आपण अनेकदा वर्तमानपत्रातून वाचतो सुविधे अभावी शेतकऱ्याची आत्महत्या किंवा सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले आपले जीवन..मागे राहीली कच्चीबच्ची.. अशा बातम्या वाचल्या की आपलं यंत्रवत बनलेलं मन तात्पुरतं हळहळतं, क्वचित प्रसंगी चिडतं. पण निखाऱ्यावर राख जमली की जसा तो विझतो तसंच आपल्या मनाचंही होतं. परिस्थितीची राख जमू लागली की आपलं मन ही सर्दावतं. पण काही मनं अशी असतात जी स्फुल्लिंग पावतात. काहीतरी करायचा ध्यास घेऊन उजळतात. फक्त विचार नाही तर कृतीच्या वाटा शोधतात. असे लोक रडत नाहीत तर लढतात. समाजासाठी, समाजातल्या कमकुवत घटकांसाठी ते उर्जा स्त्रोत होतात. ते समाजाच्या दुःखांशी नाते सांगतात. त्यांच्यातलाच एक होऊन जगताना आपलं वेगळेपण जपतात. अशोक देशमाने आणि अर्चना देशमाने हे तरूण दांपत्य अशाच ध्येयवेड्यांशी नातं सांगणारं जोडपं.
अशोक देशमाने एम. एस्सी. ( कॉम्प्युटर सायन्स ), या तरुणाने आयटीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर, दुष्काळग्रस्त भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण, संगोपनासाठी व शैक्षणिक पुनर्वसनासाठी “स्नेहवन” हा सामाजिक प्रकल्प २०१५ साली पुणे जिल्ह्यात चालू केला. आळंदीपासून साधारण १० किलोमीटर वर कोयाळी फाटा इथे स्नेहवन नावाची संस्था श्री. अशोक आणि सौ. अर्चना देशमाने यांनी सुरू केली.
५ वर्षांपूर्वी १८ मुलांपासून सुरु झालेलं हे घरट आज ८० मुलांची निवासी जबाबदारी घेत आहे. तसेच ज्ञानछत्र या प्रकल्पाच्या माध्यमातून १५० मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेत आहे. अशोक आणि अर्चना यांनी स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्नेहवनची सुरुवात केली. संपुर्ण स्वयंपाकाची जबाबदारी अर्चना एकटी घेते, त्याच बरोबर मुलांचा अभ्यास घेणे, आजारपणही ती आई होऊन आनंदाने निभावते. आयुष्यभर कोणतीही तक्रार करणार नाही या अटीवर अर्चनाने अशोकचा मानवधर्म स्वीकारला. अशोकचे बालपण परभणीजवळील एका छोट्याश्या खेड्यात अत्यंत हलाखीच्या परिस्थिती गेले. जिथे रोजच्या जेवणाची भ्रांत होती, l तिथे शिक्षणाची आस धरणे हे एक स्वप्नच होते. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने तो इंजिनिअर झाला आणि एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरीला लागला. नोकरी करत असताना तो विविध विषयांवरील पुस्तके, स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करत होता. स्वतः एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचे प्रश्न खूप जवळून पाहिल्यामुळे त्याला सतत यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते.
नुसत्या गप्पा मारून हे प्रश्न सुटणार नाहीत तर यासाठी वेळ दिला पाहिजे.या विचारात असतानाच एका क्षणी त्यांने ठरवले की आता मी यात उडी मारणार आणि स्वतःच्या आई वडिलांचा विरोध पत्करून त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ या कार्याकरिता वाहून घेतले. सुरुवातीला विरोधात असलेले आई वडील नंतर मुलाचा निर्धार बघून गावाकडील शेतीवाडी विकून मुलाच्या संसाराचा गाडा ओढू लागले. सुरवातीला भोसरी येथे ४ खोल्यांमध्ये ते तिघे आणि १८ मुले असे २१ जण जवळ जवळ ३-४ वर्षे एकत्र रहात होते. अर्चनाशी लग्न झाल्यावर तर ती या मुलांची आई झाली आणि अशोकला आणखी बळ मिळाले.
“डॉ रवींद्र आणि स्मिता कुलकर्णी ” या सहदयी आणि दानशूर दाम्पत्यांनी त्यांची आळंदी जवळील २ एकर जागा स्नेहवनला दान केली. येथील प्रकल्पाला स्व. नलिनीताईताई कुलकर्णी हे नाव कृतज्ञतापूर्वक देण्यात आले.
येथे स्वामी विवेकानंद ज्ञानालय, कामधेनू गौशाला, ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेव्यतिरिक्त योगा, संगीत, शेती, डेअरी फार्मिंग इ. शिक्षणही दिले जाते.
तसेच इतर १५०मुलांच्या शिक्षणासाठी ज्ञानछत्र प्रकल्प राबविण्यात येतो. तर आदिवासीबहुल परिसरातील मुला मुलींसाठी शिक्षण व एकवेळचे जेवण दिले जाते.
या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुविधा देत मोठं करायचं ध्येय त्यांनी उरी बाळगलं आहे, त्यांचा हा प्रवास समाजाच्या साथीनं सुरू आहे. ‘पुढचे संपूर्ण आयुष्य याच कार्यासाठी द्यायचे’, हे या ध्येयवेड्या दाम्पत्याने ठरवले आहे. कोणत्याही सरकारी अनुदानाविना, खडतर परिस्थितीतून हा ज्ञानयज्ञ चालू आहे. बालगोपालांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना समाजामध्ये विश्वासाने उभे राहण्यासाठी चांगला नागरीक बनवणे या विचारावर स्नेहवनचे कार्य चालु आहे.
स्नेहवनात असलेले अनोखे उपक्रमही जाणून घेण्यासारखे आहेत.
१. वन बुक वन मूवी : स्नेहवनात भारतातील पहिली कंटेनर लायब्ररी आहे ज्यात १० हजार पुस्तके आहेत. इथल्या प्रत्येक मुलाने दर आठवड्याला एक पुस्तक वाचायचे आणि त्यावर विवेचन करायचे. जो पुस्तक वाचून पूर्ण करेल त्याला एक चित्रपट पाहायला मिळेल. जो पुस्तक वाचणार नाही त्याला त्या आठवड्यात चित्रपट पाहायला मिळणार नाही. मग त्याला स्वतः अशोकजी आणि अर्चनाताईही अपवाद नाहीत.
२. रिंगण : इथली मुळे टिव्ही अजिबात पाहत नाहीत तर रोज संध्याकाळी सगळी मुले एकत्र रिंगणात बसतात आणि वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतात, आपली मते मांडतात. कधी कधी एखादा विषय दिला जातो आणि त्यावर प्रत्येकाने आपले मत, विचार व्यक्त करायचे. मग तो विषय माझी आई, माझे गाव, आपले पंतप्रधान असा काहीही असू शकतो. पण ह्यामुळे ह्या मुलांच्यात लहानपणासूनच, वक्तृत्व कला जोपासली जाते आणि विचारांना दिशा देऊन ते व्यक्त करण्याचे धाडस येते. त्यामुळे ही मुळे ५०० लोकांसमोर सहज बोलू शकतात.
३. सौर प्रकल्प : स्नेहवनचा संपूर्ण परिसर हा सौर उर्जेवर चालतो. इथली मुलेच हा सौर ऊर्जा प्रकल्प सांभाळतात.
४. बायो गॅस : इथे प्रत्येक जण स्वतःला लागणार गॅस स्वतः तयार करतो. हा पूर्ण प्रकल्प पण मुलेच सांभाळतात.
५. कॉम्प्युटर लॅब आणि अकाउंटिंग : लॅबचे व्यवस्थान आणि हिशोबाचे काम ही मुलेच पाहतात. कुणालाही काहीही लागले तरी तो तो विभाग पाहणाऱ्या मुलांना विचारूनच सगळी कामे केली जातात. अगदी अशोकजीसुद्धा या मुलांच्या सल्ल्यानेच काम करतात.
६. संगीत, चित्रकला, योगाभ्यास : दर शनिवारी आणि रविवारी इथे बाहेरील शिक्षक येऊन मुलांना गाणे, चित्रकला आणि योगाचे धडे देतात आणि त्यांची चौफेर प्रगती होईल याकडे लक्ष देतात
७. गौ-शाळा : स्नेहवनची स्वतःची गौशाळा आहे .त्यात २ गीर गायी आहेत. त्यामुळे त्यांना लागणारे दूध दुभतेही इथेच उपलब्ध होते.
८. जैविक शेती : स्नेहवनला लागणारा रोजचा भाजीपाला ते त्यांच्याच आवारात पिकवतात ते ही जैविक पद्धतीने. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता.
अशा समाजात आदर्श ठरलेल्या या मायेच्या घराला ‘स्नेहवन’ ला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
-युनिवर्सिटी ऑफ वाॅशिंग्टन अमेरीका- सोशल इनोव्हेटर.
– झी टीव्ही रिअल हिरो अवार्ड.
– युगांतर अवार्ड- सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बरोडा.
– मराठवाडा सेवारत पुरस्कार – पुणे.
– लोपामुद्रा पुरस्कार- परभणी.
– दधिची पुरस्कार- जालना.
– श्रमसाफल्य पुरस्कार- दोंडाईचा.
– रोटरी पुरस्कार- मुंबई.
१८ मुलांपासून सुरु केलेला हा स्नेहसंसार आज २३० मुलांबरोबर गुण्या गोविंदाने सुरु आहे. इतकंच नाही तर परिस्थितीने कोमेजलेल्या फुलपाखरांच्या पंखात गरूडाचे बळ भरताना एक खराखुरा उर्जास्त्रोत म्हणून नावारुपास येत आहे.
आपण एकदा अवश्य भेट द्यावी ,असाच हा उपक्रम आहे.
‘स्नेहवन’ ची वेबसाईट- www.snehwan.in
फेसबुक – www.facebook.com/snehwan
– लेखन: मानसी चिटणीस.
-संपादक: देवेंद्र भुजबळ. www.marathi.newsstorytoday.com मोबाईल क्रमांक- 9869484800.
खूप उत्कृष्ठ काम 👌👍👍👏🙏🙏
सर
नमस्कार आणी फार छान उपक़म
गरजुवंतांसाठी फार मोलाचे कार्य करित असुन कोटी कोटी धन्यवाद आणी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏