजरा. तिच्यातील सामर्थ्याला त्रिवार सलाम, अश्या “ती” साठी काही ओळी ………

“सामर्थ्य स्त्री शक्तीचे
दे झुगारून बंध सारे ….
घे आता गगन भरारी….

रिते तुजसाठी
अवकाश सारे…
जग आता
तव स्वप्ने खरी…

वाहू दे स्वछंद वारे.
टाक जाळुनी मनीचे व्यर्थ सारे ते पसारे

घे भरोनी तव ओंजळीने
नभीचे सप्तरंगी
सुर्य चंद्र आणि तारे

टाक दफणून
भूतकाळ सारा
राहो खळखळता
तव चैतन्य झरा

बघ तुला ते सप्तरंगी क्षितिज खुणावतेय सारे
घे भरुनी पंखात तुझ्या आसमानीचे बळ सारे

खूप जगलेस क्षण
मन मारणारे
दे झोकून स्वतःला
आत्म शक्तीच्या आधारे

आणू नकोस मनी
आता व्यर्थ विचार
कर मनभरुनी
उत्सव आयुष्याचा

सांग बजाऊनी
तू मनाला
अग्निपरीक्षा
द्यावीच लागणार

अंध आणि निष्ठुर
जग हे
नुसतेच सुधारणेचे
गोडवे गाणारे

हो सज्ज
रहा पाय रोवूनी
कर आता तू
कणखर मन

इथे उभा
कोपऱ्या कोपऱ्यावर
नग्न करणारा
तो दुर्योधन

नको खचू
नको घाबरू
घे खडग करी
त्या थेंबातुनी जन्मेल दुर्गेच्या काळजाची नारी
दुर्गेच्या काळजाची नारी

तूच झाशीची राणी
अन तूच खरी स्त्री स्वाभिमानी
उगाच नाही महती तुझी तू आहेस जगतजननी.

तूच दुर्गा, तूच काली वास्तल्याची तूच मूर्ती
होउ दे तुझ्या कर्तृत्वाने जगभरात तुझी कीर्ती

घे ठाव तू तुझ्या अंतराचा
कर संहार
विश्वातील दुर्गुणांचा

स्नेहबंधाच्या धाग्याने जिंकशील डाव
तू जीवनाचा
होईल तुझ्यामुळेच
नवं जन्म माणसाचा

आहेस तूच निमित्त
स्वर्ग स्थापनेची
कर तुझ्या साधनेने स्वच्छता या जगाची

नको भिऊस तू तुझ्या साथीला असे परमात्म स्नेहाचा झरा होईल
दूर तुझ्या तेजाने काळाकुट्ट अंधार सारा…

सविता कोकीळ

– लेखन : सविता कोकीळ. इचलकरंजी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments